रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी
त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडिली मोठी, आनंदवनभुवनी
येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी
भक्तांसी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी
येथूनी वाचती सर्वे
ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी
उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप-तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी
बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी
गीत | - | समर्थ रामदास |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |
टीप - • प्रतिध्वनी- उषा मंगेशकर, सोनाली राठोड. |
उदंड | - | पुष्कळ. |
संध्या | - | दिवसातून तीन वेळा करण्याची (देवांची) उपासना. |
छत्रपती शिवाजी महाराजांना ६ जून १६७४ या दिवशी राज्याभिषेक झाला. समर्थांना या घटनेमुळे अतिशय आनंद झाला. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी समर्थांनी ५९ कडयांचे अत्यंत भावपूर्ण प्रकरण लिहिले, ते 'आनंदवनभुवन' होय.
'वनभुवन' हे काशीचे पौराणिक नाव आहे. १६३४ साली समर्थ काशीला होते. तिथे त्यांना स्वप्न पडले की, महाराष्ट्रात हिंदूंचा राजा सिंहासनावर बसला आहे.
१६३४ साली पडलेले स्वप्न १६७४ साली खरे झाले. म्हणून ते लिहितात-
स्वप्नी जें देखिलें रात्रीं । तें तें तैंसेंची होतसे ।
हिंडता फिरतां गेलों । आनंदवनभुवना ॥
समर्थांची अशी धारणा होती की औरंगजेबाचे राज्य म्हणजे जणू रावणाचे राज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे रामचंद्रांसारखे तप:पूत जीवन. शिवछत्रपतींच्या प्रयत्नांना यश यावे आणि आपल्याला ते प्रत्यक्ष बघायला मिळावे म्हणून समर्थांनी तुळजाभवानीला 'तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हांची देखता ॥' असे साकडे घातले होते.
- सुनील चिंचोलकर (dasbodh.com)
गुरुदेव रा. द. रानडे यांनी त्यांच्या 'Mysticism in Maharashtra' ग्रंथात लिहिले आहे की, "Anandavana Bhuvana, the 'Region of Bliss' in which Ramadasa gives free vent to his political sentiments.'' याचा अर्थ रामदासांच्या मनात जो राजकीय स्थायीभाव निर्माण झाला होता किंवा त्यांच्या मनात जे राजकीय विचार दाटून आलेले होते, त्यांना रामदासांनी 'आनंदवनभुवनी' या काव्यात मोकळेपणाने वाट करून दिली आहे. रामदासांच्या मनातील राजकीय स्वप्न अथवा राजकीय ध्येय या काव्यात निःसंशय प्रगट झाले आहे, असे म्हणावे लागते. गुरुदेव रानडे पुढे लिहितात, "आनंदवनभुवनी या काव्यात रामदासांनी पुढे काय घडणार आहे ते नजरेसमोर आणून आपले विचार प्रगट केले आहेत." शंकरराव देवांचेही मत असेच आहे. त्यांच्या मते, रामदासांचे 'आनंदवनभुवनी' हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. पुढे घडणार्या गोष्टी समर्थांनी आधीच सांगितल्या म्हणून त्या काव्याला कोणी 'श्रीसमर्थकृत भविष्यपुराण' म्हणतात. समर्थांनी या काव्यात लिहिले आहे की,
स्मरले लिहिले आहे ।
बोलता चालता हरि ।
काय होईल ते पाहावे ।
आनंदवनभुवनी ॥५७॥
समर्थ म्हणतात, पुढे घडणार्या गोष्टी जशा आठवतील तशा लिहून काढल्या. म्हणून या प्रकरणास 'समर्थस्मृती' असेही कोणी नाव देतात. या काव्यातील प्रत्येक चरण हा विचार करण्यासारखा आहे.
स्वामींचे 'आनंदवनभुवनी' हे काव्य मोठे प्रेरक आहे. ते वाचत असताना एक विलक्षण जोम अथवा प्रोत्साहन आपल्या मनात उत्पन्न होते. लेखक भा. वा. भट यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, "प्रचलित जुलमी राजसत्ता उलथवून पाडून त्या ठिकाणी नूतन राजसत्ता प्रस्थापित करायची असेल, तर प्रचलित राजसत्तेसंबंधी लोकांच्या मनात द्वेष वाटायला लावणे व नूतन राजसत्तेसंबंधी प्रेम व आदर उत्पन्न होईल, अशा हालचाली कराव्या लागतात. शिवकालीन महाराष्ट्रात या हालचाली करण्याचे श्रेय रामदासस्वामींनाच दिले पाहिजे." 'आनंदवनभुवनी' या काव्यात रामदासांनी हे साधले आहे. श्री. म. माटे म्हणतात त्याप्रमाणे, " 'आनंदवनभुवनी' या काव्यातील नुसत्या ध्वनीने आपण एखाद्या मोठ्या आक्रमक कार्यप्रसंगात गुंतले आहोत व तसा प्रसंग प्रत्यक्ष पाहत आहोत, असे वाटू लागते." या काव्याच्या सुरुवातीस स्वामींनी, लोक जे दुःख भोगत आहेत, त्यासंबंधी वर्णन केले आहे.
