जवळी ग पती माझा नाही
चैत्राची नवी नवलाई
गेली मोहरून ही आंबराई
दारी पोपट साळुंकी गाई
जवळी ग पती माझा नाही
राया, मी किती वाट पाहू?
कोणा जीव माझा उकलून दावू
रडू कुठवर मी धाईधाई
जवळी ग पती माझा नाही
गीत | - | प्र. के. अत्रे |
संगीत | - | अण्णा माईणकर |
स्वर | - | वनमाला |
चित्रपट | - | पायाची दासी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
भावना आणि विचार (यात कल्पनाही आली) आपल्या कवितेच्या किंवा गीताच्या माध्यमाने संगीत दिग्दर्शकाकडे पोहोचल्यावर गीतात व्यक्त झालेल्या हेतूला आणि कार्यकारणाला अनुसरुन एखादा समर्थ संगीतकार चाल देताना कोणकोणत्या गोष्टींचा जाणता आणि अजाणता विचार करतो आणि शेवटी आपली चाल कशी निश्चित करतो, त्याची वाचकांना कल्पना येईल. 'पायांची दासी' तील 'अंगणात फुलल्या जाईजुई' हे गीत आचार्य अत्र्यांनी लिहिले तेव्हा त्यांनी ते घाईघाईत अण्णासाहेब माईणकरांच्या हाती देऊन सांगितले की, "उद्या सकाळीच वनमाला या गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी स्टुडिओत येईल. गाणे ही गोष्ट तिचे 'खाणे' आणि आमचे 'पिणे' यापेक्षा तिला प्रिय आहे तेव्हा सकाळीच तिला हे गाणे शिकवण्याच्या आणि ध्वनिमुद्रण करण्याच्या तयारीने सकाळी साडेआठ वाजताच स्टुडिओत हजर रहा."
अण्णासाहेबांनी गीताचे वाचन न करताच गाण्याचा तो कागद आपल्या खिशात ठेवून दिला. संध्याकाळी गणेश चतुर्थीचा दिवस असल्यामुळे ते पी. मधुकरांच्या समवेत आपल्या एका मित्राच्या घरी त्यांच्या श्रीगणेशमूर्तीच्या आरतीसाठी म्हणून गेले. तेथील सोहळ्यात इतरांबरोबर रंगलेले असताना त्यांना एकदम अत्र्यांच्या त्या गाण्याची आठवण झाली. त्यांनी गाणे वाचायला सुरूवात केली आणि आनंदातिशयाने त्यांनी पी. मधुकरना म्हटले, "अरे या गाण्याची चाल मिळाली. 'सुखकर्ता दुखहर्ता' या आरतीचा प्रथम स्वर 'अंगणात फुलल्या' या दोन शब्दांसाठी ठेवून अण्णासाहेबांनी आपल्या अभिजात प्रतिभेने ते गाणे तयार केले आणि दुसर्या दिवशी वनमालाबाईच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले.
आपल्या पतीची देवाहून अधिक सेवा करणार्या त्या यमूच्या या गीताने सहृदय रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. यमूच्या अंत:करणातील असहाय्य भावना आणि सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहून अंतर्मुख दृष्टीने मोजक्या शब्दात केलेले हे वर्णन चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनाला चित्रीकरण पहाताना थेट भिडणारे असे होतेच. या गाण्याची परिणामकता काही काळ समाजाच्या मनावर इतकी टिकून होती की शेवटी लग्नसमारंभाच्या प्रसंगी जवळजवळ एक दशकभर या गाण्याचे सूर बँडवर वाजवण्यात बँडवाले धन्यता मानत असत. 'पायाची दासी' मधील नायकाच्या तोंडी घातलेली आणि मा. अविनाश (गणपतराव मोहिते) ह्यांनी गायलेली सर्व गाणी अभिजात शाहिरी थाटाची होती. मा. अविनाश ह्यांनी गायलेली या चित्रपटातील 'लाखो बायकात अशी देखणी' आणि 'ऐन दुपारी एकटी' ही गाणीही आचार्य अत्र्यांच्या गीत रचनांप्रमाणेच अण्णासाहेब माईणकर ह्यांच्या मराठमोळ चालींनी जनमानसात खूप रुळली. या संबंधात दि. २१ जानेवारी १९९६ रोजी सांगली मुक्कामी मा. अविनाश ह्यांची त्यांच्या घरी भेट झाली तेव्हा त्यांनी आचार्य अत्र्यांच्या त्या गीतांचे तोंडभर कौतुक करून म्हटले होते की 'अत्र्यांच्या त्या सर्वच गाण्यात खरोखर गंमत होती. जितक्या सहजतेने अत्र्यांनी ती गाणी लिहिली, तितक्याच सहजतेने अण्णांनी त्या गाण्यांना चाली दिल्या, तितक्याच सहजतेनं म्युझिशियन्सनी त्या गाण्याला साथ दिली, तितक्याच सहजतेने गायक-गायिकांनी ती गायली आणि विशेष म्हणजे तितक्याच सहजतेने श्रोत्यांनी ती गाणी स्वीकारली."
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
आचार्य अत्र्यांची चित्रगीते
सौजन्य- दिलिपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.