A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ती पाहतांच बाला

ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला,
छातींत इष्कभाला, कीं आरपार गेला !

स्वर्गांतल्या पर्‍यांना, की वस्त्रगाळ करुनी,
कमनीय देह विधिनें, रचिला तिचा छबेला?

लावण्य काय सारें, उकळोनि वा पिळोनी,
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला !

डौलांत चालतां ती, हत्ती वनांत झुरती
रस्त्यांत गुंड जमती, तिज अन्‌ पहावयाला
गीत - प्र. के. अत्रे
संगीत - छोटा गंधर्व
स्वराविष्कार- पंडितराव नगरकर
गजानन वाटवे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - लग्‍नाची बेडी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• स्वर- पंडितराव नगरकर, संगीत- छोटा गंधर्व, नाटक- लग्‍नाची बेडी
• स्वर- गजानन वाटवे, संगीत- दादा चांदेकर, चित्रपट- ब्रह्म घोटाळा (१९४९ सालचा हा चित्रपट आचार्य अत्रे यांच्या 'लग्‍नाची बेडी' या नाटकावर आधारलेला आहे व निर्मिती आणि दिग्‍दर्शन त्यांचेच आहे.)
ह्या नाटकाचा पहिला प्रयोग गुरुवार दि. २२ ऑक्टोबर १९३६ रोजी 'बालमोहन नाटक मंडळी'नें पुण्याच्या 'विजयानंद' नाटकगृहांत करून दाखविला. त्या गोष्टीला आज बत्तीस वर्षें झाली. ह्या बत्तीस वर्षांत शेंकडों नटनटींनीं नि निरनिराळ्या नाटक मंडळ्यांनीं ह्या नाटकाचे अक्षरश: हजारों प्रयोग करून दाखविले. कमीत कमी दहा हजार प्रयोग तरी झाले असतील. ह्या नाटकाएवढे सदा प्रफुल्लित, विनोदी अन् लोकप्रिय नाटक मराठींत दुसरें क्वचितच असेल ! माझ्या नाटकांतलें सर्वोत यशस्वी नि रंगदार नाटक अर्थात् हेंच !

'लग्‍नाची बेडी' हें नाटक अर्थातच स्वतंत्र असून त्याची रचना व त्यांतील विनोदाची तर्‍हा माझ्या पूर्वीच्या विनोदी नाटकांपेक्षां निराळी आहे. आपल्या समाजांत प्रचलित असलेल्या नि होऊं पाहणार्‍या विवाहपद्धतींमधील कांहीं दोषांचें विनोदाच्या साहाय्यानें आविष्करण करण्याचा या नाटकांत प्रयत्‍न केला आहे. 'लग्‍नाच्या बेडीं'त अडकलेल्या विवाहित दांपत्याला सुखाचा संसार कसा करतां येईल या कथाभागांत प्रामुख्यानें सूचित केलेल्या प्रश्नाला पुरुषांची भोगवासना नि मोह अनिवार्य असून त्यांना लग्‍नाचे बंधन असणें आवश्यक आहे, तसेंच पतींची मने प्रसन्‍न ठेवण्यासाठीं स्त्रियांनीं आपल्या शृंगारिक आकर्षणाची जपणूक करणें जरूर आहे, हीं अखेरीस मिळालेली उत्तरें पुष्कळांना सहज मान्य होण्यासारखीं आहेत. अर्थात्, कुटुंबसंस्थेच्या अभावावर संकल्पिलेल्या समाजपद्धतीच्या पुरस्कर्त्यांचें वा कृतीनें समाधान होणें शक्य नाहीं, हें मी जाणून आहे.

ह्या नाटकाच्या अतिरिक्त लोकप्रियतेमुळेंच त्याच्या प्रयोगांचा पुढें पुढें अधःपात होत गेला. पोटभरू नट-नटींनी (विशेषतः चित्रपटांतील) त्याचा शेवटीं अक्षरशः तमाशा केला. म्हणून ह्या नाटकाचें प्रयोग इतरांना करण्याची मला बंदी घालावी लागली. यापुढे फक्त 'अत्रे थिएटर्स (प्रा.) लि.'च्या रंगभूमीवरच ह्या नाटकाचे प्रयोग पाहावयाला मिळतील. ह्या नाटकाची ही 'खास (Delux) आवृत्ति' आहे.
(संपादित)

प्रल्हाद केशव अत्रे
'लग्‍नाची बेडी' या नाटकाच्या पुस्तकाच्या १९६८ सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.