संसार वोढिता दुःखे ।
ज्याचे त्यासीच ठाऊके ।
न सोसे दुःख ते होते ।
दुःख शोक परोपरी ॥३॥
एकंदरीने पाहता समर्थकालीन मुसलमानी राजवटीत हिंदूप्रजेची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. प्रजेला कोणी त्राता उरला नव्हता. जे दुःख वाट्याला आले, ते त्याचे त्यालाच सहन करावे लागत होते. दुसर्या कोणाला सांगून उपयोग नव्हता. त्यावेळी सामान्य माणूस म्हणत होता की, हे देवा, आता पुष्कळ दुःख सोसले. पुरे झाला आता हा संसार. देहत्यागासाठी आता 'आनंदवनभुवनी' यायचे आहे. स्वामींनी हे 'आनंदवनभुवनी' स्वप्नात पाहिले होते.
स्वप्नी जे देखिले रात्री ।
ते ते तैसोचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो ।
आनंदवनभुवनी ॥७॥
स्वामींनी स्वप्नात काय पाहिले होते आणि त्याप्रमाणेच सर्व घडून येताना दिसत आहे, असे स्वामी म्हणतात? यात स्वामींचा नेमके काय म्हणायचे आहे, याचा शोध घेतला पाहिजे. 'विनाशाय च दुष्कृताम्' त्यांच्या काळातील दुष्टांचा संहार व्हावा, अशी रामदासांची प्रबळ इच्छा होती. सज्जनांना, निरुपद्रवी ऋषिमुनींना त्रास देणार्या राक्षसांचा रामाने सर्वनाश केला होता. रामदासांच्या काळातही हिंदू धर्माचा उच्छेद करणारे म्लेंच्छ रावणाप्रमाणे मदांध दैत्याप्रमाणे क्रूरकर्मा होते. रामाने अवतार घेऊन जसा राक्षसांचा, राक्षसीवृत्तीचा, गर्विष्ठ रावणाचा नाश केला, तसा आता शिवरायांच्या अवताराने हिंदवी स्वराज्य उभारले जात असताना या दुरात्मा औरंगजेबाचा शेवट करावा. त्याचप्रमाणे म्लेंच्छांनी उच्छिन्न केलेली तीर्थक्षेत्रे, मंदिरे, देवळे पुनर्स्थापित करावीत, असे रामदासांना वाटत होते. तसे झाल्यावर धार्मिककृत्ये करायला हिंदूंना मोकळे वातावरण तयार होईल. तीर्थक्षेत्रातील उदंड पवित्र जलाचा लोक आनंद घेतील. पण, हे सारे सोप्पे नव्हते. ही भग्न मंदिरे, तीर्थक्षेत्रे पुनर्निर्मितीच्या कामात म्लेंच्छ अनेक विघ्ने निर्माण करतील, हे सर्वांना ठाऊक होते. पण रामदासांच्या मनात होते की, घाबरण्याचे कारण नाही. त्या कामात वीर हनुमान आपले साहाय्य करेल. या पवित्र कार्याच्या आड येणार्या विघ्नांना तो चिरडून रगडून टाकेल, असा विश्वास बाळगा. रामदासांना हे दिसत होते.
विघ्नांच्या उठिल्या फौजा ।
भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली चिर्डिर्ली रागे ।
रडविली बडविली बळे ॥१०॥
स्वधर्माच्या आड येणारी विघ्ने देवाने कापून काढली आहेत. स्वामींना हे चित्र स्पष्ट दिसत होते म्हणून ते पुढे म्हणतात, "हाकबोंब बहू जाली । पुढे खत्तल्ल मांडले।" मुख्य देवच या कार्यासाठी उठल्याने लोकसुद्धा खवळून युद्धास तयार झाले आहेत. 'आनंदवनभुवना'त पुढे असेही दिसत होते की, स्वर्गीची गंगा धावत आली आहे. त्यामुळे तेथील तीर्थाची तुलना कशाशी करता येणार नाही. पूर्वीच्या ग्रंथांतून सांगितले आहे की, गंगेच्या गुप्त प्रवाहात अनेक गुप्त भुवने आहेत. देवांची ही साक्षिरूप भुवने पाहून खूप आनंद होतो. तेथे त्रिभुवनातील देव, गंधर्व, मानव, ऋषिमुनी असे महायोगी पुरुष ब्रह्मांडाचा आनंद घेत आहेत.
सकळ देवांचिये साक्षी ।
गुप्त उदंड भुवने ।
सौख्यासी पावणे जाणे ।
आनंदवनभुवनी ॥१५॥
त्रैलोक्य चालिले तेथे ।
देव गंधर्व मानवी ।
ऋषिमुनी महायोगी ।
आनंदवनभुवनी ॥१६॥
समर्थवाङ्मयात अनेकदा मतभेदाचे प्रसंग येतात. 'आनंदवनभुवनी' या शब्दसमुच्चयाचा अर्थ काय, याबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते, यातील वर्णन शिवकालीन महाराष्ट्राचे आहे. काहींच्या मते, हे वर्णन वाराणसी (काशी) क्षेत्रास लागू आहे. या वादातील निष्कर्षाप्रत पोहोचण्याच्या अगोदर हे मात्र समजून घेतले पाहिजे की, 'आनंदवनभुवनी' काव्य लिहिताना स्वामींचे मन उत्साहाने, उल्हासाने, आवेशाने भरलेले होते.
