चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा
लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा
शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | अरुण दाते, सुधा मलहोत्रा |
राग | - | यमनकल्याण |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, युगुलगीत, कल्पनेचा कुंचला, भावगीत, नयनांच्या कोंदणी |
स्पंदन | - | कंपन, आंदोलन. |
त्याचं असं झालं..
माझा जन्म, ज्यांना सगळं जग रसिकाग्रणी म्हणतं, अशा रामुभैय्या दाते यांच्या घरात झाला. माझे वडील बॅरिस्टर होते पण त्यांना संगीताने पछाडलं होतं. त्यांच्या कामात त्यांनी कधीच हलगर्जीपणा केला नाही परंतु संगीताचं स्थान मात्र नेहमीच अव्वल राहिलं.
हिंदुस्थानात बहुधा असा एकही गायक-वादक नव्हता ज्याने आमच्या घरी येऊन त्यांची कला सादर केली नाही. त्यामुळे घरातल्या चांगल्या संस्कारांबरोबर संगीताचेही संस्कार होतच होते. पण माझा आवाज चांगला आहे आणि मी गाऊ शकतो.. ही माझी कलाकार म्हणून ओळख, माझ्या वडिलांशी, पु. ल. देशपांडे यांनी करून दिली. आणखी एक भाग्ययोग म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलंवहिलं गाणं मला कुमारांनी, पं. कुमार गंधर्वांनी शिकवलं.
१९६२-६३ च्या दरम्यान 'शुक्रतारा' या माझ्या पहिल्या 'मराठी' गाण्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. गझल शिवाय दुसरं काही गायचं नाही, असं ठरवणारा मी, 'मराठी' गायक म्हणून प्रख्यात झालो याचे सर्व श्रेय, माझ्या कवी आणि संगीतकारांना आहे. त्यात तीन नावे प्रामुख्याने घ्यावीच लागतील.. कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि आडनावाचे सार्थक स्वभावात करणारे संगीतकार यशवंत देव. या तिघांशिवाय मी, मराठी गायक झालो नसतो.
माझी उर्दू गझल रेडिओवर ऐकून खळे साहेबांना 'शुक्रतारा'ची चाल सुचली आणि हट्टाने ती त्यांनी माझ्याकडून गाऊनही घेतली. एवढा विश्वास दाखवल्याबाद्दल खळे साहेबांचा मी जन्मभर ऋणी राहीन.
एकदा मला अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, मी एक नवं कोरं गाणं लिहिलं आहे.. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळली नाही. तुला फोन करण्याच्या पाचंच मिनिटं आधी देव साहेबांशी बोललोय. आम्ही दोघांनी हे ठरवलं आहे की या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस. ते गाणं म्हणजे, 'या जन्मावर, या जगण्यावर'. या गाण्याने मला प्रसिद्धी तर दिलीच आणि रसिकांबरोबरच मलाही, बरंच काही शिकवलं.
'सखी शेजारणी' हे वा. रा. कांत यांनी लिहिलेलं गाणं जेव्हा संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलं, तेव्हा त्यांनी हट्ट केला की ज्या मुलाने 'शुक्रतारा' गायलं आहे, तोच गायक मला हवा.
असे भाग्य एखाद्या गायकाच्या नशिबी असणं, ही फार मोठी गोष्ट आहे.
माझ्या गायनाच्या संपूर्ण कारर्किर्दीमध्ये जे जे सहगायक, सहगायिका, वादक, निवेदक, आयोजक आणि इतर सर्व तंत्रज्ञ मला लाभले, त्यांची साथ फार मोलाची आहे. त्यांच्या मदतीशिवाय माझे आणि रसिकांचे सूर कधीच जुळले नसते.
१९६३-६४ च्या दरम्यानची गोष्ट असावी. माझा एके ठिकाणी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर पहिला कार्यक्रम होता.. सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर. मी नवीन असल्यामुळे फक्त दोनच गाणी गाणार होतो. पहिल्याच गाण्यातील एका अंतर्यामध्ये "क्या बात है !" अशी दाद आली. त्या आवाजाकडे माझे चटकन लक्ष गेलं. कारण तो आवाज माझ्या वडिलांचा होता. त्या दरम्यान त्यांची तब्येत खूपच खालावली होती. म्हणून माझी दोन गाणी संपवून त्यांना लगेचच घरी घेऊन गेलो. "तुम्ही तब्येत चांगली नसताना का आलात?" असे विचारले असता ते म्हणाले, "इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर तुझा पहिला कार्यक्रम. हा तुझा आनंद पहावा म्हणून मी आलो. पुन्हा असा येऊ शकेन, असे वाटत नाही. तुझे गाणे ऐकताऐकता आज मला मरण आले असते, तरी चालले असते." आणि खरोखरीच त्या दिवशीनंतर, मी गातोय आणि बाबा ऐकताहेत, अशी मैफल पुन्हा झाली नाही.
