बहर तयाला काय माझिया प्रीतिचा आला
धुंद मधुर हा गंध पसरला
गमलें मजला मुकुंद हंसला
सहवासातुर मदीय मनाचा कणकण मोहरला !
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | छोटा गंधर्व |
स्वर | - | जयमाला शिलेदार |
नाटक | - | सुवर्णतुला |
राग | - | बिहाग |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
मदीय | - | माझी. |
भगवंताच्या कृपेनें, त्याचीच एक मनोहर चरित्र-लीला रेखाटणारी माझी ही तिसरी नाट्यकृति रसिकांपुढें ठेवतांना, मला अतिशय आनंद होत आहे. माझी ही तुलसीदल-माला जनता जनार्दनाला रुचेल अशी आशा वाटते.
'सौभद्र' कर्ते कै. अण्णासाहेब किर्लोस्कर नि 'कृष्णार्जुन-युद्ध'चे लेखक साहित्यसम्राट कै. तात्यासाहेब केळकर इत्यादि पूर्वसूरींना 'वाट पुसत'च प्रस्तुत 'सुवर्णतुला' हें नाटक लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. उपर्युक्त जुनीं नाटकें आजहि रसिकांना फार आवडतात. मग त्याच नाटकांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून, पण कालमानानुरूप योग्य वाटले ते तंत्र अवलंबून, केलेला हा प्रामाणिक प्रयत्न रसिकांना कां रुचणार नाहीं? रुचावा, अशी नम्र अपेक्षा आहे. हें नाटक लिहितांना अनेकदां वाटे कीं, "छे, अशीं कौटुंबिक सोज्ज्वळ नि संगीतमय (ऑपेरा धर्तीचीं) नाटकें लिहावीत, तर ती कै. किर्लोस्कर, देवल, केळकर यांसारख्या सिद्धहस्त लेखकांनीच !" पण लगेच निराश मनाला ज्ञानेशांची अमृत-वाणीच धीर देत असे कीं,
राजहंसांचे चालणें ।
भूतळीं जालिया शहाणें ।
काय इतर कोणें ।
चालावेंचि ना?
'सुवर्णतुले'ची चाल कशी काय आहे, ती रसिकांस 'कला-मंदिरा'कडे खेंचून नेणारी आहे कीं नाहीं, हें मर्मज्ञ नि सहृदय प्रेक्षकांनीच सांगावयाचें आहे. 'सुवर्णतुले'त जें कांहीं नाट्य-सुवर्ण असेल, तें त्यांनीच चोखंदळ वृत्तीच्या कसोटीवर पारखून घ्यावें, आणि त्यांत कांहीं हीण आढळलेंच, तर तें आपुलकीने निदर्शनास आणावें. त्यांच्याकडून जशी दिलदार गुणज्ञतेची तशीच मार्मिक टीकेची, सूचनांची अपेक्षा आहे.
ह्या नाटकाच्या कथानकाचा सांगाडा श्रीधर कवींच्या 'हरि-विजय' या ग्रंथांतून मुख्यतः घेतला आहे.
मूळ कथेंत 'राधा' नाहीं; पण या नाटकांत ती आहे. प्रतिपाद्य विषय नि नाटकाची रंगत या दोन्हीं दृष्टींनी 'राधे'चें अस्तित्व आवश्यक वाटलें. 'राधा' महाभारतांत नाहीं, भागवतांतहि नाहीं. 'अनयाराधितो नूनं..' या भागवतांतील श्लोकाच्या आधारें कल्पनेच्या बळावर पौराणिक कवींनीं निर्माण केलेली ती व्यक्ति आहे, असें कांहीं विद्वानांचें मत आहे. पण एवढें निर्विवाद कीं श्रीकृष्ण-चरित्रांत 'राधे'ला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झालें आहे. कित्येक प्राचीन व मध्ययुगीन कवींनी राधा-कृष्णांच्या कथा हीन वैषयिक वृत्तीनें वर्णिल्या असल्या तरी, मोठमोठ्या संत-साहित्यिकांनीं या विकृतीचा निषेध करून, 'राधा' म्हणजे मूर्तिमंत आराधना, निष्काम निःस्वार्थ भक्ति, हें तत्त्व प्रतिपादिलें आहे. हीच विचारसरणी अनुसरून प्रस्तुत नाटकांत 'राधामाई' अवतीर्ण झाली असल्यानें, रसिकांना तिचें आगमन हुय बाटेल अशी आशा वाटते.
असो-असें हें नाटक मोठ्या मेहनतीनें व कौशल्याने रंगभूमीवर आणून श्री. गोपीनाथ 'सावकार' यांनीं मला 'ऋणको' केलें आहे !
ख्यातनाम गायक-नट सौदागर उर्फ छोटा गंधर्व यांनी या नाटकाला संगीताचा दर्जेदार साज उत्तम चढविला, याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. सौदागरांनी माझ्या पदांना चालीच दिल्या असें नव्हे, तर पद रचनेबाबतहि कांही मार्मिक सूचना केल्या. श्री. गोपीनाथ सावकार नि छोटा गंधर्वांनी यांनी या नाटकांत अतिशय रस घेतल्यामुळेंच, प्रतिकूल परिस्थितीतहि तें समाधानकारक रीत्या लिहून झाले.
नाट्यलेखन चालू असतांना, श्री. गोपीनाथ सावकार यांनी कांही अनुभवसिद्ध सूचना केल्या. त्याचप्रमाणें श्री. वसंतराव सावकार, श्री. भालचंद्र पेंढारकर व श्री. मामा पेंडसे यांनीहि मनमोकळेपणाने उद्बोधक चर्चा केली, सूचना केल्या. या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच.
श्री. नंदकुमार पातकर, मधुकर महाजन, जयंत साळगांवकर, ब्रह्मानंद नाडकर्णी, बापूसाहेव शिखरे, सदानंद पालेकर, बाळकृष्ण पाटील इत्यादि सुहृदांनी नेहमीप्रमाणेंच मला साहाय्य करून ऋणाचा बोजा वाढविला आहे. या नाटकाची पूर्व प्रसिद्धि चोख केल्याबद्दल श्री. शि. मो. पैसास यांचाहि मी आभारी आहे.
माझे एक ज्येष्ठ कलाकोविद मित्र चित्रकार श्री. गोडसे यांचे आभार न मानले तर ती अक्षम्य चूक ठरेल. मी एकदां सहज या नाटकाचें अंकवार कथानक त्यांना सांगितले. तेव्हां त्यांना ते अतिशय पसंत पडून त्यांनीच माझ्या प्रस्तुत नाट्यलेखनाचा खाजगी मुहूर्त-समारंभ केला ! आणि मग त्यांच्याशी चर्चा करूनच या नाटकाचा प्राथमिक सांगाडा सिद्ध झाला. त्यांच्याशीं वेळोवेळीं झालेली चर्चाहि फार हितावह ठरली. असो. पुनः एकदां श्री. गोपीनाथ सावकार व त्यांचे सर्व सहकारी कलाकार यांचे आभार मानतो.
(संपादित)
विद्याधर गोखले
'सुवर्णतुला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
दि. १० ऑक्टोबर १९६०
सौजन्य- संजय प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.