A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सत्वर पाव ग मला

सत्वर पाव ग मला । भवानीआई रोडगा वाहीन तुला ॥१॥

सासरा माझा गांवी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥

सासू माझी जाच करिते । लवकर नेई ग [१] तिला ॥३॥

जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर ग तिला ॥४॥

नणंदेचें कारटं [२] किरकिर करितें । खरूज होऊं दे त्याला ॥५॥

दादला मारून आहुती देईन । मोकळी कर ग मला ॥६॥

एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे । एकटीच राहूं दे मला ॥७॥