माझिया प्रियेचे झोपडे !
गवत उंच दाट दाट
वळत जाय पायवाट
वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे !
कौलावर गारवेल
वार्यावर हळू डुलेल
गुलमोहर डोलता, स्वागत ते केवढे !
तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराती रंगल्या
कल्पनेत स्वर्ग जो, तिथे मनास सापडे !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | मालती पांडे |
चित्रपट | - | लाखाची गोष्ट |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
या सगळ्या गायिकांची स्वतःची एक स्वतंत्र शैली होती, वेगळी जात होती आणि त्याची जाण त्या काळच्या प्रतिभावान संगीतकारांना होती. त्या वेगळेपणाचा छान वापर त्यांनी त्यांच्या संगीतरचनांत केलेला आहे. आवाजाची रेंज म्हणजे केवळ उंच सुरात गाणं नाही तर, जर गायक किंवा गायिका त्याच्या नैसर्गिक आवाजात संगीतकाराने दिलेल्या गाण्याच्या खर्ज्यात आणि तार सप्तकात भावपूर्ण गाऊ शकत असेल तर त्याने आपला नैसर्गिक आवाज सोडून उंच सुरात गायलंच पाहिजे असं नाही. अशा पद्धतीच्या आवाजाची गरज जेव्हा असेल तेव्हा त्याला अशी संधी मिळाली पाहिजे, त्याच्या गुणांचं चीज झालं पाहिजे. ही गोष्ट सुधीर फडक्यांसारख्या महान संगीतकाराने जाणली आणि ग. दि. माडगूळकरांनी 'लाखाची गोष्ट' चित्रपटासाठी लिहिलेलं एक गोड प्रेमगीत त्या जमान्यातल्या लडिवाळ गायकीच्या गायिका मालती पांडे यांच्याकडून गाववून घेतलं. ते गीत होतं 'त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे '.
चित्रपटाचे नायक राजा परांजपे त्यांच्या कल्पनेतलं त्यांच्या प्रियेचं घर कसं असेल हे कुंचल्याने चितारत असतानाच्या पार्श्वभूमीवर हे गीत चित्रपटात आहे. अतिशय चित्रसदृश अशी सोपी, साधी आणि रम्य, स्वप्नील शब्दरचना ग. दि. माडगूळकरांची आहे. आधीचे शब्द 'त्या तिथे तिकडे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे' असे होते. त्यातले 'डे' नी शेवट होणारे शब्द 'तिकडे' 'पलीकडे' 'झोपडे' तसेच ठेवून केवळ क्रम बदलून 'पलीकडे' 'तिकडे' 'झोपडे' असे करून बाबूजींनी प्रसन्न चाल बांधली आणि गाणं जमून आलं. 'डे' ची जादू साधणारे शब्दप्रभू गदिमा आणि स्वरांचे जादूगार बाबूजी ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा यशस्वी झाली; फक्त या वेळेला आवाज नेहेमीहून वेगळा म्हणजे मालती पांडे यांचा होता.
मालतीबाइंनी या सुंदर शब्द–स्वरांचं चीज केलं आणि एक अप्रतिम कलाकृती निर्माण झाली. गाण्यातल्या छोटयाछोटया मुरक्या हे बाबूजींचं वैशिष्ट्य; अशा या गाण्यातल्या मुरक्या मालतीबाई खूप सुंदर, सहज गायल्या आहेत. गाण्याच्या सहज, सोप्या सुटसुटीत पण प्रसन्न चालीसारखाच वाद्यवृंदही गाण्याच्या आशयाला शोभेल असाच छोटेखानी पण नेमका आहे. असं गोड गाणं आपल्याला नाही मिळालं म्हणून आशाताई बाबूजींवर थोड्या लटक्या रागावल्याही होत्या. तशी याच चित्रपटातली 'डोळ्यात वाच माझ्या' आणि 'सांग तू माझा होशील का' ही गाणी आशाताईच गायल्या आहेत. आपल्या प्रियेच्या घराचं वर्णन असलेलं हे गाणं, गायिकेच्या तोंडी कसं हे मात्र कोडंच आहे..
त्या सुवर्णकाळाप्रमाणे आजही वेगवेगळ्या शैलीचे, वेगवेगळ्या आवाजाच्या जातीचे प्रतिभावंत गायक आहेत ज्यांच्याकडून निश्तिच खूप अपेक्षा आहेत. चतुरस्त्र गायकीची महंमद रफीसाहेबांची परंपरा चालवणारे तयार आवाजाचे प्रथितयश गायक सोनू निगम, तशाच अष्टपैलू आणि हुकमी आवाजाची आजची प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोषाल, प्रचंड उर्जा आपल्या गायकीत असलेला अजय–अतुल जोडीतला गायक अजय, कसदार गायकीसाठी नाव घेतलं जातं असे आनंद भाटे, तरल आणि भावपूर्ण गायकीसाठी माहित झालेला युवा गायक हृषिकेश रानडे आणि अशाच प्रकारच्या गायकीची गायिका विभावरी जोशी अशा सगळ्या आजच्या प्रथितयश आणि उदयोन्मुख, प्रतिभावान गायकांकडून निश्चितच फार मोठ्या अपेक्षा आहेत. आपण या निमित्ताने अशी सदिच्छा व्यक्त करुया की भविष्यातला सुवर्णकाळ या प्रतिभावंतांच्या नावांनी ओळखला जाईल.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.