मूळ रचना
श्रीरंगा कमलाकांता
हरि पदरातें सोड
व्रजललना नारी
जात असो बाजारीं
अहो कान्हा मुरारी
अडवितां कां कंसारी
मथुरेच्या वारीं
पाहुं मजा गिरिधारी
विकुन नवनित दधि गोड
हरि पदरातें सोड
ऐका लवलाही
गृहिं गांजिल सासूबाई
परतुनिया पाहीं
येउं आम्ही ईश्वरग्वाही
दान देऊन कांहीं
मग जाऊं आपले ठाईं
पतिभयानें देह रोड
हरि पदरातें सोड
गडि तुमचे धरिती
नानापरि चेष्टा करिती
जुलुम आम्हांवरती
मधुसुदना लज्जा हरिती
अबरूच्या गरती
कळली तुमची बदमस्ती
वाइट शिकलां खोड
विनवुन कृष्णासी
शरणागत झाल्या दासी
पाहुन मजा खासी
आणल्या गोपि महालासी
होनाजिबाळासी
मति आगळि कविरायासी
धोंडि सदाशिव जोड
हरि पदरातें सोड
संदर्भ-
म. वा. धोंड
मर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
संपूर्ण कविता / मूळ रचना
श्री. बाळा कारंजकर यांस,
होनाजी या माणसाला त्याच्या आईबापांनी जन्म दिला असला, तरी होनाजी या कवीला तूं निर्माण केलेंस. त्याच्या कवित्वाकडे दुर्लक्ष करून, प्रसंगी तें मारून, तूं स्वतःच कवि म्हणून मिरवला असतास. तेवढी हिकमत तुझ्यांत खचित होती. पण दुसर्याचा गुण घेण्याचा, मग तो होनाजीसारख्याचा असो की फडकर्यांसारख्यांचा असो, दिसेल तेथून गुण घेण्याचा आणि तो जोगविण्याचा फार मोठा गुण तुझ्यांत होता. म्हणून स्वतःच्या कवित्वाचें टांकसाळी नाणें पाडण्याच्या फंदांत न पडतां, तूं होनाजीच्या कवित्वाचा वेल मांडवावर चढविलास. त्यासाठीं त्याची व गुणवतीची युक्तीनें मिळणी करून तूं त्यांच्या वाणीला डंवर आणलास. स्वतःच्या मामुली संसारामागें न लागतां तूं होनाजीच्या कवित्वाचा संसार वाढविलास आणि त्याच्यासह त्यांतच रंगून गेलास.
खरेंच, तुझी आणि होनाजीची मैत्रिकी कसकशी रंगली असेल, याचे चित्र मनोमनीं काढतांना मला जिभेवर मधाचें बोट टेकल्यासारखा आनंद होतो. त्या मैत्रिकीच्या खेळांत आट्यापाट्यांतील मृदंग्यासारखी खेळणारी तुझीच मूर्त माझ्या डोळ्यांपुढें नाचत राहते. टपून बसलल्या दग्यानें शेवटीं दावा साधला तो क्षण वगळल्यास, तूं होनाजीला आईच्या ममतेनें सांभाळीत होतास. हें पाहून तुझ्याविषयींचें कौतुक शिगेला लागते.
होनाजीचे काव्य निसून मी हें नाटक उभे केलें आहे. तें पाहण्यास तूं नाहींस. असतास तर सरस तुकड्यावर येतांच माझ्या पाठीवर थाप ठोकली असतीस किंवा सुमार जाग्यांवर अचूक बोट ठेवून तूं माझ्या पेहरणीला झटका दिला असतास. त्याला मी अंतरलों, याचें मला फार दुःख होतें.
शेवटी एक गोष्ट मुद्दाम सांगावयाची. होनाजीला सोडून तुझें नांव घेणें तुला गैरसंदी वाटलें असतें. म्हणाला असतास, “देवाला झांकून गुरवाला पागोटं बांधण्याचं कारण?" पण तुझें नांव घेण्याचें कारण मी आरंभींच सांगितलें आहे. तुला नांवाजलेले पाहून होनाजीचें मनही कांसेखालच्या चरवीसारखें फेसाळलें असतें.
तुझा आणि होनाजीचा,
(संपादित)
चिंतामणी यशवंत मराठे
दि. ४ एप्रिल १९५४
'होनाजीबाळा' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मराठी प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
नाटकाविषयीं
गेल्या पिढीपर्यंत महाराष्ट्रांतील स्त्री-पुरुषांच्या तोंडी असलेली भूपाळी होनाजीनें केव्हां व कशी रचिली असावी? या फार दिवस मनांत घोळणार्या विषयावर 'श्रीमंतांचें बोलावणें ' ही गोष्ट 'मौज' १९४९ च्या दिवाळी अंकांत मी प्रथम लिहिली. ती श्री. विश्राम बेडेकर यांना आवडली आणि त्यांच्याच कृपेनें तिचें रूपांतर श्री. शांताराम दिग्दर्शित 'अमर भूपाळी' या चित्रपटांत १९५१ सालीं झालें.
होनाजीचें संकीर्तन येथेंच संपलें असें मला वाटलें. पण नाहीं, पुढच्याच सालीं मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह डॉ. अ. ना. भालेराव यांजकडून प्रेष आला कीं मी त्याच विषयावर नाटक लिहावें. कबूल केलें. 'सह्याद्रि' १९५२ च्या दिवाळी अंकांत मी होनाजीवर आणखी एक गोष्ट लिहिली. आणि नवशिक्या नाटककाराला ज्या असह्य वेणा-वेदना सहन कराव्या लागतात त्या केल्यानंतर यंदा नाटक लिहून झालें. या वेणावेदना सुसह्य करण्याचे काम श्री. द. ग गोडसे, श्री. केशवराव भोळे आणि श्री. वि. द. साठे यांनीं अंशत: केलें, मात्र श्री. साठे नाटक पहाण्यापूर्वीच दिवंगत झाले, ही गोष्ट माझ्या मनाला लागली आहे.
नाटक लिहून झालें खरें पण तें फार मोठें झालें. सरकारी वेळेच्या बंधनाचे करकचून बांधलेले दोर या वाढत्या अंगवठ्याला रुपूं लागणार असा रंग दिसला. दोर तर तुटत नाहींत, तेव्हां वाढाव्याची छाटाछाट करणें भाग पडले. हें काम वैद्यकीय हस्तलाघवानें आणि नाट्यविषयक मर्मज्ञतेनें डॉ. अ. ना. भालेराव यांनीं केलें. नाटकाचा खेळ संक्षेपित स्वरूपांत होत असला, तरी प्रकाशकांनी पृष्ठसंख्येचें बंधन न घालण्याची कृपा केल्यामुळे नाटक मुळांत लिहिल्याबरहुकुम प्रसिद्ध होत आहे.
या नाटकांतील होनाजी व बाळा या दोनच व्यक्ती ऐतिहासिक आहेत. बाकीच्या व्यक्ती आणि नाटकांतील सर्वच घटना काल्पनिक आहेत. त्यांना कागदोपत्री काडीचाही आधार नाहीं.
(संपादित)
चिंतामणी यशवंत मराठे
दि. ४ एप्रिल १९५४
'होनाजीबाळा' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मराठी प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.