A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रावणझड बाहेरी

श्रावणझड बाहेरी
मी अंतरि भिजलेला
मिटून चोच पंखातच
एक पक्षि निजलेला

अभ्रांचा हृदयभार
थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस
चिंब होत ओसरतो

उथळ उथळ पल्वलांत
संगळून जळ बसतें
क्षणजीवी वर्तुळांत
हललेंसें भासवितें

चळतें प्रतिबिंब जरा
स्थिर राहुन थिजतांना
बिंदुगणिक उठलेंलें
क्षीण वलय विरतांना

झिमझिम ही वार्‍यासह
स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रेतुन
शब्दांना जाग नसे !
गीत - कवी अनिल
संगीत - सुधीर मोघे
स्वर- हृषिकेश रानडे
गीत प्रकार - कविता, ऋतू बरवा
  
टीप -
• काव्य रचना- २० ऑगस्ट १९६१, नवी दिल्ली.
अभ्र - आभाळ, मेघपटल.
पल्वल - कुंड, लहान तळे.
संगळा - रास, डीग, गोळा.
बंधन आणि मुक्ती : कवी अनिलांची 'दशपदी'

कवितेच्या संदर्भात बोलायचं तर छंदांचं बंधन आणि मुक्तीदायी मुक्तछंद.

पण मुक्तीतही बंधन असतं? मग बंधनात मुक्तीही असेल !
तसंच तर आहे ! पण हा प्रचीतीचा प्रांत, कवितेचे शब्द अनुभवताना आकळणारं सत्य.
अनिलांची कविता समजून घेताना जाणवणारं सत्य.
जी या सीमारेषेवर घर बांधून आहे. जाणीव-नेणिवेच्या, छंदबंधन आणि मुक्तछंदाच्या.

'दशपदी'.. या संग्रहात अनिलांच्या सयमक मुक्तछंदातील दहा ओळींच्या ३९ रचना आहेत ज्यांना ते दशपदी हे अभिधान देतात. अनिलांच्या कवितेवर लिहावेसे वाटत असताना त्यांनी प्रचलित करूनही त्यांच्यापाशीच थांबलेल्या या सुंदर फॉर्ममधील कवितेवरच प्रकर्षाने लिहावेसे वाटले, त्याचे काही कारण होते. अनिलांच्या शैलीच्या आरशात आजच्या कवितेचे वास्तव पहावेसे वाटले.

मुक्तछंद हा शब्द आज ज्या तर्‍हेने वापरला जातो, त्या अर्थाने मराठी मुक्तछंदाच्या आद्य प्रणेत्यांपैकी एक, अशा या कवीने ही संज्ञा वापरलेलीच नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर आज लिहिला जाणारा बराचसा मुक्तछंद, हा मुक्तछंद नाहीच. मुक्तछंदाचेही काव्य-व्याकरण आहे. "एका ओळीचे अनेक तुकडे करून छापले की तो मुक्तछंद होत नाही ! असतो फक्त मोकाटपणा." असं ते विजया राजाध्यक्षांशी प्रस्तावनेत केलेल्या चर्चेत म्हणतात. (ते मुक्तछंद असाच शब्द योजतात, मुक्तच्छ्न्द नाही, दोन्ही पाठभेद अस्तित्वात असले तरी.)

अनिलांना अभिप्रेत असलेला मुक्तछंद- ताल, आवर्तन, यमक हे सर्व स्वीकारतो. फक्त त्यातला जाचकपणा काढून टाकतो. त्याचे लोभस, सोपे वाटणारे पण सखोल अर्थांचे स्तर असलेले प्रयोग ते कवितेवर करतात. कवितेचं हे मोकळंढाकळं घर त्यांनी खूप विचारपूर्वक बांधलं आहे. दशपदीतील कवितेच्या या सैलसर आकृतीबंधामागे त्यांचं कविजीवन आणि विद्वत्जीवन एकारून उभं आहे. त्यांचं लौकिकातलं भावजीवन, प्रेमजीवन, एकान्‍तजीवन सर्वत्र त्यांनी कवितेला मुक्तपणे येऊ दिलं आहे, असाही त्यांच्या मुक्तछंदाचा एक अर्थ आहे. जणू या अक्षर सहचारिणीबरोबर ते या अक्षय घरात राहत आहेत.

