A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा

जय महाराष्ट्र ॥

हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी ।
ते सर्व मराठे आम्ही साडेपाच कोटी ।
ऐक्याची शपथ घेऊया काय मग खोटी ।
दावून कधी काळींचे । दैन्य भाळींचे । दिस सोन्याचे । भविष्यापोटी ॥

राज्य मराठी नागपूराहून गोव्यापर्यंत ।
पैठण इकडे पसरे तिकडे दर्या अपरांत ।
तापी वरदा वाहती झुळझुळ तशी वैनगंगा ।
गोदा भीमा कृष्णा आणिती जीवन रसरंगा ॥

हा दगड फुलांचा मर्द मराठी देश
कणीकोंडा खाया, अंगी फाटका वेष
परि नसानसांतून संचरतो आवेश
स्वातंत्र्यदेवीचे भक्त । उसळते रक्त । इमानी सक्त । साक्ष परमेश ॥

परिमळामाजि कस्तुरी । फुलांत फूल मोगरी ।
ये मराठीचिये घरी । विद्येचा सुकाळू करी । ती अद्भुत ज्ञानेश्वरी
तुकोबाची भावपंढरी । इथे कडेकपारीमधुन घुमली शाहिरी ॥

भाषा जहाल चिपळुणकरी । केशवसुत देति ललकारी । गर्जती टिळक केसरी । हरिभाऊंची कादंबरी । जोतिबा जळती अंतरी । अण्णांची नाट्यचातुरी । देवलांची कोणाला सरी । पुढे कोल्हटकर गडकरी । पठ्ठे बापुराव फडकरी । शाहीर हैदर लहरी । बालकवी निर्झरापरी । केळकरी नर्मचातुरी । सानेगुरुजी भावनिर्झरी । तांब्यांची गोड ललकारी ॥

या मराठीच्या मंदिरी । आसनावरी । थोर कितीतरी । शारदापुत्र कीर्तीवंत ।
कवी कथाकार कलावंत । किती शाहीर किती संत ॥

अजिंठ्याची कला काय खुले । नागपूरात वैभव झुले ।
कोरड्यात कपासी उले । कृष्णाकिनारी शाळू डुले ।
कोकणची फळे अन्‌ फुले । मुंबईला बघुन मन भुले ।
'जय महाराष्ट्र' गर्जती धरतीची मुले ॥

मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा । जरा मनात आणा । त्यांचा त्यागाचा बाणा । नाही भ्याले मरणा ।
शिवराय बाजी तानाजी । ते धनाजी नि संताजी । पेशवाई पहिला बाजी । अभिमन्यूपरी जनकोजी । राघो भरारी नि महादजी । महादजी हो गोखला बापू रणगाजी ॥

सत्तावन सालचे बंड । पेटले चंड । राहू काय थंड । ठोकुनी दंड ।
मराठे प्राण देती समरात । मर्दानी झाशीवाली हो त्यात । सायबानं हाय खाल्ली चित्तात ॥

आम्ही नेक मराठे हिंदभूमीचे पुत्र । आम्ही पूज्य मानतो एकच हिंदी छत्र । आमुचे आम्हाला घर राहू दे मात्र ।
ही एक आमुची आस । एक हा ध्यास । याच घोषास । करू सर्वत्र ॥

सह्याद्रीचे पिउनी वारे कृष्णेचे पाणी । वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जयगाणी ॥

तो प्राण पाखडी वासुदेव बळवंत ।
चाफेकर फासावर गेले झाले यशवंत ।
सावरकर जन्मठेपेत अंदमानात ।
सात वर्षं सजा टिळकांना ब्रह्मदेशात ।
राजगुरू भगतसिंगाचा छावा स्वर्गात ।
शिरोड्याला रंगले मीठ मर्द रक्तात ।
बाबू गेनू शूर वीरांची मरणावर मात ।
क्रांतीवीर कर्मवीरांचा आमुचा प्रांत ।
परमवीर चक्र राण्यांना पहिले देशात ।
तो मराठभूचा पुत्र विनोबा संत ॥

या हो सान थोर कुलवंत । कवी कलावंत । संसारी वा संत ।
जय जय महाराष्ट्र बोला । बोला एकस्वरीं बोला ।
घोष तो भिडवू गगनाला ॥
अपरांत - कोकण.
कणीकोंडा - कांडताना तांदूळ कांडल्यावर उरलेल्या कण्या.
कस्तुरी - एक अतिशय सुगंधी द्रव्य.
ललकार - चढा स्वर / गर्जना.
सान - लहान.
युद्धात धारातीर्थी पडणार्‍या सैनिक बांधवांविषयी प्रत्येक राष्ट्रात नितांत आदर असतो. काळजाचा एक कोपराच त्यांच्या स्मरणासाठी राखून ठेवलेला असतो. एकीकडे त्यांच्या आठवणींनी पापणीचे काठ ओलावत असतात तर दुसरीकडे त्यांच्या मर्दुमकीचा आणि अतुलनीय शौर्याचा अभिमान नसानसांत तटतटलेला असतो. धारातीर्थी पडलेला माणूस सामान्य शिपाई असो की अनेक अक्षौहिणी दळे इशार्‍यासरशी रणांगणाच्या पटावर हलवणारा सेनानी असो, त्याचे नाव राष्ट्राच्या लेखी एकच असते- सैनिक. त्यामुळे आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली इतिहाचा पाया घालण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा चिखलगारा केलेला असतो, त्याचे स्मारक उभारताना त्यांच्या नावाची दीर्घ यादी कोरण्यापेक्षा अज्ञात सैनिकाच्या स्मृतीसाठी कीर्तीस्तंभ निर्माण केला जातो. हा unknown soldier अमूक एक कोणी नसतोच. तो असतो ज्वलंत पण अमूर्त त्यागाची मूर्ती. त्या स्मारकापाशी नतमस्तक होणारा प्रत्येक माणूस आठवत असतो समरांगणारावर पडलेल्यांचे धीरोदात्त बलिदान. जे वेदीवर बळी गेलेले असतात त्यांचीही अपेक्षा वेगळी नसतेच. पुढील पिढ्यांनी कोणाचे नाव लक्षात ठेवले नाही तर एकवेळ चालेल, त्यांनी लक्षात ठेवायला हवी ती अंतिम त्यागाची पूर्वजांनी दाखवलेली तयारी.

कृतज्ञता हा सुसंस्कृत माणसाचा श्रेष्ठ गुण आहे. तो न जाणवण्याइतका दुर्मिळ होता कामा नये. ज्या राष्ट्रातले लोक आपल्या शौर्य-धैर्याच्या कहाण्या विसरतात, वीरगाथांची संभावना जुनाट पुराणकथा म्हणून करतात, प्रसंगी बलिदानाची देखील टवाळी करतात त्या राष्ट्राचे भवितव्य अंधकारमय असले तर त्यात काही नवल नाही,

आंधळी प्राचीनपूजा ही वांझोटी असते आणि नाकर्तेपणा लपवण्यासाठी माणसे तिचा आडोसा घेतात. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात रोमांचकारक घटना घडल्या आणि शौर्य-धैर्याचे, त्यागाचे, पराक्रमाचे अलौकिक दर्शन आपल्याला झाले. भारतीय हुतात्म्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेला इतिहास हाच वर्तमानकाळाचा स्फुरणदायी उपोद्घात आहे. भविष्यातील स्वातंत्र्यवीरही असिधाराव्रत घेताना स्वातंत्र्यावीर सावरकरांप्रमाणे ग्वाही देतील,
की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने
लब्धप्रकाश-इतिहास-निसर्गामाने
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे
देशाच्या उज्‍जवल 'उद्या'साठी ज्यांनी नि:स्वार्थीपणे आपला 'आज' खुडून टाकला त्या हुतात्म्यांच्या शौर्याची आणि त्यागाची पूजा कृतज्ञ देशाने केलीच पाहिजे.

शाहिरांची प्रेरणाही मुख्यत: हीच असते. वीरांचे विस्मरण होऊ नये, ही प्रत्येक शाहिराची मनीषा असते. या असोशीमुळेच शूर मर्दाचे पोवाडे रचले जातात, गायले जातात आणि शाहिरांच्या मशालीवर आपापल्या मनाच्या मशाली पेटवूनच प्रत्येक श्रोता थरारून जातो.
'शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचे आठवावा प्रताप' म्हणणार्‍या समर्थ रामदासांच्या प्रत्ययकारी काव्याइतकेच महत्त्व अगीनदासाच्या पवाड्यालाही आहे.
सिंहगड जिंकताना तानाजीने केलेला पराक्रम आणि त्याला आलेले वीरमरण यांचे तुळाशीदास शाहिराने काढलेले चित्र पुसून गेले नाही, हेच सावरकरांनी पुन्हा विसाव्या शतकात 'धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यचि तानाजी' असा जो पोवाडा लिहिला आहे, त्यावरून स्पष्ट होते. लोकांचा लोककल्याण राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी हा तर निदान तीन शतके शाहिरांच्या स्फूर्तीचे अखंड निधान ठरेलेला आहे.

पोवाड्यांची परंपरा मराठशाहीतील शाहिरांनी पुढे चालवली, विकसित केली आणि समृद्ध केली. मराठशाहीच्या सुखदु:खाशी ते समरस झाले होते. त्यांनी शूर मर्दाच्या पराक्रमाचे पोवाडे लिहिलेच पण पानपतच्या घनघोर युद्धात हजारो मराठ्यांनी मरणाचे स्वागत कसे केले, याची उदात्त करुण कहाणीही पोवाड्यातून सांगितली. या शाहिरी कलेला जात माहीत असते ती एकच- शूर मर्दाची, धर्म माहीत असतो तो एकच- स्वदेशासाठी मरण्याचा, हे पेशावाईतील लहान-थोर शाहिरांनी कृतीनेच पटवले आहे. सगनभाऊ मुसलमान होता आणि रामा सटवा मांग किंवा रामोशी. असली नोंद खानेसुमारी करणार्‍यांनी हवी तर करावी. त्या दोघांनी पानिपतच्या दारुण पराभवावर वीर आणि करुण रसांचे पवाडे रचले आहेत, यात सारे आले. होनाजी, रामजोशी, प्रभाकर, परशराम, अनंतफंदी या समाजाच्या नाना थरांतल्या शाहिरांची महाराष्ट्र धर्माच्या अभिनिवेशाने मराठशाहीचे पवाडे गायले आहेत.

पानपतचा पराभव पचवून मराठ्यांनी आपला दरारा चहू दिशांत बसवल्यानंतर पुण्याला आलेल्या वैभवाचे चित्रही काढावे ते शाहिरांनीच. आणि रावबाजीने आणलेल्या अवकळेबद्दल हळहळावे तेही शाहीरांनीच. सावई माधवरावांचा रंगाचा दरबार रंगवणार्‍या प्रभाकरानेच खर्ड्याच्या लढाईत निजामाशी यशस्वी झुंज घेणार्‍या मराठ्यांच्या ऐक्याचे आणि सामुहिक पराक्रमाचे जिवंत आणि रसरशीत चित्र काढले आहे. पुढे मराठशाही गेल्याचे दु:ख व्यक्त केले ते कोण्या शास्‍त्र्याने, पंडिताने नव्हे.. तेही दु:ख ओसंडून वाहते फक्त पोवाड्यांतच. 'जरिपटका हत्ती अमुचा रुतला गाळात' असे पिळवटून म्हणणारा आवाज फक्त शाहिरांचाच. 'राष्ट्र जगले काय किंवा मेले काय, यांना सर्व सारखेच.' असे संतापाचे उद्गार काढ्न टाळकुट्या संतांचा अधिक्षेप करणार्‍या कोपिष्ट इतिहासाचार्यांना शाहिरांच्यावर अशी आग कदापि पाखडता येणार नाही.

अव्वल इंग्रजीतही पंडिती काव्याचा र्‍हास होत गेला असला तरी शाहिरांच्या हातातला डफ तापलेला होता. तुणतुण्याची तार तारस्वरात झंकारत होती. ऐन पराक्रमाचे दिवस मावळले होते पण कुठेतरी कधीतरी गरिबांच्या कळवळ्याने लढत रहाणारे एकांडे वीरही होतेच. भाबड्या शाहिरांना तंट्या भिल्लाची मर्दुमकीही रुचायची आणि हिकमती उमाजी नाईकाची हिंमतही त्यांच्या कवनाचा विषय व्हायची. ऐतिहासिक दृष्टी नसणार्‍या आपल्या समाजाने गावोगाव नव्हे तर रानोमाळ पसरलेल्या पवाडेकारांची नोंद दप्तरात केलेली नसली तरी आजही अतूट परंपरेवरून अशी शाहिरी जिवंत असल्याची कोणाचीही खात्री पटेल. चव्हाट्यावर, चावडीच्या ओट्यावर, हनुमंताच्या देवळालगत, वट-पिंपळाच्या पारावर, साहुकाराच्या अंगणात आणि कष्टकर्‍यांच्या कंगाल वस्तीवर मिळेल त्यावर समाधान मानणारे, हालात आणि गरिबीत जगणारे पण तरीही आपला आवाज आणि अनामिक शाहीर १९व्या शतकात मराठभूमीत हिंडत राहिले असतील. शिष्ट आणि नागर समाजाला थांगपत्ता असेल किंवा नसेलही, पण 'वहाण पायी अंगि कांबळी, उशाखालि धोंडा' अशी राहणी असणार्‍या शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना, कारूनारूना या शाहीरांची नक्कीच जानपहचान होती. शाहिरांचा श्रीमंत आश्रय तुटलेला होता पण आपल्या भाकरीतला अर्धा कोर त्यांना देणार्‍या उदार माय-बापांची वाण नव्हती.
पुन्हा हे शाहीर तरी कोण? शाहिरीची मिरास भटब्राह्मणांनी केव्हाच सोडली होती. इमानदारी होती ती नीच मानल्या गेलेल्या कनिष्ठ जाती जमातीत. पडल्या काळातही लोककला जगवल्या गोंधळ्यांनी, पोतराजांनी, वासुदेव-भुत्यांनी आणि व त्याहूनही शाबास म्हणजे महार-मांग-रामोशांनी.

हा वाणवसा सत्यशोधक समाजाने व आंबेडकरी जलशांनी टाकला तर नाहीच, उलट त्यात समकालीन विषय आणून विषमता आणि अन्याय यांच्याविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी या हत्यारांना त्यांनी नवे पाणी चढवले. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी जी प्रदीर्घ झुंज झाली तिचेही प्रतिबिंब नागर साहित्यापेक्षा या रांगड्या साहित्यातच पहायला पाहिजे. आजही सहज आठवण केली तरीही कोल्हापूरच्या लहरी हैदरसाहेबापासून लालबागच्या अण्णाभाऊ साठे, अमरशेखांपर्यंत पाचपंचवीस शाहिरांची नावे नजरेपुढे तरळू लागतात. मुचाटे, खाडिलकर उर्फ पांडुरंग शाहीर, नानिवडेकर, दीक्षित, शंकर निकम अशा शाहिरांनी ज्यांची राष्ट्रीय वृत्ती जागवली आणि पेटवली, अशी माणसे आपल्या सुदैवाने आजही हयात आहेत. स्वातंत्र्यानंतरही सामाजिक प्रबोधनासाठी आणि उदात्त विचारांच्या प्रसारासाठी कंबर कसलेले आणि हातात डफ घेतलेले शाहीर महाराष्ट्राच्या सर्व विभागांत झाले आणि आहेत. निकटवर्ती असल्यामुळे असेल, शाहीर लीलाधर हेगडे यांचे नाव हाताच्या पहिल्या बोटावरच येते. आता चार तपे होतील, तापवलेल्या कड्यावर कडकडून थाप मारीत हा शाहीर पोवाडे गातोच आहे. तसेच आपले शाहीर साबळे, एक अव्वल दर्जाचे गायक शाहीर. अर्थात इतरत्रही सांगली-सातारा-कोल्हापूरकडे, वाईला, खानदेशात, मराठवाड्यात, वर्‍हाडातही तडफदार शाहीर आहेत याची मला जाणीव आहे. आत्माराम पाटील, पवार, वनमाळी, वाईकर, देशपांडे, शाहिरांतले शेलारमामा पिराजीराव सरनाईक यांचा मला विसर पडणे शक्य नाही.

