ग़ज़ल १
वाचलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे?
पुस्तकातुन भेटलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो, आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?
हे प्रदर्शन की प्रदूषण, काय आहे नेमके?
भावरंगी रंगलेली माणसे गेली कुठे?
काय इतिहासावरी विश्वास मी ठेवायचा?
तेज त्याचे प्राशिलेली माणसे गेली कुठे?
होउनी लाचार यावा, प्रश्न दारी, स्वप्न हे
रंजलेली गांजलेली माणसे गेली कुठे?
जनहितासाठीच ज्यांनी जन्म अपुला वेचला
काळजावर कोरलेली माणसे गेली कुठे?
बघ 'अिलाही' राहिल्या या तसबिरी भिंतीवरी
या हवेलीने दिलेली माणसे गेली कुठे ?
ग़ज़ल २
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
नाही अखेर कळले नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा
का आळ खंजिरावर घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा !
काठावरी उतरली स्वप्नें तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
भेटून वादळाला इतुके विचार आता
शाबूत एवढा ही का कोपरा असावा
दारात ती उभी अन् नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो उंबरा असावा
माथ्यावरी नभाचे ओझे सदा 'अिलाही'
दाहीदिशा कशाच्या, हा पिंजरा असावा
संपूर्ण कविता / मूळ रचना
ग़ज़लची आणि माझी ओळख अपघातानेच झाली. जानेवारीचा पहिला आठवडा होता तो. साल होते १९८०. रिट्झ हॉटेलच्या गेटजवळ एक फलक होता "मुशायरा- रात्री दहा वाजता."
मुशायरा या शब्दाचा अर्थच मला माहीत नव्हता. 'मुशायरा' म्हणजे काय? सोबत असलेल्या मित्रास विचारले. त्याने मला चक्क वेड्यात काढले. 'कविता लिहितोस आणि मुशायरा माहीत नाही?' त्या रात्री आम्ही दोघे त्या 'मुशायरा' नावाच्या अज्ञात प्राण्यास भेटायला गेलो. उर्दू मुशायरा होता. मुशायर्यामध्ये जे कांही चाललं होते ते खूप चांगलं होतं पण नेमकं काय चांगलं होतं, ते मात्र कळत नव्हते. कारण त्यावेळी (त्याकाळी) मला उर्दू भाषा अवगत नसल्यामुळे सारं डोक्यावरून जात होतं. शेजारचे 'वाह वा !' म्हणाले, की मी ही तसाच आवाज काढायचा प्रयत्न करायचो पण तो अगदीच अस्पष्ट आणि मला ही ऐकू येणार नाही इतका जोरदार होता.
त्या मुशायर्याचे संचालन करणार्या डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णीनी कोणास मराठी ग़ज़ल ऐकवायची असेल तर त्यांनी अवश्य ऐकवावी, असं जाहीर आवाहन केलं. माझ्या मित्रानं खूप ढोसले मला, मी जाऊन ऐकवावी म्हणून. पण उठलो नाही. कारण आतून कुठे तरी जाणीव होत होती मी जी ग़ज़ल समजतो, ती ही नव्हे. त्याच मुशायर्याच्या शेवटी साधारण आठ दिवसानंतर वेलवलकरांच्या (लक्ष्मी रोड, पुणे) टेरेसवर मुशायरा असल्याचं जाहीर केलं. या मुशायर्यात माझा एक फायदा झाला. कांही ग़ज़लप्रेमी कवींची ओळख झाली.
वेलवलकरांच्या टेरेसवरील मुशायर्यासाठी मी आवर्जून अर्धा तास आधी गेलो. डॉ. नाडकर्णीना भेटून ग़ज़ल वाचण्याची इच्छा व्यक्त केली. "कोणती ग़ज़ल वाचणार दाखवा पाहू?" म्हणाले. सोबत आणलेल्या कवितेच्या वहीतील एक कविता दाखविली, जिला मी ग़ज़ल समजत होतो. "छान आहे!" म्हणाले. "पण ही ग़ज़ल नाही. तू आज वाचू नकोस पण येत्या रविवारी माझ्या घरी येऊन भेट." (वाचू नकोस म्हणाल्यामुळे मी अजिबात नाराज झालो नाही किंवा नर्व्हस होवून निघूनही गेलो नाही, हे मी मुद्दाम सांगत आहे.)
स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड मला दिलं. आणखी एक गोष्ट त्यांनी केली. पुण्यातील उर्दूचे मासूम शायर जनाब हनीफ़ सागर यांची ओळख करून दिली. त्यांनीच मला पुढे उर्दू ग़ज़लचे धडे दिले.
रविवारी मी डॉ. नाडकर्णीच्या घरी गेलो. आपुलकी, आदर, प्रेम एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून ! भारावून गेलो. मनावर प्रचंड दडपण होते. त्यांनीच मला ग़ज़लची बाराखडी शिकविली. पहिल्याच भेटीत काफ़िया, रदीफ़, पूर्व यमक, अन्त्ययमक, बहर, वृत्त अशा बर्याच प्राथमिक गोष्टी सांगितल्या. आशय लक्षांत राहिला, शब्द मात्र पार विसरून गेलो. त्या आशयाच्या आधारे पहिली ग़ज़ल लिहिली.