'दशपदी'बद्दल बोलताना अनिल सांगतात- "दशपदी हा पूर्वनियोजित रचनाप्रकार नाही आणि तशाप्रकारे मी दशपदी लिहिल्या नाहीत.." त्यांनी ज्या दहा ओळींच्या कविता लिहिल्या त्या आपसूकच यमक असलेल्या अन्‌ काही नव्या मुक्तछंद प्रजातींमध्ये लिहिल्या गेल्या होत्या.

आता प्रश्‍न पडतात. पूर्वनियोजित नसेल तर दहा चरणांचं तंत्र तरी कसं सांभाळलं गेलं? कविता नेणिवेतून पूर्णरूप प्रकटतेही पण मग ती अव्याख्येय असते, नाही का? अनिलांनी या आक्षेपांचा प्रतिवाद इतकाच केला आहे की सर्व दशपदी न ठरवता विशिष्टच फॉर्ममध्ये कशा लिहिल्या गेल्या याचा पुरावा देणे शक्य नाही. अनिल म्हणतात, "स्वत:च्या अनुभवांच्या साक्षीचा पुरावाच ग्राह्य. दुसरा कोणता आधार नाही."

तर, नेणिवेतून प्रकट झालेले हे पद्यबंध एका अंतर्गत शब्द-व्यवस्थेचं पालन करतात. हे मघाशी लिहिल्याप्रमाणे वाटतात तितके मुक्त नाहीत, छंदोबद्ध कवितेतील निरनिराळ्या लोभस प्रचलित लय-तालांचा मागोवा घेत अनिल नवे काव्य-व्याकरण, नव्या मुक्तछंद प्रजातीं जन्माला घालतात. प्रत्येक दशपदीचा पुस्तकाअखेर स्थल-काल-छंद दिला आहे. त्यात सयमक मुक्तछंद 'मानवता' (दोन आणि तीन अक्षरांचे चरणक), 'प्रेमजीवन' (पाच आणि सहा अक्षरांचे चरणक), हे दोन मुख्य आहेत. अन्य रचनांमध्ये भृंगावर्तनी जाती, अग्न्यावर्तनी जाती, हरावर्तनी जाती या मुख्य आहेत. एक भृंगावर्तनी विषमचरणी जातीही आहे ! आणि आपण चक्क मुक्तछंदाबद्द्ल बोलत आहोत !!

दुसरीकडे, भारतीय छंदशास्त्रामध्ये ओळींची एकूण संख्या हा निकष कुठेच येत नसल्याने अनिलांचे हे पद्यबंध इंग्लीश साहित्यातील 'सुनीत' च्या केंद्रवर्ती कल्पनेच्याही जवळ आहेत. अनिलांना दशपदी म्हणजे दहा चरणांचा स्तंभ (stanza चा समानार्थी शब्द) वाटते. चौदा ओळींच्या सुनीतांमध्ये ८+६ किंवा १०+ २ अशा विभागात कवितेतला आशय सिद्ध होतो, असला काही नियम हेतूपूर्वक दशपदीमध्ये नाही, असेही दशपदीचा हा जनक म्हणतो. दशपदीत विरामचिन्हे नाहीत पण प्रत्येक दशपदीच्या शेवटी एक उद्गारवाचक चिन्ह येते, तो त्यातला सौम्य खटका असेही अनिलांचे म्हणणे. कुठेतरी ही खटकेबाज शेवट करण्याची पद्धत सुनीताची आठवण आपल्याला करून देतेच.

