A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आला स्वप्‍नांचा मधुमास

आला स्वप्‍नांचा मधुमास
उमलवीत उरिंचा उल्हास

निद्रेच्या भूमीवर फुलल्या
स्वप्‍नसुमांच्या कळ्या कोवळ्या
मूक मनीषा अंतरांतल्या
उधळती स्वैर सुवास

ही नटवी प्रीतीची कलिका
घडि घडि दावी अनंतरूपा
धुंद करी अर्पुनि मनमधुपा
अद्‍भुत प्रणयविलास

टवटवलीं मृदु शैशवसुमनें
लेवुनि तें मधुमंगल लेणें
अनिर्बंध मन गुंगत गाणें
भोगी छंदसुखास

जागृतींत जें जें वांच्छियलें
तें तें या स्वर्भूमधि रुजलें
रसरंगें अंतर्जग नटलें
नाचत जीवन रास