A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऊठ विठ्ठला उठी गोपाला

ऊठ विठ्ठला उठी गोपाला, उठले चराचरू
प्राचीवरती प्रकाश फुलला, उठला बघ दिनकरू

विहंग उठले उठल्या धेनू, गोर्‍हे-कालवडी
मार्ग लक्षिती तव शिखराचा पुण्यवंत कापडी
किर्तनरंगी आळविती तुज नारदमुनी-तुंबरु

जागे झाले पुंडलिकाचे मायतात सज्‍जन
प्रभातकाळी तुज भक्तांचे घडण्या मुखदर्शन
कुणी काकडा घेऊन आले आरतीस सत्वरू

फूल उमलते जसे कळीतून उघडी नयनदले
तेजोमय दीपातून जैसे तिमिरी तेज फुले
संतजनांचा आनंदाचा परिसावा गजरू
काकडा - चिंधीला पीळ देऊन केलेली दिव्याची मोठी वात.
कापडी - खांद्यावर कावड घेऊन तीर्थयात्रा करीत फिरणारा मनुष्य.
कालवड - जिला अजून वासरू झालेले नाही अशी लहान गाय.
तुंबरु - गंधर्व.
धेनु - गाय.
प्राची - पूर्वदिशा.
परिसा - ऐकणे.
विहंग - विहग, पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.