तर अशा प्रकारे अनिल दशपदीच्या रूपबंधाबद्दल बरेच काही भरभरून म्हणतात अन्‌ शेवटी 'हे अपुरेच दर्शन अन्‌ तेही कसेबसे सांगून झाले' असंही म्हणून मोकळे होतात !

ही किमान पूर्वपीठिका झाल्यावर 'दशपदी' या लहानशा संग्रहातील कवितीक अनुभवखंडांकडे जायचे. शब्दांचा, संदर्भांचा, त्यातल्या सूक्ष्म अर्थांतरांचा विचार करत लिहिलेली ही कविता एका स्थिर भावजीवनाच्या काळात लिहिली गेली आहे हे स्पष्ट आहे. या कवितेने दु:ख खूप भोगलेले, साहिलेले आहे, पण संपूर्ण कोसळून टाकणारी वाताहत तशी स्वत: प्रत्यक्ष अनुभवलेली नाही . मात्र उत्कटतेने मानवी जीवनातल्या दूरदूरही घडलेल्या एकूण पडझडीची सह-अनुभूती घेतली आहे. (एरवीही अनिलांची जातकुळी 'अशी कुठे लागली आग, जळती जसे वारे, कुठे तरी पेटला वणवा, भडके वन सारे.. किती दूरची लागे झळ, आतल्या जीवा, गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा..' या प्रकारची सहकंपना, संवेदनक्षमता असलेली.)

एक एक अनुभव पचवून रिचवून एक एक दशपदी लिहिली आहे.

'विराणी' या पहिल्याच दशपदीत अभिप्रेत असलेली 'विराणी' म्हणजे ज्ञानेश्वरांची विरहिणी नसून आसमंतात विरून जाणारी 'वैराणी' आहे. वातावरण पावसाळी काळोखाचे, आतही काळोख. (अनिलांच्या बाबतीत हे नेहमीच घडते. निसर्ग आणि मनस्थितीचे एकात्म रूप दिसते. जसे की 'श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला.. पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला..', या अशाच दुसर्‍या एका प्रख्यात दशपदीतील ओळी.)
नुसता गडद अंधकार वीज चमकत नाही
काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही

ओळख-अनोळख, जवळ-दूर, हारणे-हरवणे यातले द्वैत या सर्वदिशी अंधारात सरमिसळून विरून जाते. अस्तित्वालाही या सर्वंकष अंधारात फक्त विरून जावेसे वाटते. विजया राजाध्यक्षांच्या प्रस्तावनेत या कवितेबद्दल बोलताना अनिलांनी लहानपणी बैलगाडीतून प्रवास करताना वाटलेली काळोखाची भीती उल्लेखिली आहे, पण, काळोख, पाणी हे आदिबंध असलेल्या या कवितेच्या वाचनातून मात्र भय ही आदिम भावना तितकीशी पोचत नाही. फक्त एक सल जाणवतो.. म्हणून या कवितेतले काळोखात विरून जावेसे वाटणे मग उग्र वाटत नाही. मरणाच्या प्रतीकापर्यंत पोचत नाही.
हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते
अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते !

'तदात्मता' या दशपदीत पहाटकिरणे आहेत, निसर्गाचा अन मानवाचा अगदी दुसर्‍या टोकाचा मूड. प्रसन्‍न. सौंदर्यानुभवात थरारलेला-
उसांच्या असंख्य तुर्‍यांवरती प्रकाश लहरी डोलत जाती
रुपेरी राखी रंगांच्या लाटा हिरव्या शेतात उसळविती

यासारख्या सुखकर किरणस्पर्शी रंगमग्‍न ओळी. पहाटवेळ सूक्ष्म धूलीकणापासून विस्तारत विश्वव्यापी होत जाते. तो स्पर्श असा विराटरूपी असला तरी त्याच वेळी प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाइतका कोमल, परिचित आहे.
तेव्हा संवेदना अबोध काही तदात्मतेची थरारून जाते
प्रीतीचा पहिला स्पर्श जाणवून सारे अंगांग शहारून येते !

