वडाची साल पिंपळाला लावितां कसी लागेल पहा शोधून ।
हेल्यावर जरी दिली अंबारी मटकन बसेल भारानें ।
पखाल आपण वाहूं विसरला घरोघरच असेल गाणं ।
हिजडे जर तलवार मारते शिपायांशी पुसतें कोण ।
उदंड झाला ताजा गधडा याला शोभेल काय वर जिणं ।
कोल्हे कुत्रे भुंकू लागले हत्ती पळेल काय भिऊन ।
भीक मागून पित्रं घालशी तर स्वर्गी कैसा वाजेल घंटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥
कसे मुंगीला पर फुटले घेऊ म्हणती गगन ।
गरुडाची सर याला टिटवी गेली गर्वानें ।
हनुमंतापुढें उडी माराया पण केला कोल्हानें ।
उडी मारीतां धरणीशी पडला झालं बावन गेलें अवसान ।
श्रावणमासा शिदड मातले शेषागरी नेऊं लग्न ।
चित्र वैशाखांत या म्हणून म्हटले तिकडेंच गेले मरुन ।
ताड म्हणतो मी मेरुहून उंच कैलासाशी लावीन फाटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥
राजहंसाच्या पंक्ती बसाया गर्वे गेला कावळा ।
जातां खेपे टोचून पाहे जड लागे माणिक गोळा ।
बेडुक म्हणे मी वेद पढतों डबकामधीं खरडी गाळा ।
मैना सारख्या रडूं लागल्या नित्य रडती वटवाघुळा ।
कोणी कोणाचा गुरु ना चेला घरोघरचे झाले गोळा ।
शिलंगणाचे सोनें आनूं आठ रूपयांचा म्हणे तोळा ।
जसे शिमग्याचे वीर घुमती फौजाचा करिती सपाटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥
तळहातानें चंद्र झांकेना उजेड त्याचा बहुजागा ।
मोत्याच्चा लडींत सरजा दमडीचा तो माल फुगा ।
गुरु गुरकावी चेला टरकावी मात्रागमनी असेल बगा ।
परस्परें जग देत ग्वाही अपकीर्ति माहीत जगा ।
कथा भागवत शास्त्र पुराण हरीचे गुण कोणी गागा ।
नामें विठ्ठलचे असे धडाके ऐकून मूर्खा होय जागा ।
येसू परशराम म्हणे अशिलाचा पोकळ ताठा ।
सार्या गांवाचे ओहोळ मिळून गंगेची करिती थट्टा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥
गीत | - | शाहीर परशराम |
संगीत | - | वसंत पवार |
स्वराविष्कार | - | ∙ पं. वसंतराव देशपांडे ∙ सुलोचना चव्हाण ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | शाहीर परशुराम |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत |
टीप - • स्वर- पं. वसंतराव देशपांडे, संगीत- वसंत पवार, चित्रपट- शाहीर परशुराम. • स्वर- सुलोचना चव्हाण, संगीत- ???. |
गधडा | - | गाढव. |
पखाल | - | पाणी भरण्याची चामड्याची मोठी पिशवी. |
बावन | - | फिजिती. |
मेरू | - | एक पर्वत. |
शिदड | - | गांडूळ. |
हेला | - | रेडा. |
पं. वसंतराव देशपांडे आणि सुलोचनाबाई चव्हाण या दोघांच्या स्वराविष्कारांत शब्दांचा बराच फरक असल्याने येथे शाहीरांचे मूळ शब्द दिले आहेत.
'सोनार शिक्का नवा निघाला' या पोवाड्यातील उपहास बोलका आहे. योग्यता नसताना किंवा सामर्थ्य नसताना उगाचच भलती फुशारकी मारणार्या घमेंडखोर लोकांचा समाचार या पोवाड्यात घेतलेला आहे. शीलहीनांचा गर्व कसा असतो, 'हे येसू परशराम म्हणे, अशिलांचा पोकळ ताठा । सार्या गावचे ओहोळ मिळुनी गंगेची करिती थट्टा' या चरणातून मार्मिकतेने चित्रित केला आहे.'
एकूण परशरामाच्या पोवाड्यातून आलेला हा आशय आणि समाजविचार एका संवेदशील शाहिराच्या प्रतिभेचा उत्कट आविष्कार दाखवून देतो. त्या काळाच्या खुणा शाहिराच्या मनावर उमटल्या होत्या, याचे प्रत्ययदर्शी चित्र प्रकर्षाने जाणवते.
(संपादित)
सयाजीराव छबुराव गायकवाड
स्वातंत्र्यपूर्व मराठी पोवाडा (शिवकाल ते १९४७)
सौजन्य- अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
अंबारी हत्तीवरच ठेवली जाते. तीचा भार त्याला काहीच जाणवत नाही, मात्र तीच अंबारी हेल्यावर (रेडा) ठेवली तर तो बिचारा तिच्या भाराने मटकन खाली बसेल. त्याचे काम म्हणजे पखालीने (पूर्वी कातड्याच्या मोठ्या आकाराच्या पिशव्या असत पाणी वाहुन नेण्यासाठी) पाणी वाहणे, ते त्याने विसरु नये. अर्थात गायन कला, लावणी रचणे हे ज्याचे काम नाही त्याने करू नये, उगाचच हेल्यासारखी स्थिती व्हायची. उठसूठ कोणीही काव्यरचना करु नये. माया-ब्रह्माच्या गोष्टी करू नये, असे शाहीर परशराम, संतु शाहिराला उद्देशून म्हणतात.
• लाविन फाटा- बरोबरी करणे, स्पर्धा करणे.
• खरडी गाळा- सत्त्व सोडून वायफळ चर्चा करणे.
• मोत्याच्या लडीत सरजा दमडीचा तो माल फुगा- मोत्याची गुफंण करणारा दोरा फारसा महाग नसतो पण तो उगाचच फुगून जातो.
• हरीचे गुण कोणी गागा- ईश्वराच्या गुणांचे गायन कोणीही करा.
• अशिल- अ-शील, शील हीन.
• झाले बावन, गेले अवसान- कोल्हा कुवत नसताना उडी मारतो आणि त्याची फजिती होते.
• सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीची ही भाषा. त्याकाळचे संकेत, रुढी, शब्दफेक ह्या गोष्टी विचारात घेऊन अर्थ काढावा.
उदा. संत शाहीर परशरामांची ही रचना.
"बोले कावळा, लवतो डोळा, फुरफुरली भुवई" या ओळीत भुवई ऐवजी बाही हा शब्द आहे. 'बाही' या शब्दाचा अर्थ पूर्वी चुलीशेजारी जे औल असायचे त्यातून उडणारी ठिणगी असा आहे. एरवी बाही म्हणजे हाताची बाजू, भुज आणि भुवई म्हणजे पापणीच्या वरचा भाग.
('आठवणीतली गाणी' करिता लिखित टिप्पणी)
डॉ. माधव खालकर
प्रबंधाचा विषय 'शाहीर परशराम'
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.