(संपादित)
सुरेश जाखडी
सौजन्य- दै. तरुण भारत (मुंबई) (१५ एप्रिल २०२०)
(Referenced page was accessed on 21 December 2020)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
बारा वर्षे पुरश्चरण करून श्रीसमर्थ पुढील बारा वर्षे भारत भ्रमणास गेले. संपूर्ण भारतभर चारी दिशांना भ्रमण करून त्यांनी अवघा भारत अगदी जवळून पाहिला, लोकांची हीनदीन अवस्था जाणून घेतली, सनातन हिन्दू धर्माची दूरवस्था त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. समाजातील गोरगरीब, स्त्री-पुरुषांच्या दयनीय अवस्थेस परकीय राजसत्ता कारणीभूत असल्याचे दर्शन त्यांचे अंतःकरणास झाले. परतीच्या मार्गावर असतांना ते काशीच्या रामगंगेच्या तीरावर दैनंदिन साधना उरकून, शांत चित्त होऊन बसले असतांना त्यांचे मनोकाशात भावी हिन्दुस्थानचे अतिभव्य चित्र उभे राहिले. त्याचे चित्रण त्यांनी अनुष्टुप छंदात केले, ते हे 'आनंदभुवन'
जन्मदु:खें जरादुखें । नित्य दु:खे पुनःपुन्हा ।
संसार त्यागणें, जाणें । आनंदवनभुवना ॥१॥
वेधलें चित्त जाणावें । रामवेधीं निरंतरीं ।
रागें हो वीतरागें हो । आनंदवनभुवना ॥२॥
संसार वोढितां दुःखें । ज्याचें त्यासीच ठाउकें ।
परंतु येकदां जावें । आनंदवनभुवना ॥३॥
त्रिविधतापांनी पुन्हापुन्हा पोळलेल्या अशा सांसारिकाने संसारत्याग करून परमार्थ साधण्यासाठी काशीक्षेत्री अर्थात 'आनंदवनभुवनी' जावे, असं श्रीसमर्थ सांगत आहेत. जन्मदुःख, वृद्धापकाळचे दुःख आणि इतर सारी कष्टांची दुःखे भोगणार्या जिवांनी एकदा या पवित्र आनंदवनभुवनी जावेच. 'रागे हो' म्हणजे कोणी आसक्त प्रापंचिक असो वा वितरागी म्हणजे 'वैराग्य' आलेला असो, त्याच्या चित्ताला या आनंदवनभुवनी सतत-निरंतर श्रीरामरायाचाच वेध लागतो, हे जाणावे. (राग म्हणजे आसक्ती, वि म्हणजे विगत - नाहीसे होणे. विगतः रागः यस्मात विरागः । विरागस्य भवः वैराग्यम् ॥ वीतरागाची स्थिती ते वैराग्य होय.) हा संसार-गाडा ओढतांना काय दुःख भोगावे लागते ते ज्याचे त्यासच ठाऊक असते. तेव्हां हे सारे ध्यानांत घेऊन त्याने एकदा तरी या आनंदवनभुवनी जावेच !
न सोसे दुःख तें होतें । दुःख शोक परोपरी ।
येकाकी येकदां जावें । आनंदवनभुवना ॥४॥
कष्टलों कष्टलें देवा । पुरे संसार जाहला ।
देहत्यागासि येणें हो । आनंदवनभुवना ॥५॥
जन्म ते सोसिले मोठे । अपाय बहुतांपरीं ।
उपायें धाडिलें देवें । आनंदवनभुवना ॥६॥
या संसारात सोसवणार नाही असे दारूण दुःख भोगावे लागते, परोपरीने दुःख व शोक होतो पण एकाकीपणे एकदा आनंदवनभुवनी अवश्य जावे. हे देवा ! कितीहि कष्ट झाले, काबाडकष्ट झाले, संसाराचा वीट येऊन तो पुरेसा जाहला कि या आनंदवनभुवनासारख्या पवित्र स्थळी देह त्यागण्यासाठी तरी अवश्य येणे व्हावे. अनेक जन्म हे मोठे दुःख सहन केले, खूप अपाय झाला. त्यामुळे देवानेच आता या आनंदवनभुवनी पाठवून चांगला मार्ग दाखवून उपाय केला असे.
स्वप्नी जें देखिलें रात्रीं । तें तें तैंसेंची होतसे ।
हिंडता फिरतां गेलों । आनंदवनभुवना ॥७॥
हे साक्ष देखिली दृष्टी । किती कल्लोळ उठिले ।
विघ्नघ्ना प्रार्थिलें गेलों । आनंदवनभुवना ॥८॥
स्वधर्माआड जें विघ्नें । तें तें सर्वत्र उठीलीं ।
लाटिलीं कुटिलीं देवें । दापिलीं कापिलीं बहू ॥९॥
रात्री स्वप्नात जे जे पाहिले होते, अगदी तसेच सर्व प्रत्यक्ष होत आहे याची प्रचिती आली. हिंडत फिरत फिरतच मी या आनंदवनभुवनी येऊन पोचलो. हे प्रत्यक्ष मी आता माझ्या दृष्टीने पाहिले नि मनात असंख्य कल्लोळ उठले. विघ्नहर्ता गणरायाची प्रार्थना करून तीर्थयात्रा करत येथे या आनंदवनभुवनी येउन पोचलो. स्वधर्माच्या आड येणारी सारी विघ्ने, संकटे प्रत्यक्ष देवानेच हरण केली. त्या संकटांचा चक्काचूर करून दूर लोटली, अनेकानेक विघ्ने कापून नष्टप्राय केली त्या देवाने !
विघ्नाच्या उठिल्या फौजा । भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली चिर्डिली रागें । रडविलीं बडविलीं बळें ॥१०॥
हाकिलीं टांकिलीं तेणें । आनंदवनभुवनीं ।
हांकबोंब बहू जाली । पुढे खतल्ल मांडिलें ॥११॥
खौळले लोक देवाचे । मुख्य देवची उठीला ।
कळेना काय रे होतें । आनंदवनभुवनीं ॥१२॥
अनेकानेक महासंकटे उद्भवली पण भीमपराक्रमी हिन्दुस्थानी सैनिकांनी त्यांचा लिलया समूळ नाश केला. रागारागाने ती संकटे त्यांनी चिरडून टाकली. बळाने शत्रुसैनिकास रडवले, बदडून काढले नि त्यांना हाकलून लावले. आनंदवनभुवनी शत्रुने शस्त्रे टाकून पळ काढला. खूप आरडाओरड, बोंबाबोंब झाली. शत्रुसैन्याची कत्तल झाली. देव सैन्य अत्यंत खवळल्याने आणि मुख्यदेव म्हणजे जनता जनार्दनरुपी स्वतः श्रीरामच युद्धास उभा ठाकल्याने हे सारे घडून आले. तरी या आनंदवनभुवनी हे असे काय होत आहे तेच कळेनासे झाले आहे.
स्वर्गीची लोटली जेथें । रामगंगा महानदी ।
तीर्थांसि तुळणा नाहीं । आनंदवनभुवनीं ॥१३॥
ग्रंथीं जे वर्णिली मागें । गुप्तगंगा महानदी ।
जळांत रोकडें प्राणी । आनंदवनभुवनीं ॥१४॥
सकळ देवची साक्षी । गुप्त ऊदंड भूवनें ।
सौख्यचि पावणें जाणें । आनंदवनभुवना ॥१५॥
या आनंदभुवनी स्वर्गातली रामगंगा महानदी आली असून गीतादि धर्मग्रंथात पूर्वी तिचे महागंगा, गुप्तगंगा असे वर्णन केले आहे. तिच्या तीर्थाची तुलना इतर कशाशीच होऊ शकत नाही. या आनंदवनभुवनाच्या नदीच्या पाण्यात मोठमोठाले प्राणी प्रत्यक्ष दिसतात. (रोकडे - प्रत्यक्ष) (याच गुप्तगंगेचा 'चंचळनदी' अर्थात मायानदी असा उल्लेख दासबोधात केला आहे. चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणं पावन करी जगा । दा.११.७.) या गुप्तगंगेस अर्थात मायानदीस सकळ सगुण देव साक्षीरूप आहेत. गुप्त पण पुष्कळ भुवने येथे आहेत. अशा या पवित्र रामगंगेत स्नानादि कर्मे करून सौख्यानंदाचा लाभ व्हावा यासाठी या आनंदवनभुवनी अवश्य जाणे घडावे.
त्रैलोक्य चालिलें तेथें । देव गंधर्व मानवी ।
ऋषी मुनी महायोगी । आनंदवनभुवनीं ॥१६॥
अक्रा अक्रा बहु अक्रा । काय अक्रा कळेचिना ।
गुप्त तें गुप्त जाणावें । आनंदवनभुवनीं ॥१७॥
त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्य बंदविमोचनें ।
मोहीम मांडली मोठी । आनंदवनभुवनीं ॥१८॥
आनंदवनभुवनी या अखिल त्रैलोकातून देव, गंधर्व आणि मानव येत असतात. हिमालयातून येणारे संतसज्जन ते देवलोक, गांधार प्रदेशातून येतात ते गंधर्वलोक, सखल भागातून येणारे ते मानव लोक, ऋषी, मुनी, महायोगी, साधक येथे सौख्यानंदाचा लाभ व्हावा या हेतूने येतात. अकरा अकरा असे पुष्कळ अक्रा येथे या येणार्यात येतात. पण हे अकरा म्हणजे काय ते मात्र कळतच नाही. ते गौप्य या आनंदवनभुवनी सद्गुरुकडून जाणून घ्यावे.