एखादी कला तुमच्या सोबत असल्यावर तुमच्या साधारण आयुष्याचं कसं 'सोनं' होऊ शकतं, हा अनुभव मी घेतला आहे. माझ्या गाणं शिकण्याच्या काळामध्ये (जे मी आजपर्यंत करत आहे) दुसर्याचं गाणं कसं ऐकावं आणि त्यातलं चांगलं कसं घ्यावं, हे नेहमीच पाळलं. यामुळे बहुदा माझं गाणं थोडंफार परिपक्व होत गेलं. माझ्यासोबत अनेक गायक-गायिका गात असतात, काही तर माझ्या नातवाच्या वयाचे आहेत. पण कधीतरी ते माझ्या समोर बसून असे गाऊन जातात की वाटतं, आपल्याला अजून खूप रियाज करायचा आहे. इतक्या लहान वयातील त्यांच्यातील कला बघून असं वाटतं की विलक्षण प्रसिद्धी लाभलेला.. मी एक सामान्य गायक आहे.
इंजिनीअरींगच्या अभ्यासाठी ५०च्या दशकात मी मुंबईत आलो आणि के.महावीर यांच्यासारखे एक अप्रतिम गुरू मला लाभले, ही फार भाग्याची गोष्ट. त्यांच्या घरातच गाण्याचा, वाजवण्याचा गोड झरा होता. त्या झर्यातले काही थेंब मला मिळाले आणि माझ्या गाण्याला / आवाजाला आपोआप एक वळण लागलं. त्याशिवाय बेगम अख्तर, मेहदी हसन, तलत मेहमूद, पं. कुमार गंधर्व, उस्ताद अमिरखाँन साहेब, शोभा गुर्टू, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, बालगंधर्व, किशोरीताई आमोणकर, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकार, सुधीर फडके यांच्या गाण्यांनी किंवा संगीताने माझ्यावर संस्कार केले किंवा माझी संगीताची आवड द्विगुणीत केली. अशा महान कलाकारांबरोबरच आजच्या काळातील आरती अंकलीकर-टीकेकर, देवकी पंडित, मिलिंद इंगळे, साधना सरगम, सावनी शेंडे ही नावे प्रामुख्याने घेता येतील.
भावसंगीताच्या बाबतीत म्हणाल तर श्रीधर फडके नंतर तितका ताकदीचा संगीतकार मला दुसरा कोणी दिसत नाही. श्रीधरचे वडील, बाबुजी, यांना मी भावसंगीताचा खरा शिलेदार मानतो. तीच परंपरा श्रीधर उत्तमरीत्या पुढे चालवीत आहे. असेच काम त्याच्या हातून होत रहावे अशी माझी सदिच्छा.
माझा मुलगा अतुल, त्याचा वाढदिवसाला त्याचे जवळचे मित्र.. आजचा आघाडीचा संगीतकार-गायक मिलिंद इंगळे, आजचा आघाडीचा कवी किशोर कदम उर्फ सौमित्र आणि आजचा लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले.. आमच्या घरी बसून गाणं बजावणं करत होते. मिलिंद गात असलेलं गाणं मला फार आवडलं. दुसर्या दिवशी अतुलला सांगून त्यांना बोलावून घेतलं आणि हे गाणं खूप छान आहे. तुम्ही रेकॉर्ड करा असं म्हंटलं. त्यावर ते म्हणाले, "अम्हांला कोणी ओळखत नाही. आमचं गाणं कोण रेकॉर्ड करणार?" हे ऐकल्यावर मी त्यांना आठ-दहा चांगल्या कविता आणि चाली ऐकवा, मी तुमचा पूर्ण अल्बम रेकॉर्ड करायला तयार आहे. पुढे मी आणि कविता कृष्णमूर्ती यांनी 'दिस नकळत जाई' हा त्या दोघांचा अल्बम गायला.
जवळजवळ २७ वर्ष मी टेक्साटाईल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात नोकरी केली. ८९-९० च्या सुमारास व्हाईस प्रेसिडेंट असताना नोकरी सोडून उरलेलं आय़ुष्य गाण्यात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. खरंतर २५ वर्षांपूर्वी चांगल्या पगाराची नौकरी सोडून पूर्णपणे गाण्यात येण्याचा निर्णय खूप धाडसाचा होता.
पण माझा माझ्या कलेवर आणि माझ्या रसिकांवर प्रचंड विश्वास होता आणि तो खराही ठरला.
आजतागायत 'शुक्रतारा'चे २६०० प्रयोग झाले आहेत. फक्त स्वत:ची गाणी गाऊन इतके कार्यक्रम करण्याचं भाग्य मला लाभलं.
हे मी माझ्या आई-वडिलांचे , गुरूंचे, कवी-संगीतकारांचे आणि रसिकजनांचे आशिर्वादच मानतो.
अरुण दाते
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.