A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अगा वैकुंठींच्या राया

अगा वैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिकवरदा ।
अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखीं आतां ॥४॥
कांत - पती.
हरिनिष्ठेची पराकाष्ठा

संत कान्होपात्रा आपले परिवर्तन पूर्णत्वास नेण्यासाठी भक्तिमार्गी का लागल्या? कारण मुळातच त्यांना स्वतःच्या सुंदर आणि निर्मळ (तरीही नश्वरच) देहाचे रौप्य लख्ख करण्यात रस नव्हता. पांडुरंगाला जिवलग मानून आत्म्याचे सोने करायला हरिनिष्ठेच्या मधुर वेदना त्या सोसत राहिल्या आणि थेट पंढरपूरच्या राऊळात जाऊन देह ठेवला. स्वतःचा परमार्थ संसार त्यांनी देवाच्याच दारी थाटला. प्रीती आणि भक्ती यांच्या संयोगाचे अध्यात्म वैष्णवांनीच अनुभवावे. ही उत्कट भावना शब्दांत सांगता येण्यासारखी सुगम नाही. तसा प्रयत्‍न करणेसुद्धा घातक आहे.

कान्होपात्रेचा प्रत्येक अभंग, देवाला करायचा आर्जवही किती परिपक्व असावा, याचा उत्तम नमुना आहे. वरकरणी एका अडाणी महिलेने, 'अगा वैकुंठीच्या राया' अशी आर्त हाक मारून, उगाच 'अगा.. अगा..' करत देवाच्या नावांची लांब यादी दिली आहे, असे हा अभंग ऐकणार्‍यांना वाटू शकते; पण ह्यास हवे 'माळेचे'; अवडंबर्‍यांचे काम नव्हे. देवाच्या प्रत्येक रूपात, नामात आणि बिरुदात साकडे लपलेले आहे. मुळात तो संवाद द्विपक्षी आहे, त्यामुळे तुम्हा-आम्हाला त्याचा बोध झाला तर ठीक. (अथवा ज्याला हाक मारली आहे तो ऐकेलच !).

वैकुंठीच्या राया तुझ्या स्वर्गीय राज्यात मला सामावून घे; सखया विठ्ठला, मला तुझा सांगाती मानून घे; नारायणा माझ्या नरदेहाला गती दे; वासुदेवाच्या नंदना माझे परिपालन कर; पुंडलिकाच्या कृपाळा मलाही तसाच वर दे; विष्णूरूपी गोविंदा मलाही गुणीजनांत स्थान दे आणि रखुमाई वल्लभा आता मलाही पदरात घे… असा हा कृपाभिलाषी भावार्थ उरी धरून, साता समुद्राइतका अथांग भवसागर कान्होपात्रेला पार करायचा आहे. गणिकेच्या पोटी जन्माला आलेली कान्होपात्रेची आर्तता 'अगा' या तिच्या विनवणीतून ओतप्रोत सांडते.

देहात संभाव्य पाप असेल तरी तो शाप ऊर्जित होणार नाही, ही दक्षता घ्यावी लागते, हे तिला पक्के माहीत होते. म्हणूनच आर्ततेच्या पुढे जाऊन कान्होपात्रा 'नको देवराया' या अभंगात उतावीळ होते. प्रत्यक्ष देवालाच 'मोकलूनी आस, जाहले उदास' असे सांगत, 'अंत न पाहण्याचा' कडक इशारा देते. तुझ्याशिवाय तिन्ही लोकांत मला ठावठिकाणा प्राप्त होणे कठीण आहे, तेव्हा 'आई' तू धावून ये (तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई..), ही गयावया साधीसुधी नाही. कान्होपात्रेचा विरह जसजसा ओतप्रोत सांडतो, तसतसा अंगावर काटा उभा राहतो.

एका असाहाय्य महिलेची, निरपेक्ष प्रेमासाठी असणारी ही वणवण आहे, हे आपण विसरता कामा नये. नाहीतर एरवी 'कान्होपात्रा राखी आता' असे तिने का म्हणावे? 'हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले', असे कुणालाही का वाटावे? बीदरच्या बादशहाचा 'विशेष' विसावा मिळत असताना, पंढरीच्या पायरीच्या पायघडी होऊन वैकुंठनिवासी जी कान्होपात्रा आली, ती आजतागायत तिथेच स्थिरावली आहे.

कान्होपात्रेला स्वतःच्या प्रदूषित प्राक्तनाची जेवढी किळस वाटते, तेवढी आपल्याला आपल्याच कलुषित मनाची (कधीतरी) वाटते का?
(संपादित)

सदर- परिमळ
सौजन्य- दै. सकाळ (४ फेब्रुवारी, २०१६)
(Referenced page was accessed on 20 April 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.