A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आम्ही भारतीय भगिनी

पिढ्यापिढ्यांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी
आम्ही भारतीय भगिनी !

अष्टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारू
देवत्वाच्या गुढ्या उभारू, दानव संहारू
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या करकंकणी
आम्ही भारतीय भगिनी !

रणधीरांच्या सन्‍निध आम्ही स्फूर्तीसह राहू
रथचक्राच्या आंसाठायी घालू निजबाहू
घडवू रामायणे, शत्रुचा मद उतरू रावणी
आम्ही भारतीय भगिनी !

शस्त्रही दिसते शोभून आमुच्या शोभिवंत हाती
भौम मातता चारू त्याला सैन्यासह माती
स्त्रीहट्टाच्या बळे बहरवू स्वर्गसुखे अंगणी
आम्ही भारतीय भगिनी !

रणयागांतरी सर्वस्वाच्या आहुती टाकू
अभिमन्यूच्या बसू रथावर, अश्वाते हाकू
सती उत्तरेपरी आवरू डोळ्यांतच पाणी
आम्ही भारतीय भगिनी !

जिजा, अहिल्या, झाशीवाली आमुचीच रूपे
सुताऽवतारे जितली युद्धे आमुच्या संतापे
आ-शशीतरणि स्वतंत्र राखू भारतीय धरणी
आम्ही भारतीय भगिनी !