सांज वेळी सोवतीला सावली देऊन जा
भैरवी गायीन मी, तू मारवा गाऊन जा
पहिल्याच ग़ज़लेत सारं तंतोतंत बरोबर असणं अशक्य नसलं तरी शक्य ही नाही. या संग्रहाच्या शेवटी पृष्ट ९६ वर ही ग़ज़ल दिली आहे. जशी लिहिली होती, तशीच दिली आहे. ती सदोष असूनही मला अतिप्रिय आहे. कारण या ग़ज़लेमुळं माझं खूप कौतुक झालं. मानसिक बळ मिळाले, ताकत मिळाली, प्रोत्साहन मिळालं. त्याच ताकतीवर माझा ग़ज़लचा प्रवास अडकाठ्या, अडथळे न जुमानता चालू आहे.
ग़ज़लचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो, हे सर्वमान्य आहे कारण ते सत्य आहे. एकाच ग़ज़लेत एखादा शेर शृंगारिक तर त्या नंतरचा दुसरा शेर प्रेमभंगाचं दुःख वा वंचना, वेदना व्यक्त करणारा असू शकेल. पुढचा शेर राजकीय विषयाशी संवधीत असेल. तेव्हा इतर कवितेप्रमाणे वा भावगीताप्रमाणे ग़ज़लला शिर्षक देणे योग्य वाटत नाही. तशी ग़ज़लची परपंरा पण नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे मराठी ग़ज़ल लिहिणारे 'मक्ता' लिहीत नाहीत. किबहुना 'मक्ता' लिहिणारे अपवादानेच दिसतात. 'मीरा के प्रभू' म्हणणारी मीरा, 'कहत कबीरा'चा कबीर तसेच 'तुका म्हणे' असे लिहीणारे तुकाराम, सगण भाऊसारखे लावणीकार, पोवाडे लिहिणारे शाहीर, आवर्जून 'मक्ता' लिहीत. 'मक्ता’ म्हणजे त्या काव्याची मक्तेदारी. ग़ज़लची परंपरा सुद्धा अशीच आहे.
ग़ज़लच्या विशिष्ट वृत्तामुळे जर शेवटच्या शेरात नाव गुंफणे शक्य नसेल तर सोडून द्यावे, पण जिथे शक्य असेल तिथे 'मक्ता' लिहावा, असे मला वाटते.
ग़ज़लेचे व्यक्तिमत्त्वच मुळी शालीन, सोज्वळ, आहे. फुलाप्रमाणे ती कोमल आहे, नाजूक आहे. तेव्हा त्यातील शब्दही तसेच हळूवार असावेत. राग, चीड, त्वेष जरूर व्यक्त करावा, पण आक्रस्ताळेपणा नसावा. दुरान्वये जरी अश्लीलता येत असेल तरी तो ग़ज़लेतील दोष (ऐब) मानला जातो. ग़ज़ल शृंगारिक असू शकते पण अश्लील नव्हे. कांही शब्दांचं व्यक्तिमत्त्वच मुळी असं आहे की ते ग़ज़लसाठी अंगावर फुटलेल्या कोडाप्रमाणे बटबटीत, बेढब, राकट वाटतात. अश्लिल नसतानाही अश्लिलतेचा आभास करून देणारे वाटतात. ग़ज़लचा काफ़िया 'आज', 'साज' असा असेल तर केवळ काफ़ियाचे शब्द आहेत म्हणून 'माज', 'खाज' हे शब्द वापरावेत का? याचा कवीने ग़ज़ल लिहितांना विचार केलाच पाहिजे.
एकच काफ़ियाचा शब्द. दोन वेळा किंवा अधिक वेळा वेगवेगळ्या कल्पना घेऊन वापरायला कांहीच हरकत नाही. केवळ शब्दांचा खेळ करून शेर पूर्ण करू नये.
ग़ज़ल के लिए बंदिशो अल्फ़ाज़ ही नही काफ़ी
जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए
माझ्या समकालीन कवींचेच नव्हे तर माझ्यापेक्षा खूप ज्यूनिअर असलेल्या कवींचे कवितासंग्रह केव्हांच प्रकाशित झाले आहेत. तव्वल तीस वर्षानंतर (१९६४ ते १९९४) माझा ग़ज़ल संग्रह आज प्रकाशित होत आहे.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे?
उद्विग्न मनाने मी असे जरी लिहिले असले तरी पण मन अगदीच निराश नसावं.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
म्हणजे अजून ही खर्या माणसांची कुठे तरी चाहूल लागते.
"यदा यदा ही...." म्हणणार्या कृष्णाने पुन्हा एकदा अवतार घ्यावा, बिघडलेला विश्वाचा तोल सावरावा, असे वाटायचे आणि खरोखरच त्या कृष्णाने माझ्यासाठी अवतार घेतला.
दान अन् बलिदान ही ठाऊक त्यांना
प्रेषितासम पाहिली वृत्ती फुलांची
अशी ही फुलासारखी निर्भेळ, निर्व्याज प्रेम देणारी माणसं माझ्या आयुष्यात आली. ज्यांना मी माझी ही पहिलीवहिली कलाकृती प्रेमभरानं अर्पण केलीय.
(संपादित)
इलाही जमादार
'जखमा अशा सुगंधी' या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- सोमनाथ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख