A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सर्वेश्वरा शिवसुंदरा

सर्वेश्वरा शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना

सुमनात तू गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना

करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाऊले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना