A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आम्ही दैवाचे शेतकरी

आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम, स्मरू नाम, मुखी राम-हरी रे

प्रानावानि पिर्ती रानी
जुपुनिया बैल गुनी
कष्ट क्येलं नांगरुनी
देवाची स्वारी आली मिरगावरी रे

धान्याची पेर झाली
लक्षुमिनं किरपा केली
मोत्याची रास दिली
शिवारी पीक डोले राजापरी रे

नाचत्याती पोरं थोरं
बागडती गुरं ढोरं
चला जाऊ समद्या म्होरं
बिगी बिगी बिगी बिगी गाडी हाकू खळ्यावरी रे
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- वसंत देसाई
चित्रपट - संत ज्ञानेश्वर
ताल-दादरा
गीत प्रकार - चित्रगीत
खळे - शेत.
पेर - तुकडा.
शिवार - शेत.
माझ्या दृष्टीने प्रसंगोचित असे हे गाणे आहे. आळंदीचा त्याग करून ज्ञानदेवादि भावंडे गावाबाहेर पडतात. बरेच दिवस प्रवास झाल्यावर त्या एकाकी पोरांना पाहून एका गाडीवाल्या शेतकर्‍याला त्यांची कणव येते. तो त्यांची चौकशी मोठ्या कळवळ्याने करतो. "माणसाने माणसाला धर्मक्षणाकरिता वाळीत टाकले" हे ऐकून तो सर्द होतो. तो या अनाथ पोरांना गाडीत बसवतो. गाडीच्या चालत्या लयीत मुक्त कंठाने शेतकर्‍यांच्या जीवनाचे, त्याच्या माणूसधर्माच्या पालनाचे वर्णन असलेले गाणे म्हणत पोरांना खळ्यावर घेऊन जातो.

आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम, स्मरू नाम, मुखी राम-हरी रे

या गाण्याचा आशय त्याच्या जीवनाशी पुरेपूर संबद्ध आहे. त्यात मुक्या जनावरांचे प्रेम आहे. कष्टाचे महत्त्व आहे. वरुणदेवावर श्रद्धा आहे. या भाबड्या जीवाचे सर्वांभूती असलेले प्रेम पाहून ज्ञानदेवाला हर्ष होतो. गाडीच्या लयीबरोबर गाडीवाला तालावर गाऊ लागतो. मधूनच निरनिराळे पक्षीही त्याला आपल्या मंजूळ कूजनाने साथ देतात. बैलांच्या खुरांच्या व गाडीच्या चाकांच्या तालबद्ध खडखडाटाने गाडीवाल्याला ताल मिळतो.

मुखडा गायल्यावर एक तालवाद्य वाजू लागते. हे वाद्य म्हणजे डवरी लोक वाजवतात ते 'चवणगे'. ते डाव्या काखेत धरून त्यात वादी असते ती डाव्या हातात धरून कमीजास्ती ताणायची असते. जास्त ताणली की स्वर चढतो. सैल केली की स्वर उतरत जातो. उजव्या हाताचा अंगठा आणि पहिल्या बोटाच्या चिमटीत धरून ती वादी उचलून सोडायची असते. सोडली की 'क्वॅक' असा नाद उमटतो. या वाद्यामुळे ताल आणि चढाउतरा सूरही उमटतो. हा नाद फारच वेगळ्या जातीचा, किंचित हसविणारा असा येतो. माणसाच्या वृत्ती त्यामुळे ताणल्या असल्यास हलक्या होतात. शिवाय हे वाद्य ग्रामीण असल्यामुळे त्या वातावरणाची आठवण करून देते. म्हणून या वाद्यानेच मी तालाची सुरुवात केली. ते वाजाविणारे दोन निष्णात डवरी शुक्रवारपेठेतून हुडकून आणले. आठ दिवस त्यांना त्या गाण्यात ते कसे वाजवायचे ते शिकवले.

राजा नेने यांच्याजवळ हे गाणे कसे 'घ्यायचे' याची शांतारामबापूंनी चर्चा केली होतीच. मीही हे गाणे पडद्यावर नाट्यमय कसे दिसावे हे कल्पनाचक्षूंनी पाहूनच बसविले होते. तसेच ते पडद्यावर राजा नेने यांनी चित्रित केले. विशेषत: शेवटचा झटका गाडीला मिळतो (बिगी बिगी गाडी हाकू) आणि गाडी भरधाव सुटते, एक वळण घेऊन बैल चौखूर उधळतात, ते दृश्य अत्यंत परिणामकारी आणि माझ्या कल्पनेच्याबाहेर सुंदर दिसले. अर्थात शांताराम आठवल्यांनीही हवे तसे रचले होते.

वसंत देसाई गाडीवान शोभले. गाणेही त्यांनी ग्रामीण तर्‍हेने म्हटले. ही चाल त्यांनीच रचल्यामुळे आपुलकीने त्यांच्या या गाण्याला आगळे सौंदर्य चढले.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.