राहो निरंतर हृदयीं माझे ।
आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड
तुझें नाम गोड पांडुरंगे ॥)
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुह्मी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥२॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥३॥
तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।
सुखदुःख जीव भोग पावे ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | शांक-नील |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ बालगंधर्व ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- शांक-नील • स्वर- बालगंधर्व, संगीत- ???. |
चाड | - | शरम. |
वर्म | - | दोष, उणेपणा / खूण. |
वैष्णव | - | विष्णुभक्त. |
- सगळे जगच विष्णुमय आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्म आहे. यात भेद मानणे, फरक करणे हे वाईट आहे.
- हे भगवंताच्या भक्तांनो, तुम्ही सत्याचे स्वरूप ओळखून हिताचे ते करा.
- सर्व ठिकाणी भरलेल्या देवाच्या पूजनाचे तत्व ध्यानात घ्या आणि कोणाही जिवाचा मत्सर करू नका.
- तुकाराम महाराज म्हणतात, एका देहाचेच सगळे अवयव आहेत. एका अवयवाला सुख किंवा दु:ख झाले तर ते सगळ्या देहाला जाणवते.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
या अभंगातूनही तुकाराम महाराज 'अद्वैताचं' तत्वज्ञान मांडत आहेत. जग विष्णुमय आहे, म्हणजे अणुरेणूत एकच ब्रह्म भरलेले आहे. सर्व ब्रह्माचीच रुपं असतील तर त्यात भेद करणं अमंगल आहे. द्वैत हा भ्रम आहे. अद्वैत हेच सत्य आहे. हे जो जाणतो तो कोणाचाही मत्सर करत नाही. सर्वांभूती प्रेम हीच परमेश्वराची पूजा आहे. शरीराचे अवयव वेगवेगळे असतात. पण त्यांच्यात आंतरिक बंध असतो. एका अवयवाचं सुख हे सार्या देहाला सुखावतं, एका अवयवाच्या दु:खाने सर्व शरीर दु:खी होतं. पायात काटा टोचला तर पाणी डोळ्यात येतं. तोंडातून दु:खद ध्वनी बाहेर पडतो. हात तो काटा उपसायला धाऊन जातात. गार वार्याची सुखद झुळूक सर्वांगाला सुख देते. जीभ भाजली म्हणजे डोळ्यांत पाणी येतं. हात पाणी आणायला पुढे होतात. पाय पाणी आणायला पळतात. कोणत्याही गोष्टीची ओळख पटण्यासाठी पंचेंद्रिये एकत्रच काम करतात. तसंच समाजातल्या एकाचं दु:ख हे सर्वांचं दु:ख झालं पाहिजे. एकाच्या सुखात सर्वांचं सुख सामावलेलं असायला हवं. समाज एकजीव हवा. असा समाजच खरा सुसंस्कृत समाज असतो. ज्या समाजाच्या विविध घटकांत असं आंतरिक ऐक्य असतं, त्या समाजाची प्रगती होते. त्या समाजावर कोणी हल्ला करण्याची हिंमत करत नाही. अशा समाजात माणसं सुखासमाधानाने, शांततेत, सुरक्षितपणे जगू शकतात. अशा समाजात कोणी कोणावर अन्याय करत नाही.
आज देशात नेमकी याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. जो तो आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न आहे. ज्यांना संधी मिळाली ते इतरांचा विचार करायला तयार नाहीत. असंघटित कामगारांची दैना उडाली आहे. लाखोंच्या संख्येने आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या दुरावस्थेने कोणीही सुखवस्तू मनापासून हललेला दिसत नाही. थंडी, ऊन, वारा, पावसात, रात्रंदिवस खपूनही शेतकर्याला कुटुंबाच्या साध्या साध्या गरजाही भागवता येत नाही, याची कोणाला खंत वाटत नाही. एकीकडे कमालीचं दारिद्र्य तर दुसरीकडे सुबत्ता ओसंडून वाहतांना दिसते. या विषमतेविरुद्ध लढणारे आवाज क्षीण होत चालले आहेत. विषमता वेगाने वाढत आहे. माणसामाणसातले भेद अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहेत. आज कोरोना सारख्या भीषण परिस्थितीतही धर्मांध लोक धर्मद्वेष फैलावण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्व एक आहोत हा विचार समाजात रुजणं, एकदुसर्याच्या सुखदु:खाप्रती सजग, संवेदनशील असणं फार गरजेचं झालं आहे. विकासापासून, प्रगतीपासून, सुबत्तेपासून, शिक्षणापासून, प्रतिष्ठीत जीवनापासून जे अजूनही दूर आहेत त्यांच्याप्रती बंधुत्वाची भावना मनामनात जागणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि स्थैर्यासाठी, जागतिक शांततेसाठी तुकाराम महाराजांचा हा विचार फारच उपयुक्त आणि पोषक आहे. आपली जात, धर्म, वंश, वर्ण, वर्ग, लिंग कोणतेही असो आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत हे जाणलं पाहिजे. आपलं रंगरूप, भाषा, भूषा भिन्न असली तरी आपण अंतिमत: एक आहोत ही भावना विश्वबंधुत्वाला चालना देणारी आहे.
तुकाराम महाराजांच्या अभंगात असा सर्व मानवतेला कवेत घेणारा विचार असल्यामुळेच ते जगद्गुरु म्हणून विख्यात पावले.
(संपादित)
उल्हास पाटील
सौजन्य- गाथा परिवार (gathaparivar.org)
(Referenced page was accessed on 04 Nov 2021)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.