उरले मागे कोण?
सदैव चिंता करितो मानव
अखेर तोही कोण?
नसण्यासाठी असणे ही तर
असणार्याची खूण
मनोमनी पटते तेव्हा
होतो ब्रह्मानंद
अवघा आनंदी आनंद
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | राम फाटक, यशवंत देव |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
नाटक | - | अवघा आनंदी आनंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
सप्रेम निवेदन प्रणाम- आनन्द, विशेष ! या जगात बालपणीच थोरपण घेऊन येणारी माणसे अगदी क्वचित ! “देखा काव्य-नाटका, जे निर्धारिता सकौतुका !" ते कौतुक आपण घेऊनच आला आहांत. साहित्य हा आपला सहजधर्म ! ( सवेंच जन्माला असा सह + ज ! )
"अनुभव वेडावला, अनुभूतिपणें"
अनुभवाला वेड लागावें लागतें तेव्हांच त्यांतून अनुभूति निर्माण होते. तो अनुभूति-सांठा आपणांमध्यें सांठला आहे. 'अवघा आनंदी आनंद' हें आपलें नाटक बघून असें वाटल्यावांचून राहिलें नाहीं. आपलीं बहुतेक सर्व नाटकें याच प्रणालींतलीं ! परंतु 'अवघा आनंदी आनंद' हें आगळेंच वैशिष्ट्य ! 'दुर्वाची जुडी' या नाटकावर आलेली ही साय ! या नाटकांतील सुभाषितांची पेरणी हृदयाचा ठाव घेते. ती दाद रसिकांनीं दिलेली प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अत्यंत ध्येयवादी हें नाटक. त्यांत शांत अन् करुण-रसाच्या बरोबरच आलेला विनोद. ज्या विनोदाला पंख आहेत, डंखाचें नांव नाहीं असा ! साहित्य सोनियाच्या खाणीं अन् बोधबोधाची लेणीं ल्यायलेल्या नाटकाला 'अॅवॉर्ड' मिळायला हवें, असेंच वाटतें.
या नाटकांतील गुरुजी या प्रमुख भूमिकेंत आपण इतके तद्रूप होऊन गेला होतां कीं प्रयोग संपल्यानंतर आपल्याला भेटलों. तो आवाज रंगभूमीवर ऐकला, तोच आवाज आणि जातांना आपला निरोप घेतला त्या वेळीही तोच आवाज. भूमिकेशीं आपण किती तद्रूप झाला होतां याची प्रत्यक्ष प्रचीति आली.
वारा वाहून गेला तरी
वृक्षाचा डोल राहून जातो.
भूमीवर पाणी लोळून गेले तरी
ओल राहून जाते.
अशी ती तंद्री. त्या तंद्रीतच आपला निरोप घेतला. तुम्ही चि. बाळ म्हणून शाबासकी दिली, परंतु त्याच्याही वर म्हणजे मी तुमची दृष्ट काढतों. नाटकांतील सुभाषितें आणि संवाद-भाषिते कानांत येऊन हृदयांत ठाव घेणारीं !
जें हें विश्वचि होऊनि असे
परी विश्वपण नासिल्या न नासे
अक्षरें पुसल्या न पुसे
अर्थु जैसा.
तीं अक्षरें, तो अर्थ असाच आपल्या येवो, तो आलेलाच आहे. जास्त काय लिहू? सर्वस्पर्शी असें नाटक !
(संपादित)
सोपानदेव चौधरी
'अवघा आनंदी आनंद' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.