(अनंत रामदासी 'आत्मानुभाव' या ग्रंथात याचा उलगडा करून सांगतात: 'येकीयेक ऐक्य ब्रह्म । गुरुशिष्य दोनी परब्रह्म । येकादेश हे अंकवर्ण । सहजसमाधी सांगितले ॥ एक एक या दोन्ही आंकड्याच्या ऐक्यातून जसा अकरा हा आंकडा सहज साकार झाला तद्वत गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मच सिद्ध होय. ११ ह्या आकड्याचे हे वर्म सहजसमाधीत विशद केले असे. देव-भक्त, प्रकृति-पुरुष हेहि ११ प्रमाणे एकरूप होत. श्रीसमर्थांचा अत्यंत आवडता श्रीहनुमंत हा अक्रावा रुद्र म्हणून प्रसिद्ध असून श्री.गिरिधर स्वामींनी 'श्रीकरुणारुद्र' मध्ये त्या हनुमंताची करुणा अकरा अक्षरी 'स्वागता' वृत्तांत भाकली असून प्रत्येकी ११ श्लोकांचे एक स्तोत्र याप्रमाणे अकरा स्तोत्रांत हे हनुमान चरित्र वर्णन केले आहे. तसेच 'निवृत्तिराम' या ग्रंथात त्यांनी २१व्या समासात १८ ते २२ या पाच ओव्यात बहु अकराचा खुलासा वरीलप्रमाणेच केला आहे. असे हे 'बहु अकरा' येथे थोडक्यात विशद केले असत.)
या आनंदवनभुवनी, श्रीसमर्थ त्रैलोकातून फौजा चालल्याचे दृश्य त्यांच्या दिव्य चक्षूतून अनुभवत आहेत. साधक, मुनी सज्जनादिंच्या सौख्यानंदास, परब्रह्मपदी लीन होण्यास बंधन ठरणार्यापासून मुक्तता लाभावी म्हणून (सौख्य बंद विमोचने) ह्या फौजांनी नुसता हलकल्लोळ मांडला असून फार मोठी मोहिमच त्यांनी उघडली आहे.
सुरेश उठिला आंगे । शूरसेना परोपरी ।
विकटें कर्कशें यानें । शस्त्रपाणी महाबळी ॥१९॥
देव देव बहू देव । नाना देव परोपरीं ।
दाटणी जाहाली मोठी । आनंदवनभुवनीं ॥२०॥
दिग्पती चालिले सर्वे । नाना सेना परोपरीं ।
वेष्टित चालिले सकळै । आनंदवनभुवनी ॥२१॥
देवांधिदेवांचा ईश तो सुरेश आपल्या अतुलनीय अंगबळाच्या जोरावर उठून सज्ज झाला आहे, सोबत विकट-गंभीर नि भयंकर, कर्णकर्कश यांना घेऊन, हाती शस्त्रे धारण करून महाबली अशी शूरसेना परोपरीने चालली आहे. अनेक देव सदृश महादेव परोपरीने सोबत असल्याने खूप दाटी या आनंदवनभुवनी झाली असे. सगळे दिग्पाळ या अनेकानेक शूरसेनेसोबत चहुबाजुंनी सर्वांना वेढून चालले असल्याचे दिव्य दृश्य या आनंदवनभुवनी दिसत आहे. असे दिव्य दृश्य श्रीसमर्थ आता अनुभवत आहेत.
मंगळें वाजती वाद्यें । महागणा समागमें ।
आरंभीं चालिला पुढें । आनंदवनभुवनीं ॥२२॥
राशभें राखिलीं मागें । तेणें रागेंची चालिला ।
सर्वत्र पाठीसीं फौजा । आनंदवनभुवनीं ॥२३॥
अनेक वाजती वाद्यें । ध्वनीकल्लोळ उठीला ।
छबीनें डोलती ढाला । आनंदवनभुवनीं ॥२४॥
विजई दीस जो आहे । ते दीसीं सर्व उठती ।
अनर्थ मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥२५॥
या आनंदवनभुवनी चालणार्या या शूरसेनेत विजय सूचक मंगल वाद्यांचा महाघोष चालू आहे. या महागणांचा ईश तो गणेश त्या समागमे असून तो आरंभापासूनच सर्वात पुढे राहून चालला आहे. मागे (रामाच्या वेळेस) रासभे (गाढवे) राखावी लागल्याचा राग मनी धरून हा गणपती यावेळेस या देवसेनेला विजय मिळवून देण्याचे हेतूने सर्व फौजा मागे ठेऊन पुढे होऊन चालला आहे. अनेक वाद्यांच्या ध्वनीने सारा हलकल्लोळ उठला आहे. छबिने, चामरे ढाळत, डोलत चालली आहेत. विजयादशमीचा हा मंगलदिन असून त्याच दिवशी विजयाचे हेतूने सर्व शूरवीर दुष्टांच्या संहारास सज्ज होतात. दुष्टांसाठी असा हा मोठा अनर्थकारक प्रसंग या आनंदवनभुवनी निर्माण झाला असल्याचे स्पष्ट चित्र श्रीसमर्थांना दिसत आहे.
