बीज अंकुरलें रोप वाढलें
एका बीजापोटीं, तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनें-फलें
व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती ब्रह्म एकलें
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | विष्णुपंत पागनीस |
चित्रपट | - | संत तुकाराम |
ताल | - | केरवा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
सुमन | - | फूल. |
'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं' या संत तुकारामांच्या रचनेने स्फूर्ती घेऊन शांताराम आठवले यांनी हे गीत लिहिले.
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥२॥
सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥
तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥
'प्रभात'च्या 'संत तुकाराम' या बोलपटातला हा अभंग संत तुकारामांचा शोभावा इतका अर्थपूर्ण सरस उतरला आहे. ह. भ. प. (लक्ष्मण रामचंद्र) पांगारकर हा अभंग 'तुकाराम गाथे'त शोधित बसले, पण त्यांना तो आढळला नाही, अशी आख्यायिका आहे.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन.
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
'तुकाराम' चित्रपटाची सर्व बाजूंनी तयारी चालू असताना, विष्णूपंत पागनीस तालीम-हॉलमध्ये चिपळ्या घेऊन 'कान्हा बन्सरी बजाव' हे भजन रंगून म्हणत होते. सुप्रसिद्ध गायक पंडितराव नगरकरांनी मला हेच भजन ऐकवून लिहून दिले होते त्याची मला आठवण झाली. तुकारामांत ह्या चालीची योजना करायचे ठरले. तसा विशेष प्रसंग सापडत नव्हता. परंतु ज्ञानोबाचे शेत राखीत असताना, शेताकडे पाहत असता, "आधी बीज एकले.. त्यातून अनेक तरू जन्म घेतात, त्याचप्रमाणे एकच परमात्मा अनेक रूपे धारण करतो. एकातून अनेक. अनेकाच्या मुळाशी एकच शिल्लक राहते." हे विश्वोत्पत्तीचे रहस्य चिंतनातून तुकारामाला उलगडते. ही कल्पना कवी शांताराम आठवले यांनी बीजवृक्षन्यायाने अत्यंत सोपेपणाने मांडली. अगदी हुबेहुब तुकारामाच्या सोप्या शब्दांत, त्याच्या ढंगाप्रमाणे मांडली. त्यात कवीच्या असामान्य प्रतिभेचे तेज तर दिसलेच पण 'बीज अंकुरले, रोप वाढले' हा विकास सिनेमाच्या पद्धतीने चित्ररूपाने दाखविता आला, हा दुसरा महत्त्वाचा लाभ झाला.
हे पद मला कवी शांताराम आठवले यांनी प्रथम दाखविले तेव्हा "Great ! Capital !" असे धन्योद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले. मी तो कागद घेऊन शांतारामबापू यांच्याकडे गेलो. पदाचा प्रसंग सांगून ते त्यांना दाखविले. ते हर्षोत्फुल्ल नजरेने पाहत म्हणाले, "केशवराव आता विष्णूपंतांना तालमीला बोलवा. आपण या गाण्याची तालीम घेऊन ते घ्यायचे कसे हे ठरवू." तालीम घेत असताना त्यांचा उत्साह आणि आनंद त्यांच्या हृदयात मावत नव्हता. "वा, वा ! आठवले फारच छान गाणे झाले आहे. विष्णुपंत, मस्य झाले पाहिजे हं गाणे ! दामलेमामा, हे गाणे म्हणजे आपल्या पिक्चरचा एक हायलाइट झाले आहे."
चित्रपट लागल्यावर या पदाने महाराष्ट्राला वेड लावले. म. भा. भू. अजगांवकर व पांगारकर या तुकारामाच्या चरित्रकारांनी तर 'हा तुकारामाचा अभंग कोणत्या गाथेमधून घेतला? आम्हाला तो कोठेच सापडत नाही.' अशी पत्र लिहून विचारणा केली तेव्हा आम्हा सर्वांनाच, विशेषत: शांताराम आठवल्यांना, काय वाटले याचे वर्णन किती आणि कसे करणार?
(संपादित)
केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.