येथे मी म्हणजे कोण? मला म्हणजे कोणाला? तर मी म्हणजे प्राध्यापक वसंत बापट नव्हेच, पण आजवर महाराष्ट्राने ज्याचे खूप कोडकौतुक केले तो कवी वसंत बापटही नव्हे. येथे मी म्हणजे शाहीर वसंत बापट. लावणी आणि पोवाडा या दोहोंवर निहायत खूष असणारा मी, पण तोही येथे अर्धाच पोवाडेकार ! आणि पोवाडेकारांतलाही अर्धा शहाणा ! पोवाडे रचणारा पण ते गाण्यासाठी गाता गळा नसणारा. अर्थात झील धरण्यापुरती गायनी कळा माझ्या अंगी नाही असे नाही. माझ्या समजुतीप्रमाणे पोवाड्याची म्हणून एक लयकारी असते. ती आशयानुरूप वळणे घेते. ती मला बर्‍यापैकी समजते, पण फडाचा नायक आपण होऊ शकणार नाही हे मात्र मला उत्तम समजते ! या उलट लीलाधर हेगडे. तेही अर्धे शहाणे. पोवाडे सादर करण्यात तरबेज. मग आम्ही काय केले मी पोवाडे रचावे, गाणार्‍या शाहिराने ते सादर करावे. हे असे गेली ४३ वर्षे चालले आहे. हवे तर आंधळ्याची आणि लंगड्याची जोडी म्हणा किंवा रचणारा होनाजी, गाणारा बाळा. रचणारा प्रभाकर, गाणारा महादेव किंवा गंगाधर या परंपरेचे आणखी दोन पाईक म्हणा.

आधुनिकांत आपल्या इतर साहित्यसेवेबरोबरच हे शाहिरी कवित्वही जपावे, जोपासावे असे फारसे घडलेले दिसत नाही, केशवसुतांच्या तुतारीला सामाजिक सुधारणेचा पोवाडा असे आपण म्हणतो, ते केवळ लक्षणेने. गोविंदाग्रजांना प्रेमाचे शाहीर हे बिरूद जनतेने दिले ते मुख्यतः त्यांच्या प्रेमावरच्या प्रेमासाठी. सावरकरांनी पोवाडे रचले ते मुख्यतः त्यांच्या मित्रमेळ्यासाठी, पण पुढे त्यांच्या तुफान जीवनसरणीत आणि खडतर मार्गात अधिक शाहिरी करण्याएवढी सवड त्यांना उरली नाही. अलिकडील काळात ग. दि. माडगूळकर हा हुरहुन्‍नरी कवी पोवाडाही रचून गेला आहे. या ना त्या कारणाने त्यांनाही त्या मागनि दीर्घकाळ जाता आले नाही. हे असे का झाले असेल? राजसंन्यास लिहिणार्‍या मराठी भाषेच्या त्या थोर मानकर्‍याला आयुष्यच कमी मिळाले. एरवी गडकर्‍यांच्या रसवंतीने पवाड्याचा ठसठशीत दागिना नैसर्गिक विभ्रमाइतका सहजपणे धारण केला असता. पण ते घडायचे नव्हते. प्रबळ कृतिशील आयुष्यामुळे डफ-ढोलकीकडे वळायला सावरकरांनाही फुरसत मिळाली नाही. गीतमोहिनीने माडगूळकरांना एवढे भारून टाकले आणि चित्रमय गीतसृष्टीत ते इतके रमले की धकाधकीची शाहिरी सांभाळणे त्यांना दुरापास्त झाले.

येथे उल्लेखिलेल्या थोर शारदापुत्रांच्या तुलनेने ज्याची शिदोरी तुटपुंजी आहे आहे त्या मी मात्र शाहिरी कवित्व सातत्याने करीत राहावे हे एक आश्चर्यच घडले आहे. पण हे आश्चर्य मी मुद्दाम घडवलेले नाही. मी कोणाशीही होड घेतलेली नाही. स्पर्धा करण्याची ताकदही बहुधा माझ्यात नसावी. मग शाहिरी कवित्व मी सांभाळले ते नेमके कशामुळे? माझ्या शाहिरीमागच्या प्रेरणा कोणत्या? व्यावहारिक भाषेत विचारायचे तर या फंदात मी का पडलो, कसा पडलो? आणि ही प्रचारकी कविता आहे असल्या शिष्ट संभावनेला शरण जाण्याचे नाकारून मी या वाटेवर चालत कसा राहिलो? खरे म्हणजे या प्रश्नांची उत्तरे मी देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणार्‍या एखाद्या तटस्थ अभ्यासकाने वस्तुनिष्ठ दृष्टीने द्यायला हवीत.

