पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढांसळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !
ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातुन शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"
हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरलें ग !
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी |
अल्बम | - | संधीप्रकाशात |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
टीप - • काव्य रचना- २८ नोव्हेंबर १९४७. |
आंस | - | गाडीचा कणा, अक्ष. |
गिरी | - | पर्वत, डोंगर. |
दिग्गज | - | पृथ्वी तोलून धरणारे आठ हत्ती / नरश्रेष्ठ. |
पंचानन | - | सिंह. |
मीन | - | मासा. |
सुर | - | देव. |
तव नयनाचें दल हललें ग !
संपूर्ण कविता अगदी लहानश्या कालावधीवर बेतलेली आहे. तीने याच्याकडे पाहिले, नेत्रकटाक्ष टाकला असे नेहमीच्या काव्यात सांगितले जाते, व त्याच्या हे लक्षात येते न येते तोच तीची नजर खाली, जमिनीकडे वळली. या अल्प काळात जे उत्पात घडून आले त्याचे कवी वर्णन करत आहे.
पहिल्या दोन ओळीतले सौंदर्य ध्यानात घेण्यासाठी जरा सकाळी लवकर उठून बागेत चक्कर मारली पाहिजे. हिवाळ्यातली.. एखादी पावसाळ्यातील पहाटही चालेल, पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्याच्या एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटे तो परत जागेवर येतो. प्रियकराच्या दृष्टीने मात्र त्रिभुवनच डळमळलेले असते.
दिग्गज पंचाननसे वळले.. येथली गंमत कळावयास थोडी पुराणांची ओळख पाहिजे. पंचानन हे शंकराचे नाव. हे योगिराज एकदा बसले असतांना एक लावण्यलतिका त्यांना नमस्कार करण्याकरिता प्रदक्षिणा घालते. ती बाजूला वळल्यावर यांना त्या दिशेला एक मुख फुटले. ही चार नवीन तोंडे मिळाली म्हणून शंकर पंचानन. पुराणातला दुसरा पंचानन म्हणजे मारुती. तोही शंकराचा अंशावतार म्हणूनच पंचानन. विंदांच्या गजलेतला मारुती यामुळेच मागे वळून पहात नाही ना? आता दिग्गजच असे वळले तर गिरि ढासळणारच !
नेत्रकटाक्षाला भाल्यांची उपमा ही काही नवी नव्हे. हृदय विद्ध करावयाला हे नेहमीचेच आयुध आहे. पण या भाल्याच्या पात्यावरील चकचकणार्या, लखलखीत तेजाला 'तळमळणार्या मीनांशी' जोडून देणे खास गोयकराचे. येथे मीनाक्षीतले मीन नाहीत. तीच्या नेत्रातील चमक व तळमळत असल्यामुळे सुर्कन फेर्या मारणार्या माश्यांच्या खवल्यावरील चमकेतील साम्य कवीला जाणवत आहे. आणि हो, तळमळही दोघांची, मीनाची व कवीची !
चकमक झडली, ठिणगी पडली व हृदयाला आग लागली.. नाही नाही, प्रेयसी अशी उर्दू गझलेतील साकी सारखी निष्ठूर नाही. तीने नजर खाली वळवली व किमया झाली तरी पुनरपि जग सावरलेच. (तीला आपल्या सामर्थ्याची पुरेपुर जाणीव असल्याने तर तीने वेळेवर नजर फिरवली नसावी ना?)
(संपादित)
शरद
* या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास aathavanitli.gani@gmail.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.)
सौजन्य- उपक्रम (http://mr.upakram.org) (१ जुलै, २००८)
(Referenced page was accessed on 31 July 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.