(विजयादशमीचा मुहूर्त साधून मराठ्यांच्या फौजा मुलुखगिरीस बाहेर पडत असत. ही पद्धत छत्रपती शिवरायाचे वेळीही होती, हे यावरुन स्पष्ट होते)
देवची तुष्टला होता । त्याचे भक्तीस भुलला ।
मागुता क्षोभला दुखें । आनंदवनभुवनीं ॥२६॥
कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छ दैत्य बुडावया ।
कैपक्ष घेतला देवीं । आनंदवनभुवनीं ॥२७॥
बुडाले सर्व ही पापी । हिन्दुस्थान बळावलें ।
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनीं ॥२८॥
देवाधिदेव महादेव स्वतःच भक्तांच्या भक्तीस भुलला आणि संतोषापोटी त्याने त्या भक्तास (रावणास) वर दिला. त्याने त्या वराच्या जोरावर देवांनाच बंदिवासात टाकले आणि सीताहरणही केले. त्यामुळे मागाहून तो महादेव दुःखाने क्षोभित झाला, असे दृश्य श्रीसमर्थांना या आनंदवनभुवनी दिसले. आताही अगदी तसेच घडत आहे, असे त्यांना वाटले. आताही धर्मवीर छत्रपपती शिवरायांनी म्लेंच्छसंहार करण्याचा घाट घातला असता भला मोठा कल्पांतसदृश्य प्रलयच झाला. त्यावेळी या आनंदवनभुवनी प्रत्यक्ष देवांनीच या धर्मवीरांची बाजू घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. सर्व पापी बुडाले, हिन्दुस्थान बळावले, अभक्तांचा क्षय झाला, असे श्रीसमर्थांना दिसले.
(या पापी यवनांच्या तावडीतून संपूर्ण हिन्दुस्थान मुक्त व्हावा, असा भविष्यकाळच जणू श्रीसमर्थ आता पहात असावेत असे वाटते.)
पूर्वी जे मारिले होते । तेचि आतां बळावले ।
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ॥२९॥
त्रैलोक्य गांजिलें मागें । ठाउकें विवेकीं जना ।
कैपक्ष घेतला रामें । आनंदवनभुवनीं ॥३०॥
भीमची धाडिला देवें । वैभवें धांव घेतली ।
लांगूळ चालिलें पुढें । आनंदवनभुवनीं ॥३१॥
पूर्वी म्हणजे रामरावण युद्धात जे दैत्य राक्षस मारले गेले, तेच आता पुन्हा एकदा प्रबळ होऊन जनतेस त्रास देत आहेत, त्यामुळे देवांचा देव श्रीराम कोपाविष्ट झाले आहेत. रामायणकाळी सारे त्रैलोक्य या दैत्य राक्षसांनी अगदी गांजले होते. तेव्हांही श्रीरामानी त्रैलोक्याला त्यांच्या तावडीतून जसे सोडवले, तसेच आताही ते या आनंदवनभुवनी धर्मवीरांचा कैपक्ष घेऊन सोडवतील असा विश्वास श्रीसमर्थांना वाटत आहे. श्रीरामांनी भीमरूपी महारूद्र मारुतीस शत्रूवर चढाई करण्यासाठी पाठविले, त्यामुळे मराठ्यांचा राज्यविस्तार होऊन (लांगूळ चालले) त्या वैभवाने अपोआप धाव घेतली.
येथून वाढला धर्मु । रमाधर्म समागमें ।
संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥३२॥
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छसंहार जाहला ।
मोडली मांडली क्षेत्रें । आनंदवनभुवनीं ॥३३॥
बुडाले भेदवाही ते । नष्ट चांडाळ पातकी ।
ताडिले पाडिले देवें । आनंदवनभुवनीं ॥३४॥
आता या आनंदवनभुवनी परिणामस्वरुपी धर्माची वाढ झाली आहे, धर्मसंस्थापना होऊन रमाधर्माची म्हणजे लक्ष्मीचे वैभव वाढीस लागले आहे. पापी औरंगजेबाचा निप्पात झाला, दुष्ट म्लेंच्छांचा संहार झाला. मोडलेली तीर्थक्षेत्रे, देवालये पुन्हा नव्याने बांधली. माणसामाणसातील उच्च-नीचतेचे, जातीपातीचे सर्व भेदभाव मिटले. नष्ट, दुष्ट, चांडाळ यांचा या आनंदवनभुवनी देवांनीच पुरता नायनाट केला, असे चित्र श्रीसमर्थांच्या चर्मचक्षुंसमोर तरळले.
गळाले पळाले मेले । जाले देशधडी पुढे ।
निर्मळ जाहाली पृथ्वी । आनंदवनभुवनी ॥३५॥
उदंड जाहलें पाणी । स्नान संध्या करावया ।
जप तप अनुष्ठानें । आनंदवनभुवनीं ॥३६॥
नाना तपें पुरश्चरणें । नानाधर्म परोपरीं ।
गाजली भक्ति हे मोठी । आनंदवनभुवनीं ॥३७॥
लिहिला प्रत्ययो आला । मोठा आनंद जाहाला ।
चढता वाढता प्रेमा । आनंदवनभुवनीं ॥३८॥
ते दुष्ट व पापी लोक पळाले, काही मेले आणि काही त्यांच्या कुकर्मामुळं देशोधडीस लागले. अशारीतीने त्या दुष्ट व पापी लोकांचा या पृथ्वीवरील भार कमी झाला आणि ही धरती निर्मळ झाली. या आनंदवनभुवनी स्नान, संध्या, जप, तप, अनुष्ठाने इत्यादि निर्भयपणे करावयासाठी शुद्ध, निर्मल असे उदंड पाणी उपलब्ध झाले. नाना प्रकारची तपे आणि पुरश्चरणे, परोपरीचे विविध धर्माचरण विधी, महान भक्तीचे उपक्रम इ. निर्विघ्नपणे व आनंदाने पार पडू लागले. या आनंदवनभुवनी याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला तेच येथे लिहिले. मोठा आनंद झाला. प्रेम आणि आनंद यांचे चढते वाढते दृष्य श्रीसमर्थ अनुभवते झाले.