पोवाडा या प्रकाराची भरपूर जाण लहानपणीच मला आली. पुढे कॉलेज जीवनाच्या पहिल्या तीन वर्षांची नाकर्तेपणाची, सुखवस्तू कारकीर्द मी संपवली ती १९४२ च्या बंडात उडी घेऊन. या अनुषंगाने विकसित होत जाणार्‍या माझ्या कवित्वशक्तीची दोन रूपे होती. एक समुदायाने म्हणण्यासाठी रचलेल्या गीतांचे आणि दुसरे डफ-तुणतुण्यावर कडाक्याने गावे अशा पवाड्यांचे. या दोहोंचा मी स्वीकार केला होता आणि आजही मलादोहोंविषयी जिव्हाळा आहे.

शाहिरी वाङ्मयाची ओढ मला असती आणि काव्यरचनेचे विविध प्रकार अंगीकारावे अशी महत्त्वाकांक्षा किंवा शक्ती असती तरीही माझ्या हातून पोवाडे रचले गेले असतेच असे नाही पण माझ्या आयुष्याचा प्रवाह ज्या मार्गाने जात राहिला तो मार्गही मुलखावेगळा होता, म्हणूनच माझ्यामधला शाहीर जिवंत राहिला, असे मागे वळून पाहाताना आज मला वाटते.
१९४२ च्या आंदोलनात मी अंगेजणीने भाग घेतला होता; पण मरण आले तरी बेहत्तर या निश्चयातल्या अभंगपणाची कसोटी माझ्या वाट्याला आलीच नाही. मी भूमिगत होतो, मला शिक्षा झाली, स्थानबद्ध म्हणूनही कारावासात होतो, ही गोष्ट सत्य असली तरी मी माझ्या अंगीकृतासाठी फार कष्ट केले, असे माझ्याच्याने म्हणवत नाही. मी आता स्वातंत्र्य-सैनिक या पदवीला लायक ठरलो आहे आणि या गोष्टीचे लाभही मला मिळत आहेत. कधी आपल्याशीच मी पुटपुटतो, 'अरे, ते मंतरलेले दिवस तुझ्यापुरते तरी बेहोषीचे आणि आनंदाचे ठरले; तुझा बंदिवास म्हणजे एखाद्या वसतिगृहातल्या जीवनासारखा तर होता.'
पण यापेक्षाही माझ्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ उसळतो तो वसंत दाते या माझ्या मित्राला महाडच्या गोळिबारात वीरमरण आले त्या हकीगतीमुळे. ४२ च्या या अखेरच्या बंडात हुतात्मे झालेल्यांची नावे डोळ्यांपुढून तरळत जातात. हेमू कलानी, भाई कोतवाल, शिरीषकुमार आणि वसंत दाते हे तर माझ्या पोवाड्यांचे नायकच आहेत. पण त्यांच्याखेरीजही अष्टी, चिमूरपासून सातारा-कोल्हापूर-बेळगावपर्यंत अनेक रोमहर्षक समरप्रसंग झाले आणि कैकांनी प्राणाहुती दिल्या. त्यांच्या थोरवीची कल्पना करताना मला माझे थिटेपण फार छळू लागते. पुढेही हैद्राबाद, गोवा याचे मुक्तिसंग्राम, तसेच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि अखेर १९७५ चे आणीबाणीचे काळे पर्व या सर्वांत आपण प्रत्यक्ष भाग घेतला नाही याचीही खंत वाटते. मात्र १९४२ पासून घडले ते एवढेच की, स्वतंत्र भारतातील सर्व वार्‍यावादळांपासून मी मनाने कधीच दूर राहिलो नाही. प्रत्यक्ष कृती जमली नाही खरी पण घडणार्‍या महाभारताच्या प्रत्येक पर्वात संजयासारखा मी साक्षी तर होतो ना ! धृतराष्ट्रासारखा आंधळा नव्हे तर तर संजयासारखा डोळस साक्षी ! कदाचित म्हणूनच आपल्या अंगी असलेल्या चिमुकल्या शक्तीच्या आधारे आपण वीरांची गाणी गावी, बलिदानाचे पवाडे रचावे, अशा एक प्रकारची पळवाटही मी काढली असेल.

