A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुज सगुण ह्मणों कीं

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति 'नेति नेति' ह्मणती गोविंदु रे ॥२॥

तुज स्थूळ ह्मणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

तुज आकारु ह्मणों कीं निराकारू रे ।
आकारुनिराकारु एकु गोविंदु रे ॥४॥

तुज दृश्य ह्मणों कीं अदृश्य रे ।
दृश्यअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥

तुज व्यक्त ह्मणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्तअव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥

निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - संतवाणी
अदृष्ट(ष्य) - न पाहिलेले / दैव, प्रारब्ध.
नेति नेति - (न इति) असे नाही, माहित नाही.
श्रुति - कान / ऐकणे / आवाज / धर्मग्रंथ / स्वरावयव.
भावार्थ-

परमेश्वररूपासंबंधीचे चिंतन प्रकट करणारा हा अभंग आहे. आपण परमेश्वरासंबंधी जे जे अनुमान बांधतो त्या त्या सार्‍यांच्या पलीकडे किंवा त्या त्या सार्‍याच रूपात तो आहे असे ज्ञानेश्वरांना वाटते. परमेश्वर हा वर्णनातीत आणि मानवी आकलनापलीकडे आहे असे त्यांना वाटते. म्हणून भक्तापुढे संभ्रम निर्माण होतो की, त्याला सगुण म्हणावे की निर्गुण? पण त्याच्या अस्तित्वाची अशी विभागणीच करता येणार नाही. तो दोन्ही रूपांत असतो. जेथे श्रुतिसुद्धा हतबल होऊन 'नेति नेति' म्हणतात, त्याच्याबद्दल अनुमाने काय लावावीत? स्थूल, सूक्ष्म, साकार, निराकार, दृश्य, अदृश्य, व्यक्त आणि अव्यक्त या सार्‍याच रूपांत तो परमेश्वर दिसतो, जाणवतो. सार्‍या विश्वातच तो भरून राहिला आहे.

परमेश्वराच्या अमूर्त रूपाचा अनुभव ज्ञानेश्वरांनी येथे साक्षात प्रत्ययकारी केला आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.