बंडपाषांड उडालें । शुद्ध अध्यात्म वाढलें ।
राम कर्ता राम भोक्ता । आनंदवनभुवनीं ॥३९॥
देवालयें दीपमाळा । रंगमाळा बहुविधा ।
पूजिला देव देवांचा । आनंदवनभुवनी ॥४०॥
रामवरदायिनी माता । गर्द घेउनी उठिली ।
मर्दिले पूर्विचे पापी । आनंदवनभुवनीं ॥४१॥
प्रत्यक्ष चालिली राया । मूळमाया समागमें ।
नष्ट चांडाळ ते खाया । आनंदवनभुवनीं ॥४२॥
या आनंदवनभुवनी यवन-म्लेंछांचे बंड आणि पाखंड्याचे पाखंडी मत मोडून पडले. त्यामुळे शुद्ध अध्यात्म वाढीस लागले. सर्वत्र देवालये, दीपमाळा, बहुविध रंगीत माळा शोभून दिसत होत्या. येथे या आनंदवनभुवनी देवांचा देव श्रीरामरायाची पूजा अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने संपन्न झाली. राम-रावण युद्धप्रसंगी ज्या मातेने श्रीरामाना वर दिला होता तीच आता स्वतः शस्त्रसज्ज होऊन उठली आहे, त्या आदिमायेने पूर्वीचेच पापी आणि दुष्ट असलेल्या लोकांचे मर्दन करून त्यांचा पुरता नाश केला. प्रत्यक्ष त्या शिवराया सोबत ही मूळमाया आदिशक्ती देवीभवानी शस्त्रसज्जतेने चालत असून, त्या दुष्टपापी नि चांडाळ लोकांना खायलाच ती चालली आहे, असे विकटदृष्य या आनंदवनभुवनी श्रीसमर्थांचे दिव्यदृष्टी समोर तरळत राहिले.
भक्तांसी रक्षिले मागे । आतांही रक्षिते पहा ।
भक्तांसी दीधलें सर्वे । आनंदवनभुवनीं ॥४३॥
आरोग्य जाहाली काया । वैभवें सांडिली सीमा ।
सार सर्वस्व देवाचें । आनंदवनभुवनीं ॥४४॥
देव सर्वस्व भक्तांचा । देव भक्त दुजें नसे ।
संदेह तुटला मोठा । आनंदवनभुवनीं ॥४५॥
देव भक्त येक जाले । शमळाले जीव सर्वहि ।
संतोष पावले तेथें । आनंदवनभुवनीं ॥४६॥
आदिमाया आदिशक्तीने पूर्वी जसे भक्तांचे रक्षण केले तसेच ती आताही करेल. या आदिशक्तीच्या उपासनेने शारीरिक आरोग्यासह अमर्याद असे वैभवही मिळेल. या आनंदवनभुवनी जगतास कारण ठरणारी आदिशक्ती हीच देवाचे सार सर्वस्व आहे. देव सर्वस्वपणे भक्तांचा म्हणजे देव आणि भक्त एकच होत, त्यांच्यात भिन्नत्व नसतेच. देवभक्त एक झाले, संदेह मिटला. या आनंदवनभुवनी सारे जीव संतोष पावले.
सामर्थ्ये यशकीर्तीची । प्रतापे सांडिली सीमा ।
ब्रीदेंचि दीधलीं सर्वे । आनंदवनभुवनीं ॥४७॥
राम कर्ता राम भोक्ता । रामराज्य भूमंडळीं ।
सर्वस्व मीच देवाचा । माझा देव कसा म्हणों ॥४८॥
हेंचि शोधूनि पाहावें । राहावें निश्चळीं सदा ।
सार्थक श्रवणें होतं । आनंदवनभुवनीं ॥४९॥
देव भक्तांच्या सामर्थ्याने नि यशकीर्तीने अमर्याद प्रताप केला. त्यांने सर्वकाही आपल्या भक्तांना दिले नि आपले ब्रीद राखले, (ब्रीद म्हणजे प्रतिज्ञा, हे ब्रीद दोन प्रकारचे. एक आत्मज्ञान देऊन मुक्त करणे, दोन दुर्जनांचा नाश करून रक्षण करणे). या भूमंडळीच्या रामराज्याचा श्रीराम हाच कर्ता आणि तोच भोक्ता होय. सर्वस्वपणे मीच देवाचा झालो, तेव्हा माझा देव असं कसं म्हणू? हेच या आनंदवनभुवनी शोधून पहावे आणि सदैव निश्चळ राहावे आणि श्रवणानेच सार्थक होते, ते जाणावे.
