A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुला वंदितो आज चैतन्यशक्ती

तुला वंदितो आज चैतन्यशक्ती, उफाळून ये रोज सर्वांतरी
तुझ्या प्रेरणेने घडो राष्ट्र माझे जगी दिव्य तेजाळ सूर्यापरी !

मनी भावना एक साकार व्हावी असे ही धरा थोर प्राणांहुनी
तिच्या वैभवा घाम द्याया श्रमाचा चला घेउया सर्वथा वाहुनी
इथे ज्ञानविज्ञान यांच्या यशाच्या ध्वजा डोलु द्या उंच नीलांबरी

कमी लेखुनी सान आम्हा कुणीही जिव्हा सैल सोडून बोलू नये
कधी रोखुनी वक्रदृष्टी दुजांनी वृथा आमुचे शौर्य तोलू नये
रणी दुश्‍मना धूळ चारावयाला करू अग्‍निवर्षाव त्याच्यावरी

वसे थोर सामर्थ्य बाहूत ज्यांच्या गळां माळ त्यांच्या यशाची पडे
शुरांच्या मुखी शोभते योग्य भाषा जना द्यावया शांततेचे धडे
अशांना मिळे हो सलामी जगाची दरारा तयांचा दिसे संगरी