या दशपदीत शब्दाचा उंबरठा ओलांडून अनिल कधी दूर जातात कळत नाही, आपल्यालाही परतत्त्वाच्या स्पर्शाची जाणीव होते..

'एक दिवस' या दशपदीत आलेली भावना अर्धे आयुष्य ओलांडलेल्या प्रत्येकाला आपली वाटेल अशी आहे-
वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले
कसे गेले कळले नाही, हाती फार थोडे आले
दोन दिवस आराधनेत दोन प्रतीक्षेत गेले
अर्धे जीवन प्रयत्‍नात अर्धे विवंचनेत गेले !

आणि मग या पुढल्याच दशपदीतील 'आणीबाणी' कवितेमधील खूप प्रसिद्ध असलेल्या सुरुवातीच्या अन शेवटाच्या दोन-दोन ओळी, अनिलांच्या कुसुमावतींबरोबरच्या उत्कट प्रेमजीवनाची चुणूक.
अशा काही रात्री गेल्या ज्यांत काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो
…..
कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते- नुसते हाती हात होते !

'तळ्याकाठी' ही आणखी एक चलत-चित्रदर्शी दशपदी. पण हे चलत-चित्र शांतरसाचा परिपोष करणारे. येथे पुन: एकदा निसर्ग अन कवीच्या भावस्थितीचे ऐक्य आहे. तळ्याकाठचा नीरव एकान्‍त अन कवीची आत्ममग्‍न मुद्रा. विचारांची निवळलेली धूळ.
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही
गळून पडताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवित कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत

'जुई' या दशपदीतली शब्दकळा पाऊस पडून गेल्यावर जाळीच्या पडद्यातून दिसणार्‍या जुईचे रूप रेखाटते की एका मर्यादशील लावण्यवतीचे?-
कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानात झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत
ही दशपदी खरे तर पूर्णच द्यायचा मोह होतो आहे. सुंदरतेने निथळलेली ठेव आहे ती मराठी सारस्वतातली.

आता 'शरदागम', पण मर्ढेकरीय नव्हे, तर अनिलांचा. प्रसन्‍न. 'चेतनगुणोक्ती' नावाचा एक अर्थालंकार आहे. अचेतन सृष्टी वर चेतन सृष्टीचे गुण आरोपित करणारा. या संपूर्ण दशपदीत अनिल शरद-ऋतू येताना सृष्टीत होणार्‍या बदलांमध्ये विरघळून गेले आहेत, प्रत्येक ओळ आपल्या श्वासात गारवा अन वृत्तीत गोडवा भिनवत नेते.
काळजी करते काळी माती कशी अजून कपाशी नाही फुलली
चौकशी कराया पंख हालवीत निळे तास पक्षी उतरती खाली
शेवंतीला कुणी उगीच सांगे इतक्यात तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची करू नको घाई !

'लावण्य' या दशपदीत एखाद्या अचानक समोर येणार्‍या कुणाच्या तरी 'आगळ्या लावण्या'बद्दल कवीला वाटणारे गूढ आकर्षण कालिदासांच्या 'भावस्थिराणि जननांतरसौहृदाणि' या ओळीची आठवण जागवते. त्या नितांत नेमक्या शब्द-भावसौंदर्यासाठी हे अवतरण-
नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही
रूप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा

कुसुमावतींच्या शेवटच्या आजारपर्वात, त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेली, त्या मृत्यूची चाहूल देणारी 'एकाकी' ही दशपदी-
भिजल्या आहेत पाऊलवाटा आता सार्‍या तुझ्यामाझ्यामधल्या
मिटल्या आहेत जळावरल्या पुसट प्रकाशलाटा शेवटल्या

आपल्या प्रेमाचे मृत्यूच्या धूसरतेत विरणारे चित्रही कुसुमावतींच्या अखेरच्या दिवसात त्यांच्याबरोबर कवितेतूनच अनुभवणारे, सोसणारे कवी अनिल. नि:शब्द करणारी शब्दयोजना. खर्‍या अन खोल प्रेमाला चिर-विरहाचा शाप असतोच ना?

