तापल्या आहेत तारा
तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे
रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे
वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी
कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी
जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे
रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे
वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी
कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी
जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वराविष्कार | - | ∙ सुरेश वाडकर ∙ सुधीर फडके ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
टीप - • काव्य रचना- १५ सप्टेंबर १९५८. • स्वर- सुरेश वाडकर, संगीत- प्रभाकर पंडित. • स्वर- सुधीर फडके, संगीत- ???. |
दामिनी | - | सौदामिनी, आकाशात चमकणारी वीज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.