निसर्गात भरूनी राहे अनादिअनंत
कधी पावसाच्या धारा
भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा
हसे रूपवंत
ग्रीष्म रक्त पेटविणारा
शिशिर आग गोठविणारा
मनोगते मेळविणारा
फुलारी वसंत
कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे
सर्व नाशवंत
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
गीत प्रकार | - | भावगीत |
अनादि | - | ज्याच्या आरंभकाळाचा थांग नाही असा. |
फुलारी | - | माळी, बागवान. |
पुढे संगीतकार बाळ बर्व्यांनी एक वेगळंच परिमाण देणारी नवी चाल बांधली. तिची एच.एम.व्ही.ची ध्वनिमुद्रिकाही निघाली, चंद्रशेखर गाडगीळच्या स्वरांत..
त्या दोन्ही चाली मला आपापल्या जागी स्वतंत्रपणे आवडतात, ह्याचं कारण रामभाऊंची चाल खास भजनी थाटाची आणि मराठी मनाला भावणार्या भावगीत वळणाची आहे.. ह्याउलट बाळ बर्व्यांनी त्यांची चाल ऐकवली तेव्हा आरंभी थोडा शंकित झालो होतो. पण केवळ एकतारी-डफाच्या साथीवर फक्कड गात निघावा तशी जाणारी, काहीशी निर्गुणी थाटाची ती चाल नीटपणे ऐकल्यावर मी बर्व्यांना आणि चंद्रशेखर गाडगीळलाही मनापासून दाद दिली. माझ्या कवितेतला मला स्वत:लाही आधी नीटपणे न जाणवलेला निसर्गाचा भलामोठा विस्तीर्ण पट, मला ह्या नव्या चालीत डोळ्यांसमोर उलगडत चालल्यासारखा भासला.
ह्या अनुभवामुळे माझ्या काव्य आणि सांगीतिक जाणिवेत एक महत्त्वाचं परिवर्तन घडलं. ह्याआधी मी एका कवितेला केवळ एकच चाल असू शकते अशा काहीशा कलाकर्मठ मताचा होतो. पण इथून मला जाणवू लागलं की प्रत्येक कवितेमध्ये स्वर-रचनांच्या अनेक शक्यता दडलेल्या असू शकतात आणि ह्याउलट संगीतकाराच्या एखाद्या नि:शब्द स्वर-रचनेतून अनेक कवींकडून अनेक प्रकारे कवितांची आकाशं साकार होऊ शकतात.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.