A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु ।
बाप रखमादेविवरू ॥५॥
अभ्यंतर - अंतरात्मा / आतील भाग.
बरवा - सुंदर / छान.
सबाह्याभ्यंतर - (सबाह्य + अभ्यंतर) आतून बाहेरून, कायिक आणि मानसिक, अंतर्बाह्य स्वरूपाचा.
सिंधु - समुद्र.
भावार्थ-

विटेवर उभ्या असणार्‍या विठ्ठलाचे दर्शन होताच अवर्णनीय आनंदसागरात बुडालेल्या व्यक्तिमत्त्वाची बेहोषी येथे प्रकट झाली आहे.

तो विटेवर असला तरी त्याला पाहिल्याबरोबर आणि भोवती सगळे संत असल्यामुळे माझ्यातला 'आत्‍माराम' प्रकट होतो. पाहतापाहता हा परमेश्वर सगळीकडे व्यापून उरलेला दिसायला लागतो. आपल्या भक्तावर करुणेच्या सिंधूचा, सागराचा वर्षाव करणारा हा परमेश्वर व्यापक होऊन जातो.

त्याचे व्यापकपण पाहताना काय वाटते? त्याला पाहताना आणि आपल्यातल्या परमेश्वरी अंशाचा साक्षात्कार होताना केवढा आनंद होतो? जणू काही सगळा दिवसच सोन्याने उजळून निघावा आणि आकाशातून अमृताचा वर्षाव व्हावा तसा. विठ्ठलदर्शनाच्या क्षणाची अलौकिकता ज्ञानेश्वर 'सोन्याचा दिवस' आणि 'अमृताचा वर्षाव' या प्रतिमांमधून प्रकट करतात.

या अभंगाची लयही या अलौकिक आनंदाचा ताल पकडणारी अशी आहे. तसेच अल्पाक्षरत्वाचे सामर्थ्यही या अभंगावरून लक्षात यावे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.