A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तंबाखूची रसाळ पोथी

अजब गुणाची वनस्पती ही सार्‍यांनी खावी
तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी

'खा तंबाखू', 'खा तंबाखू' हुकूम देवाचा
हरिनामापरी तंबाखूने उद्धरते वाचा
तंबाखूची थोरवी सार्‍या देवांना ठावी

पंढरपूरचा विठ्ठल ठेवी कमरेवर हाता
तंबाखूचे झाड केवढे ते सांगे जगता
कमरेइतकी उंची त्याची जाणुनिया घ्यावी

गावोगावची गणेशमूर्ती चिमूट एक दावी
जगास सांगे ही तंबाखू कशी किती घ्यावी
चिमूट घ्यावी चिमूट द्यावी, देवघेव व्हावी

हात पसरतो का व्यंकोबा देव चक्रपाणी
तंबाखूचे पान म्हणे तो तळहातावाणी
शाहिराची वाणी तुम्ही पडताळुनी घ्यावी

चिमटीहुन जर अधिक खाल तर होईल रे काय?
हात उगारून उभा ठाकला श्रीमारुतीराय
थोबाडित तो ठेवून देईल जाण बाळगावी