A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्रिवार जयजयकार रामा

त्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार
पुष्पक यानांतुनी उतरलें स्वर्गसौख्य साकार

तुला चिंतिते सुदीर्घ आयु
पुण्यसलिला सरिता सरयु
पुलकित पृथ्वी, पुलकित वायु
आज अहल्येपरी जाहला नगरीचा उद्धार

शिवचापासम विरह भंगला
स्वयंवरासम समय रंगला
अधीर अयोध्यापुरी मंगला
सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार

तव दृष्टीच्या पावन स्पर्शे
आज मांडिला उत्सव हर्षे
मनें विसरलीं चौदा वर्षे
सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार

तुझ्या मस्तकी जलें शिंपतां
सप्त नद्यांना मिळो तीर्थता
अभिषिक्ता तुज जाणिव देतां
मुनिवचनांचा पुन्हां हो‌उं दे अर्थासह उच्चार

पितृकामना पुरी हो‍उं दे
रामराज्य या पुरीं ये‍उं दे
तें कौसल्या माय पाहुं दे
राज्ञीसह तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार

प्रजाजनीं जें रचिलें स्वप्‍नीं
मूर्त दिसे तें स्वप्‍न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार

रामराज्य या असतां भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जल-रेखित स्त्रीनयनांवर
विचारांतलें सत्य आणतिल अयोध्येंत आचार

समयिं वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
"शांतिः शांतिः" मुनी वांच्छिती, ती घेवो आकार
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भैरवी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २२/३/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान.
अभिषिक्त - ज्याच्यावर अभिषेक झाला आहे असा, राजा.
अहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.
चाप - धनुष्य.
पुलकित - आनंदित.
पुष्पक - कुबेराचे (देवांचा खजिनदार) विमान.
राज्ञी - राणी.
वांच्छा - इच्छा.
सरिता - नदी.
सलिल - पाणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण