अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने- ज्यांना प्रेतही न वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले, रवींद्र साठे ∙ अरुण दाते ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | सिंहासन |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
टीप - • स्वर- आशा भोसले, रवींद्र साठे, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट- सिंहासन. • स्वर- अरुण दाते, संगीत- यशवंत देव. |
पखाल | - | पाणी भरण्याची चामड्याची मोठी पिशवी. |
तुमच्या कवितांमागे वेगेवेगळ्या प्रेरणा आहेत. काही कविता देशात घडणार्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाच्या प्रसंगी लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांमधून तुमच्या देशभक्तीचा, मायदेशाविषयीच्या तुमच्या उत्कट भावनेचा आविष्कार झाला आहे. या कवितांतली-
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !''
ही कविता मला अतिशय आवडली. देश स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्याबरोबर आपली जी सुखस्वप्ने साकार व्हायला हवी होती ती तशी झाली नाहीत. उलट, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात अनेक दुष्ट प्रवृत्ती मोकाट सुटल्या आणि सामान्य माणूस साध्या सुखाला, साध्या आनंदाला वंचित झाला. यामुळे संवेदनक्षम कविमनात उसळलेला प्रक्षोभ या कवितेत अतिशय परिणामकारक रीतीने प्रकट झाला आहे. इथे तुमची चीड, तुमचे दु:ख, तुमच वेदना अगदी अस्सलपणे जाणवते. ती काळजाला जाऊन भिडते.
या सुंदर कवितेबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच.
(संपादित)
लता मंगेशकर
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.