'गतार्थ' सारखी एखादी दशपदी शब्दांचे अर्थ हरवणे अन मुकेपणा दाटणे अशा वेगळ्या विषयावर असूनही शब्दबंबाळ म्हणून वेगळ्या अर्थाने अर्थहीनही वाटते.
पण निसर्गात मनापासून रमणार्‍या कवीला 'माघ' मध्ये पुन: ती हरवलेली अर्थवत्ता सापडते. माघाच्या पुसट फिकट संध्याछायांमध्ये दिवस पुन: ढळतो, तेव्हा-
शेंगांचे पिवळेपण कण्हताना रुणझुणते
उदासीन फांद्यांवर रुक्ष जिणे गुणगुणते

नंतर 'फाल्गुन' ! निसर्गामध्ये मोकळेपणाने रमणारी ही कविता पुन: एकदा चेतनगुणोक्तीचा हवाहवासा शिडकावा करते. अग्न्यावर्तनी जातीतील ही रचना शब्दांच्या उष्णतेने जणू धगधगते, त्या उष्णतेचा सृष्टीतील कामज्वराशी संबंध जोडते.उघड्यावर मांडलेल्या चोरट्या प्रणयाची आगळीक फाल्गुनाच्या या प्रतीकात सामावून जाते-
वनलतांच्या नेणत्या नव किसलयांशी कोवळीकी
चोरट्या करवंदिचे चवचाल चाळे आडवळणी वेगळीकी
शीर्ण पाने ढाळता नि:संगतेने पळस कासावीस होतो
लपवताना वासनांचे सोस सहसा संयमा सोडून

चित्रे निसर्गाचीच नसतात. ती चिरविरहानंतर रेखाटलेली प्रियेच्या आठवणींचीही असतात. 'सावल्या' आणि 'चित्र' मधली ही शब्दचित्रे-
तू आहेस स्वत: की चित्र जिवंत झालेले
अश्रूत विरलेले उसासे रूप घेउन आलेले
तुझे जवळ जवळ घेणे आपण दूर दूर राहून
मी चूरचूर होताना तुझ्या यातना साहून

एकाकीपण. विरहाच्या आतून आतून फुटून वाहणारी आर्तता. अग्न्यावर्तनी जातीतील 'दाद' ही दशपदी अनिलांमधला अव्वल गीतकार प्रकट करणारी-
कुणी जाल का सांगाल का सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली

मग स्वीकार. 'तुझ्याविना' या जाणीवेचा, त्याच नावाच्या शेवटच्या दशपदीतून. गझलेशी खूपच जवळीक साधणारी रचना
कितिक काळ हालला असा तुझ्याविना
कळे न श्वास चालला कसा तुझ्याविना
…..
लवथवत्या पानावर गहिवरते भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे कसा तुझ्याविना

शब्दांची, प्रतिमांची, कवितेच्या रूपबंधातून येणार्‍या प्रत्ययाची अभ्यासपूर्ण जाणीव एकीकडे. प्रतिभेच्या स्पर्शाने संपन्‍न झालेली नेणीव दुसरीकडे.

अनिल आणि पु. शि. रेगेंसारखे कवी सोपेपणा अवघड करतात अन्‌ अवघडपणा सोपा. दशपदीतला मुक्तछंद अशा प्रकारच्या कवितेच्या आकलनासारखाच आहे.. सहजसाध्य वाटतानाच चकवणारा, आपल्याच अस्तित्वाच्या आतल्या स्तरांच्या उत्खननात आपल्याला नेऊन सोडणारा.
(संपादित)

भारती बिर्जे डिग्गीकर
सौजन्य- maayboli.com
(Referenced page was accessed on 10 June 2019)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.