व्यापुनियां सारी धरणी । मूर्ति आपुली या नयनीं ।
खेळते पहा दिनरजनी । तेंवि हृदयमंचकिं लीना ॥
गीत | - | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर |
संगीत | - | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर |
स्वराविष्कार | - | ∙ खाँसाहेब अब्दुल करीम खाँ ∙ पं. भीमसेन जोशी ∙ बालगंधर्व ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | मूकनायक |
राग | - | काफी |
चाल | - | इडू इडू इडू करूणा नारायणा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कांत | - | पती. |
गांजणे | - | छळणे, जाचणे. |
तेवि | - | त्याप्रमाणे, तसे. |
नाटक ह्मणजे उपदेशपर असलेंच पाहिजे, अशांतला कांहीं प्रकार नाहीं. मनोवेधक कथानक, चटकदार प्रवेश वगैरे मुख्य सामग्री असली ह्मणजे मग उपदेश नसला तरी त्यास नाटक या दृष्टीनें गौणत्व येत नाहीं. त्याचप्रमाणें नाटकांत ऐतिहासिक माहिती असो वा नसो. ती असल्यास तें इतिहासप्रियांस आवडेल खरे; पण या गोष्टीमुळें नाटक या नात्यानें त्याचें महत्त्व रतिभर कमज्यास्त होत नाहीं. एखादा गायक कवि असल्यानें व्यक्तिदृष्टीनें त्याची योग्यता अधिक ठरेल; पण त्याच्या उंच लकेर्यांमुळें त्याच्या कवितेस उदात्तत्व येईल किंवा कवितेच्या जोरदारपणामुळे त्याचा कमसूर सुरेल वाटेल, अशी अपेक्षा करणें निरर्थक आहे. असें आहे तरी नाटकांत उपदेश गोंविल्यानें साखरेबरोबर कडू जिराईत दिल्याचें श्रेय येत असल्यामुळें बर्याच नाटककर्त्याचा उपदेशपर नाटकें लिहिण्याकडे कल असतो. या संप्रदायास अनुसरून प्रस्तुत नाटकांतहि मद्यापासून होणार्या अपायांचें परोक्षतः थोडेंसें आविष्करण करण्याचा यत्न केला आहे.
वेश्यागमनाची निंदा वेश्येच्या मुखांतून निघालेली बाहेरख्याली मनुष्यास पसंत असते; त्याप्रमाणें नेहमीं मज्जाव होत असलेल्या उपदेशास मनोहर रंगभूमीवरील उत्कृष्ट नटाच्या मोहक भाषणांबरोबर किंवा लकेर्यांबरोबर कर्णांवाटे अंतःकरणांत शिरण्याची पूर्ण मुभा असते. तशांत कथानकाचा काल बराच पुरातन असल्यास उपदेश कडू वाटेल, ही शंकाहि यावयास नको. हजारों वर्षाची वेस मध्यें असल्यावर नाटकाच्या विषयाशीं आपला बादरायणसंबंध तरी आहे असें प्रेक्षकांस वाटण्याचे मुळींच कारण नसतें. त्रेतायुगांतील ह्मातार्याची द्वितीय संबंधामुळें झालेली विटंबना पाहून ज्या समानशील ह्मातार्या प्रेक्षकांस आपलीं बोळकीं पसरण्यास लाज वाटत नाहीं, त्यांच्याच पावलांना शारदा नाटकाचा पहिला अंक संपण्यापूर्वीच घरीं तांतडीने जातांना आपल्या धन्याच्या वृद्धत्वाचें भानहि रहात नाहीं. या एक दोन तर्तुदी घेतल्यावर नाटकांतील नीतिपर वाक्यांचा ग्रह प्रेक्षकांवर उशीरानें कां होईना, पण खात्रीनें होतो. प्रस्तुत नाटकाचा काल शिकंदराच्या स्वारीच्या थोडा नंतरचा आहे, हे मार्मिकांस सांगावयास नकोच.
आतां हंसक्षीरन्यायानें गुणांचें ग्रहण व दोषांचा त्याग करण्याबद्दल विनंति करण्याचें राहिलें आहे. प्रस्तुत नाटककर्त्यापेक्षां अधिक योग्यतेच्या कवीच्या कल्पनेला मुका मुलगा झालेला पाहून रसिकांस जितका आनंद झाला असता तितका या नाटकासंबंधानें होणार नाहीं हें तो जाणून आहे. तरी त्याच्या पूर्व अनुभवावरून त्यांच्या दयालुत्वाविषयीं त्याची इतकी खात्री झाली आहे कीं, या मुक्या अर्भकाविषयीं आपली नेहमींची दयार्द्र दृष्टि कायम ठेवावी, इतकीच त्याच्या बाजूनें त्यांना विनंति करून व पडद्यांतील नूपुरांच्या ध्वनीकडे किंचित् लक्ष पुरवावें, अशी अयाचित याचना करून तो त्यांचा निरोप घेत आहे.
दि. जून १९०१.
दुसर्या आवृत्तीची प्रस्तावना
या नाटकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर जवळजवळ पंधरा वर्षांनी ही दुसरी आवृत्ति निघत आहे. मद्यसेवनानें मोठमोठीं राष्टें धुळीस मिळतात हें जें तत्त्व या नाटकांत ग्रथित केलें आहे, त्याची जाणीव या महायुद्धप्रसंगीं पाश्चात्य देशांत उत्पन्न होऊन मद्यसेवनाविरुद्ध जोराची चळवळ सुरू झाली आहे, व तिचा पुरस्कार पंचम जॉर्ज बादशहांसारख्या तेजस्वी पुरुषाकडे असल्यामुळे ती पूर्णपणें यशस्वी होण्याचा संभव आहे, हा या आवृत्तीस शुभ शकुनच समजण्यास हरकत नाहीं. ईश्वर करो, व या नाटकाच्या अंतीं नीतीचा विजय होऊन शेवट गोड झाला, तसा प्रस्तुत महायुद्धाचाहि होवो !
ही आवृत्ति निघतांना माझे स्नेही रा. रा. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची मला जी मदत झाली तिजबद्दल त्यांचा व पुस्तकाची छपाई व बांधणी सुंदर व्हावी अशी योजना केल्याबद्दल प्रकाशकांचा मी अत्यंत ऋणी आहे.
दि. २५ नोव्हेंबर १९१५.
(संपादित)
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
'संगीत मूकनायक' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.