A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या

स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या
राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला
दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती
सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला
श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा
फुलला रंगपिसारा

रात्र एक मी अथांग होते
नव्हता दीप उशाला
जागहि नव्हती नीजहि नव्हती
नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला
गवसे आज किनारा
चंद्रलेखा संस्थेच्या मोहन वाघ यांनी सांगितले की, आपण वि. वा. शिरवाडकर यांचे नवीन नाटक करणार आहोत. क्षणभर कानावर विश्वास बसला नाही. पण मोहन वाघ यांच्यासारख्या जिद्दी माणसाचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. खूप खूप आनंद झाला.

त्यांचे 'नटसम्राट' पाहिल्यावर माझ्या आईला ओक्साबोक्शी रडताना पाहिले अन् मला माझे अश्रू आवरणे शक्य झाले नव्हते. त्यानंतर अनेक आईवडिलांना सावध झालेले पाहिले होते.

काही दिवसांनी नाशिकला तात्यासाहेबांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांच्या बैठकीत खूप प्रसन्‍न वाटले. स्वच्छ, नीटनेटके, साधे पण सुंदर सगळे, जिथल्या तिथे. मला आठवते तिथली शेक्सपियरची फ्रेम.

१९७३ सालची त्यांची भेट. तात्यासाहेब बाहेर आले आणि त्यांना बघूनच आनंदाने डोळे भरून आले. पांढरा शुभ्र पायजमा आणि पांढरा शुभ्र शर्ट. डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा, चेहर्‍यावर मिष्किल हसू.
हसत म्हणाले, "विदूषक' नाटकाचं नाव आहे बरं का !'

माझी भूमिका होती अंजलीची - संगीत शिक्षिका, पण आंधळी. तीही कुमारिका. नाटक खूप वेगळे. बगाराम हा वेटर आणि आंधळी अंजली यांची प्रेमकहाणी गुंफली जात असताना तिचे आंधळेपण संपून ती डोळस होते. त्या वेळी तिच्या स्वप्‍ननगरीचा राजकुमार तिच्यासमोर मुक्याचे सोंग घेऊन येतो अन् तिला तोडून टाकतो. तात्यासाहेबांनी लिहिलेली गाणी- 'स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा' आणि 'चांद रात भरली आहे, प्रियकराची साथ आहे' ही दोन गाणी आणि श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या चाली. सगळे अप्रतिम. त्यांच्या तालमीत मला खूप काही शिकायला मिळाले. या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आल्या. त्या अजूनही रेडिओवर ऐकताना मन भरून येते.

माझ्या बरोबर गणेश सोळंकी 'बगाराम' होते. तालमीत मला सगळे दिसत होते. 'मला माणसाच्या दुःखाचा वास येतो, ' हे त्यांचे वाक्य आणि त्यांच्या डोळ्यांतले अश्रू मी अजून विसरले नाही. गणेश सोळंकी- ग्रेट ॲक्‍टर आणि ग्रेट माणूस. दत्ता भट यांच्याविषयी - मी काय सांगणार? आम्ही जीव तोडून नाटक केले. कुणी कुठेही कमी पडलो नाही. वाक्यावाक्याला टाळ्या घेतल्या, सगळ्यांनी. अर्थात तात्यासाहेबांच्या लेखणीतून उतरलेल्या संवादांची ती किमया !

आज मोहन वाघ, तात्यासाहेब, दत्ता भट, गणेश सोळंकी, रघुवीर तळाशीलकर आपल्यात नाहीत. पण त्यांची मी सदैव ऋणी आहे. मी आज अजून अभिनेत्री म्हणून उभी आहे, ती मोहन वाघ आणि चंद्रलेखा या संस्थेमुळे.

वि. वा. शिरवाडकर यांच्यासारख्या प्रतिभावान कवी आणि नाटककार यांच्या नाटकात काम करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांची गाणी मला म्हणता आली. माझ्यासारख्या अभिनेत्रीला आणखी काय हवे?
तात्यासाहेबांना विनम्र अभिवादन !
(संपादित)

आशालता वाबगावकर
'विदूषक' नाटकाच्या 'शिरवाडकर जन्‍मशताब्दी विशेष' आवृत्तीच्या परिशिष्टामधून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.