A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या जन्मावर या जगण्यावर

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती
हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - यशवंत देव
स्वर- अरुण दाते
राग - खमाज
गीत प्रकार - भावगीत
जित्या गळ्याचा माणूस

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. 'अरुण दाते' या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर केलेले कार्यक्रम.. यामुळे रसिकांचा प्रचंड आदर, प्रेम 'याचि देही याचि डोळा' बघण्याचे भाग्य अरुणजींना लाभले आहे. जी. एन्‌. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे यांनी घालून दिलेल्या पायावर मराठी भावगीत परंपरेची उत्तुंग इमारत अरुणजींनी उभारली. या इमारतीस जवळपास पाच पिढ्यांचे मजले आहेत. या मजल्यांमधून अरुणजींनी गायलेल्या गीतांचं प्रसन्‍न वारं झुळझुळत असतं. त्या वार्‍याला काळाचा शिळेपणा अजिबात शिवलेला नाही, शिवूच शकत नाही. कुणीही रसिकाने येथे आश्रयास यावं. या वार्‍याची एक लहर अंगावर घ्यावी आणि ताजंतवानं होऊन जावं.

अरुणजींनी ही भावगीते जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवली. ती रसिकांच्या मनांना भिडली, हृदयांवर राज्य करू लागली. आज देखील आकाशवाणीच्या 'आपली आवड' सारख्या कार्यक्रमात दाते साहेबांचं गाणं वाजलं नाही असा दिवस विरळाच असेल. बोजड नसलेले शब्द, वेधक चाली आणि त्यावरचा कळस असलेला अरुणजींचा मार्दवपूर्ण आवाज, शैली.. खानदानी शालीनतेचा साज ही गीते गेली ६० वर्षे मिरवीत आहेत. याला समांतर आणि अरुणजींच्या समकालीन उदाहरण गझल गायक जगजीत सिंह यांचं देता येईल. जगजीतजींच्या आधी आणि त्याच वेळेस अनेक गायक उर्दू गझल गात असत. पण जगजीतजींनी गझलेला रसिकांच्या मनांत रुजवलं आणि गळ्यावर चढवलं.

१९६२ च्या सुमारास अरुणजी त्यांचं पहिलं मराठी भावगीत 'शुक्रतारा मंदवारा' गायले. शुक्र ग्रह अवकाशात कधी जन्माला आला माहित नाही पण पाडगांवकर-खळे-दाते या त्रयीच्या 'शुक्रतारा'ने जन्म घेतला आणि तेव्हापासून ही 'शुक्राची चांदणी' मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे. 'भारलेल्या या स्वरांनी' रसिकांचा जन्‍म भारला गेला तो कायमचाच.

'हात तुझा हातातुन', 'पहिलीच भेट झाली', 'येशिल येशिल राणी', 'श्रीरंस सावळा तू, मी गौरकाय राधा', 'मज सांग सखे तू सांग मला' सारख्या गाण्यांनी प्रेमाची परिभाषा निर्माण केली. 'सच्ची मुहब्बत'चे तरल स्वर- मृदू, संयत आवाजात रसिकांपर्यंत पोहोचू लागले.

पण हा आवाज फक्त प्रेमतरंगांवर लहरत राहिला, असं नाही. 'भातुकलीच्या खेळा'मधली तडप, 'वाळवंटातून भीषण वैराण' मधला अंगावर येणारा एकटेपणा, 'धुके दाटलेले' मधले औदासिन्य, 'या जन्मावर या जगण्यावर' मधली जिंदादिली, 'असेन मी नसेन मी' मधली शाश्वतता, 'सोबती' चित्रपटतील 'देवाघरच्या फुलातली' असहय्यता, 'डोळ्यांत सांजवेळी' मधला समजूतदारपणा, 'अखेरचे येतील माझ्या' मधली फकिरी, 'जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌' मधलं लावण्य (पाडगांवकरांनी खास अरुणजींच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी लिहिलेला हा 'लावणा')…. हे सर्व अरुणजींनी आपल्यापर्यंत तितक्याच दृढतेने पोचवलं.

मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा, इतका ठळक आणि खोल आहे की जणू 'मराठी भावगीत' आणि 'अरुण दाते' हे समानार्थी शब्द व्हावेत. मी हे धाडशी विधान करण्याचं कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं, स्‍नेहासिस चॅटर्जी नावाचे माझे एक बंगाली मित्र आहेत. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर त्यांनी खूप आभ्यास, लेखन केलं आहे. लताबाईंच्या मराठी गाण्यांसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमच्या अनेकवेळा चर्चा झाल्या. स्वाभाविकपणे दिदींच्या भावगीतांचा उल्लेख आला. तेव्हा स्‍नेहासिस म्हणाले होते…. "भावगीत तो वहीं होता हैं ना जो अरुण दातेजी गाते हैं।"

कवी सुधीर मोघे हे मला गुरुस्थानी. त्यांच्याकडे गेले की हा एक प्रश्‍न नेहमी चर्चेत असायचा. 'गाणं नेमकं कोणाचं? संगीतकाराचं की गायकाचं?' इथे 'चर्चा' किंवा 'गप्पा' म्हणणं खरं तर अवघड अशासाठी- की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे.
त्यांच्या मते गाणं- हे त्याच्या अंतीम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भुमिकांबद्द्लची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. कधी एकाच्या बाजूने पारडं जड तर कधी दुसर्‍याच्या. (खरं तर ते स्वत: कवी / गीतकार / संगीतकार. पण व्यक्तीश: त्यांच्यासाठी एकदा कविता कागदावर उतरली की ती तिच्या मार्गाने, तिच्या नशिबाने जाते आणि कवी त्याच्या.)

मी त्यांना एकदा म्हंटलेलं, 'गायक' हा त्या गाण्याचा प्रवक्ता किंवा चेहरा असतो. म्हणून जर गीताच्या शब्दरचनेविषयी किंवा चालीविषयी बोललं जात नसेल तर उरलेला पूर्णवेळ गाणं हे (लौकिक अर्थाने) गायकाचं असतं. याची पुष्टी म्हणून आज मला हे एक उदाहरण देता येईल. 'संगदिल' या हिंदी चित्रपटात 'दिल में समा गयें सजन' असं एक गाणं आहे. त्याच्या वजनावर, मराठीतल्या एका वेगळ्या छंदात, गंगाधर महाम्बरे यांनी एक गीत लिहिलं आणि त्याला हृदयनाथांनी चाल लावली. 'संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..' जेव्हा कधी या गाण्याच्या इतिसासात, खोलात जाण्याची वेळ येते तेव्हाच या तपशीलाचं महत्त्व. अन्यथा आपल्यासाठी ते फक्त अरुण दातेंचं गाणं असतं.
दाते साहेबांनी, त्यांनी गायलेल्या सर्व गाण्यांना असं सर्वाथाने आपलं करून घेतलं आहे.

जाताजाता अरुणजींच्या नावावर नसलेल्या तीन गाण्यांचा मला मुद्दामहून उल्लेख करायचा आहे. 'काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही','पाऊस कधीचा पडतो' आणि 'उष:क्काल होता होता'. ही गाणी अरुणजींच्याही आवाजात ऐकता येतात. त्या गाण्याचे प्रचलित गायक आणि अरुणजींसारख्या सिद्धहस्त गायकाने केलेला त्यांचा आविष्कार, हे दोन्ही पाठोपाठ ऐकण्याचा आनंद काही वेगळा आहे.

आणि त्यांच्या दोन युगुलगीतांच्या ध्वनीमुद्रीत स्वरुपाच्या शोधात मी बरेच वर्षे आहे. दोन्ही गीते शांताबाई शेळके यांची आहेत आणि सहगायिका आहेत कुंदा बोकिल. 'हा मंद मंद वारा ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी' आणि 'जे सत्य मानले मी आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरवा'. पूर्वी कधीतरी आकाशवाणीवर ऐकलेली ही गाणी. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचे शब्द नजरेसमोर आले तर स्वर मनात रुंजी घालू लागतात.

असा हा 'जित्या गळ्याचा माणूस'. कविवर्य मंगेश पाडगांवकर उगीच त्याला गर्दीत आणि कोलाहलात शोधत होते. तो खरं तर त्यांना केव्हाच सापडला होता.. तो त्यांचीच गाणी गात गेली कित्येक वर्षे रसिकरंजन करतो आहे.

{कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
..
काळ्या उभ्या तिजोर्‍या गाणे खरीदणार्‍या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
..
-मंगेश पाडगांवकर}

( हा लेख सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक श्री. अरुण दाते यांच्या 'शुक्रतारा' या आत्मचरित्रात प्रसिद्ध झालेला आहे. मोरया प्रकाशन, पुणे : प्रथम आवृत्ती - ४ मे २०१६ )

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.