A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वराज्याचं तोरण पोवाडा

जय शिवराय ॥

आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला ।
तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला ॥
होम ध्याईचा ज्याने केला स्वदेश कार्याला ।
असो शाहीरी मुजरा माझा श्रीशिवरायाला ॥

युगायुगाने भूतलावरील वाढत्या आत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

छत्रपति शिवाजीवीर । पराक्रमी धीर । खरा झुंजार ।
हिंदी स्वराज्य स्थापाया खास । स्वराज्याचं बाधलं तोरण तोरण्यास ।
ऐका हा स्फूर्तीदायक इतिहास ॥

विजापूरचे यवन माजले । वर्चस्व आपले । गाजवू लागले ।
न्याय नाही अन्यायाचा बाजार । साधुसंताची विटंबना फार ।
वैतागून गेली जनता अनिवार ॥

शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला । विजापूरी होते नोकरीला ॥

त्यांनी नेले विजापूरी या बाल शिवाजीला । बादशाही दरबार पाहण्याला ॥

विजापूरी बाल शिवबाला । भलभलता प्रकार दिसला । कोण मानीत नाही कोणाला । माणूसकी नाही माणसाला । हे कळता सर्व शिवबाला । येऊन परत पुण्याला । हिंदवी राज्य स्थापनेचा निश्चय केला । आई जिजाईनं दिला आशीर्वाद शिवबाला ॥

विजापूरच्या यवनी सत्तेला शह देण्याला ।
त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला ।
स्वराज्याचं तोरण बांधण्याचा निश्चय केला ॥

कानद खोर्‍यात तोरणा किल्ला । दरवाजे याला । दोहोबाजूला । एक पुण्याच्या उत्तरेला । बिनी दरवाजा म्हणती याला । कोकण दरवाजा पश्चिमेला ॥

सह्याद्रीच्या कडे पठारात । दर्‍याखोर्‍यात । वाड्या-वस्त्यात ।
स्वराज्याचं महत्त्व पटून सर्वांस । शेकडो मावळे बाल शिवबास । येवून मिळाले सहाय्य करण्यास ॥

त्यात बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा ।
एकाहून एक मावळा घेवून शपथेला ।
शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला ॥

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्यांशी मुकाबला करून स्वराज्य स्थापणं सोपं नव्हतं. पण ती जिद्द आणि महत्त्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमांत भरली होती. म्हणूनच,

वंदन करून भवानीला । जिंकाया तोरणा किल्ला । शे दोनशे मावळे संगतीला । शिवराय घेऊन चालला । अंधार्‍या रात्री किल्ल्याचा तळ गाठला ॥

किल्ल्यावर चढून जाण्याला । मारुनी मेखा बुरुजाला । पागोटे लाविले त्याला । हा हा म्हणता मावळा चढून वरती गेला । गर्जना केली 'हर हर महादेव बोला' ॥

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला, तोच शिवाजीनं किल्लेदाराला घेराव घालताच-

किल्लेदार शरण आला । बिनशर्त तोरणा किल्ला । शिवबाच्या स्वाधीन केला । यावेळी पंधरावे वर्ष होते शिवबाला ॥

तोरणा किल्ल्यावरती पहिला बिनी दरवाजाला ।
महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडफडला ॥

जय महाराष्ट्र ॥

स्वराज्याचं बांधलं तोरण । तोरणा जिंकून । शिवाजीराजानं । सारा सह्याद्री गर्जत उठला । जय शिवाजी राजा आपला । शाहीर पिराजीचा मुजरा त्याला ॥
ध्याई - मन / पोट / छाती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  शाहीर पिराजीराव सरनाईक