A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सानुराग गगनीं रवि

सानुराग गगनीं रवि । विचरे दिनिं सतत काल ।
अवलोकिती सकल लोक । सुखनिधान गुणवितान ।
सावकाश सावधान ॥

उदासीन गगनगता । तुच्छ गमति धराशायि ।
पूजिति, नच तो विलोकी । जन अनाथ । गगननाथ ।
सावकाश सावधान ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - वझेबुवा
स्वर- रामदास कामत
नाटक - संन्याशाचा संसार
चाल-'परब्रह्म परमेसर’ या चालीवर.
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अनुराग - प्रेम, निष्ठा.
निधान - खजिना / स्थान.
विचरणे - हिंडणे, भटकणे.
वितान - छत.
विलोकी - दृष्य.
शायी - निजणारा.
सकृद्दर्शनीं सार्वत्रिक लोकप्रियतेची शंका उत्पन्‍न करणार्‍या पतितपरार्तनासारख्या विषयावरील नाटक हातीं घेऊन, अनुरूप साजसज्‍जा आणि वेषभूषणें यांची माझ्या इच्छेनुरूप जोड देण्याकरितां भरपूर व्यय करून नाटक सुंदर स्वरूपांत रंगभूमीवर आणून यशस्वी केलें या बद्दल ललितकलादर्श नाटक कंपनीचे मालक सुप्रसिद्ध नट रा. केशवराव भोंसले यांचा मी फार आभारी आहे.

संदेश, इंदुप्रकाश व हिंदु मिशनरी या पत्रांनी आपले स्पेशल अंक काढून मला ऋणायित करून ठेविलें आहे. मुंबई व पुणें येथील प्रेक्षकवर्गाच्या गोट ऋणांतून तर मी केव्हांही मुक्त होऊं इच्छित नाहीं.

प्रस्तुत नाटक लिहून रंगभूमीवर आणलें जात असतांना माझे मित्र रा. यशवंत नारायण टिपणीस, रा विश्वनाथ गोपाल शेट्ये, रा. विश्वनाथपंत थत्ते, रा. मनसुखराम आनंद घुमे, रा. पुरुषोत्तमराव जयवंत, रा. बळवंतराव पेंडसे, रा. व्यंकटराव पेंढारकर, रा. एकनाथ नारायण वाड, रा. आत्माराम धोंडो कापडी प्रभृति मित्रांनी मला जें परोपरीनें सहाय्य केलें, त्याजबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें.

प्रस्तुत नाटकांत पुट्टूपंडिताचें काम करणारे नट रा. गोपाळराव गुत्तीकर या ब्राह्मण गृहस्थांचा श्रीमती सुंदराबाई चुटेकर या मराठा मुलीशीं हिंदु-मिशनरी संस्थेच्या विद्यमानें हें नाटक रंगभूमीवर आल्यानंतर थोड्याच दिवसांनीं मिश्र-विवाह झाला, ही गोष्ट येथें स्मरणार्थ नमूद केल्यास अस्थानीं होणार नाही.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. १ मे १९२०
'संन्याशाचा संसार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- भार्गवराम विठ्ठल वरेरकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.