पोवाड्यांची भाषा आंतरिक दाबामुळेच ठोसर आणि कणखर बनलेली असते. जनसामान्यांच्या भाषेशी, महाठीच्या रांगड्या वळणाशी ही भाषा इमान राखते. मात्र ज्ञानेश्वरांना, देशी भाषेचे वैभव वाढवायचे असूनही, शारदेचे स्तवन करताना 'अभिनववाग्विलासिनी चातुर्यकलाकामिनी विश्वमोहिनी' अशी प्रौढ संस्कृत-प्रचुर शब्दकळाच रुचली.. तशी शाहिरी कवित्वाची भाषाही प्रसंगानुरूप रांगडेपण टाकून जरानागरी परिवेष धारण करते. अर्थात कोणत्याही प्रसंगी तिला जनसामान्यांच्या क्षितिजापलीकडे जाता येत नाही. आधुनिक पोवाडा हा मुख्यतः खाडिलकर प्रभृती २० व्या शतकातील शाहिरांनी निर्माण केलेल्या धाटणीचा असतो. तो अनेक चौकांचा म्हणजे अनेक प्रकरणांचा असतोच असे नाही. पोवाड्याच्या रचनेत मुख्य भाग असतो तो मात्रावृत्तांचा म्हणजे जातींचा. मात्र जातिरचनाही सैल, सुटसुटीत केलेली असते. हे ओढाताणीचे समर्थन नाही. पण बोलभाषेतील मुक्त चलन, नाट्यानुकूलता आणि वक्तृत्वमूल सरणी या आवश्यक घटकांच्यामुळे पोवाड्यांच्या रचना सैलसर होणे स्वाभाविक आहे, हे येथे ध्यानात ठेवले पाहिजे. पोवाड्यांच्या रत्तनाबंधाचे अनेक प्रकार आहेत आणि ते आशयानुरूप तसेच एकसुरीपणा टाळण्यासाठी आलटून पालटून उपयोजिले जातात. दांगट चाल, कटाव, एकचरणी साकी किंवा चंद्रकांत आणि कथनाला उपयुक्त असे पाच किंवा सहाचरणी बंधही पोवाड्यात येतात.

मुख्य गोष्ट आहे ती पोवाड्याच्या पोवाडेपणाची. पोवाड्याचा आकृतिबंध काहीही ,असो, त्याचे अंतःस्वरूप एकच आहे. पोवाडा म्हणजे महाकाव्य नव्हे, कथाकाव्य नव्हे, खंडकाव्य नव्हे, वार्तालाप नव्हे आणि अनेक घटनांचे क्रॉनिकल उर्फ रिपोर्टही नव्हे. ते शुद्ध नाट्य नव्हे, काव्य नव्हे, सरधोपट कथनही नव्हे. या नेति नेति लक्षणांचा अभिप्राय काय आहे- कधी कथन, कधी नाट्य, कधी काव्य, कधी उद्बोधन, कधी रंजन अशा नाना माध्यमांतून पोवाडा आपल्या श्रोत्यांशी हृदयसंवाद करीत असतो. आपल्या हृदयींचे लक्षावधी हृदयांत ओतावे अशा ईष्येने शाहिराने केलेले ते प्रकट भावप्रसरण आहे. शाहिरी कला अर्थातच एक प्रयोगसिद्ध कला आहे. अचाट अत्युक्ती, किंचित भडकपणाकडे झुकलेले नाट्य आणि लयदार प्रभावी वक्तृत्व अशा त्रिविध गुणधर्मांचा आश्रय शाहीर करतो आणि हे सर्व शाहिरी कलेचा परिपोष करणारेच असते. शाहीर बहुजनांचा वार्ताहर असतो, कथाकार असतो, जागल्या असतो आणि घटना जिवंत करणारा बहुरूपी नटही असतो. हे सर्व रसायन फक्कड जमल्याशिवाय पोवाडा आकार घेत नाही आणि सादर केला तरी वठत नाही. इतर काव्यबंधांप्रमाणे पोवाड्यालाही आदि-मध्य-अंत हे अवधान सांभाळावे लागते. चांगल्या पोवाडेकाराची कसोटी तपशिलवार वर्णन करण्यात लागत नाही उत्कर्षबिंदू कोणते हे अंतःप्रेरणेन ओळखून, तेथे उत्कट भावनेचा परिपोष तो कसा करतो यावर त्याचे यश अवलंबून असते.
(संपादित)

वसंत बापट
'शूर मर्दाचा पोवाडा' या वसंत बापटांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साधना प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.