पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा
आजवरी यांना किती जपलं जपलं
काळजाचं पाणी किती शिंपलं शिंपलं
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा
येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, आशा भोसले |
चित्रपट | - | हा खेळ सावल्यांचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
चेतवणे | - | उद्दीपित करणे, पेटवणे. |
नवती | - | नवी पालवी. |
सई | - | मैत्रीण. |
या गाण्याचा चित्रपटातील प्रसंग लक्षात घेतला तर त्यात ती नायिका आणि तिच्या मैत्रिणी, भाताच्या शेतात काम करताना हे गाणं म्हणतात.
भाताची रोपं सुरुवातीला एका ठिकाणी लावली जातात व थोडी वाढ झाल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण वेगळ्या ठिकाणी होते, जिथे त्यांची पूर्ण वाढ, जोपासना होते.
त्यामुळे इथे भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलींची उपमा दिली आहे. जशा त्या एका घरी जन्माला येतात आणि काही काळानंतर त्यांचे संगोपन एका वेगळ्या घरी होते.
भाताच्या रोपांसाठी कन्येच्या पाठवणीचं रूपक वापरण्याची कल्पना चित्रपटाचे दिग्दर्शक वसंतराव तथा अप्पा जोगळेकर यांचीच.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.