वेद शास्त्र धर्मचर्चा । पुराणे महात्में किती ।
कवित्वें नूतनें जीर्णे । आनंदवनभुवनीं ॥५०॥
गीत संगीत सामर्थ्ये । वाद्यकल्लोळ उठीला ।
मिळाले सर्व अथार्थी । आनंदवनभुवनीं ॥५१॥
वेद तो मंद जाणावा । सिध्द आनंदवनभुवनीं ।
आतुळ महिमा तेथें । आनंदवनभुवनीं ॥५२॥
मनासी प्रचीत आली । शब्दीं विश्वास वाटला ।
कामना पुरती सर्वे । आनंदवनभुवनी ॥५३॥
या आनंदवनभुवनी अनेक महान आत्मे, सज्जन वेदशास्त्र, धर्मचर्चा, पुराणे, नविन आणि (जीर्ण) जुने कवित्व यांची मनःपूत चर्चा करून लोकांना शहाणे, ज्ञानी करीत आहेत. गीत, संगीताचे सामर्थ्य आणि वाद्याचा कल्लोळ ईठला आहे. विशेषतः (अर्थार्थी) असे सर्व काही आपोआप मिळाले, वेदज्ञानही (वेद तो मंद) जेथे फिके पडावे, असे सिद्ध साधुपुरुष या आनंदवनभुवनी अत्यंत आनंदाने विराजत आहेत. (असा अर्थ असावा असे वाटते) त्यांचा महिमा अतुलनीय असा आहे. या आनंदवनभुवनी माझ्या मनास याची प्रचिती आली. त्याचा प्रत्यक्ष (शब्दी) विश्वास वाटला आणि सर्व कामना, आशाआकांक्षा फलद्रुप झाल्या, असे श्रीसमर्थांना आता वाटत आहे.
येथुनी वांचती सर्वे । ते ते सर्वत्र देखती ।
सामर्थ्य काय बोलावे । आनंदवनभुवनीं ॥५४॥
उदंड ठेविलीं नामें । आपस्तुतीच मांडिली ।
ऐसें हे बोलणें नाहिं । आनंदवनभुवनीं ॥५५॥
बोलणे वाउगे होतें । चालणे पाहिजे बरें ।
पुढे घडेल तें खरें । आनंदवनभुवनीं ॥५६॥
आता या आनंदवनभुवनी येथून पुढे जे जे येतील तेते सारे येथील वैभवाचे, त्या अचाट सामथ्याथचे प्रत्यक्ष लाभ घेतील. (शिवरायाच्या) या सामर्थ्याचे अफाट नावे ठेऊन कौतुक करीत आहोत, जणुकाही आपस्तुतीच मांडली आहे येथे ! परंतु हे बोलणे असे तसे उगाच नाही आहे. ते वाउगे असते तर तसे ते कसे बरे चालेल? जे बोलतो आहे, ते पुढे घडेल ! या आनंदवनभुवनी ते निश्चितपणे खरे होईल ! असा विश्वास श्रीसमर्थांना आता वाटतो आहे.
स्मरलें लिहिलें आहे । बोलता चालता हरी ।
काय होईल पहावें । आनंदवनभुवनीं ॥५७॥
महिमा तो वर्णवेना । विशेष बहुतांपरीं ।
विद्यापीठ तें आहे । आनंदवनभुवनीं ॥५८॥
सर्वसद्या कळा विद्या । न भूतो न भविष्यति ।
वैराग्य जाहालें सर्वे । आनंदवनभुवनीं ॥५९॥
जय जय रघुवीर समर्थ ! श्रीराम समर्थ !!
स्वप्नी जे पाहिले ते सारे जसे स्मरले, आठवले ते इथे लिहिले आहे. चालता बोलता तो प्रत्यक्ष श्रीहरी आहे. (यात माझे काय कौतुक?) या आनंदवनभुवनी जे काही होईल ते पहात राहावे हेच खरे ! हे तर विद्येचे माहेर घर, विद्येचेपीठ होय. त्याचा विशेष आणि बहुतकरून महिमा किती वर्णावा बरे ! या अलौकिक आनंदवनभुवनी न भूतो न भविष्यति अशा सर्व कला, विद्या यांचा संगम झाला आहे. सकळ वैराग्याचा येथे सुकाळ झाला आहे. हे आनंदवन भुवन सवार्थाने सकळसंपन्न झाले आहे, असे चित्र आतां समोर तरळते आहे !
जयजय रघुवीर समथथ! श्रीराम समथथ! श्रीराम !श्रीराम !!
इदं न मम ! श्रीकृष्णार्पणमस्तु !
(शुक्रवार मार्गशिर्ष १५ (पौर्णिमा) नंदननाम संवत्सर शके १९३४ (२८ डिसेंबर २०१२) रोजी बंटकॉमन्स अपार्टमेंट ३०, वार्टबर्ग अवेन्यु कोपेग-न्युयॉर्क-युएसए येथे लेख पूर्ण केला असे.)
(संगणकीय लेख - पु. ज्ञा. कुलकर्णी, अमरेंद्रश्री सोसायटी, गणेश मळा, पुणे ३०)
(संपादित)
(Referenced page was accessed on 21 December 2020)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.