A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अर्धीच रात्र वेडी

अर्धीच रात्र वेडी, अर्धी पुरी शहाणी;
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी.

फुललें पुन्हांपुन्हां हा केला गुन्हा जगाचा;
ना जाहलें कुणाची पत्त्यांमधील राणी.

येतां भरून आलें, जाता सरून गेलें,
नाहीं हिशेब केले येतील शाप कानीं.

आतां न सांध्यतारा करणार रे पहारा;
फुलणार नाहिं आतां श्वासांत गूढ गाणीं.

शापूं तरी कशाला या बेगडी जगाला;
मी कागदी फुलांनीं भरतेंच फूलदाणी.