उमलवून लवतें;
केसांतच फुललेली
जाई पायांशी पडते.
भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागें-पुढें
मागें मागें राहिलेलें
माझें माहेर बापुडें..
सांचणार्या आंसवांना
पेंग येते चांदणीची;
आजकाल झालें आहें
विसराळू मुलखाची.
थोडीं फुलें माळूं नये,
डोळां पाणी लावूं नये;
पदराच्या किनारीला
शिवूं शिवूं ऊन ग ये.
हांसशील हांस मला,
मला हांसूंहि सोसेना;
अश्रू झाला आहे खोल,
चंद्र होणार का दुणा !
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | रागेश्री |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १३ सप्टेंबर १९५६. |
लांबवरून येणारे बासरीचे सूर. तेही त्या बासरीपासून दूर होण्याच्या जाणिवेनं हिरमुसलेले वाटतात. त्या उदास सुरांत एकजीव होऊन आशाचा मातीच्या वासात घोळलेला आवाज येतो -
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते..
आरती प्रभूंचा शब्दन् शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला आणि त्यात तो केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज. मार्गशीर्षी संध्याकाळ, खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश. गाणं ऐकताना आपसूक आपले डोळे मिटतात. समईच्या वाती समोर दिसायला लागतात. त्या शुभ्र वातींमधून कळ्यांसारख्या ज्योती उजळवायला ती वाकलेली, आणि -
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
संध्याकाळी जाईच्या कळ्या तोडून गुंफल्या होत्या एकत्र. गजरा तसाच माळला केसांत. चंद्र वर वर येत चालला तशी जाईपण फुलत गेली. पण आज गाठी काही पक्क्या बसल्या नाहीत. ती ज्योतीभवतीचा वारा अडवायला हातांची ओंजळ धरू गेली. त्याच्यासाठी जऽरा खाली झुकली न झुकली तोच सैलसर वेणी पुढे आली खांद्यावरून, आणि त्या झटक्यानं गजर्यातून जाईची फुलं टपटपली खाली.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले माझे माहेर बापुडे
आज हे असं काय होतंय? डोळा लवतोय सारखा. भुवई उगाच फडफडतेय. हा शकुन कसला? उगा हुरहूर जिवाला ! माहेरची आठवण अशा वेळी होणार नाही तर कधी? तिचं माहेर.. अंतरानं मागे राहिलेलं माहेर. मनानं तिथंच राहिलेली ती. काळीज घट्ट करून लेकीला दूर पाठवणारं बापुडवाणं माहेर. तिला आईची खूप खूप आठवण येते. डोळे टच्कन भरून येतात.
साचणार्या आसवांना पेंग येते चांदणीची
पण हे काय? त्या डोळ्यातल्या पाण्याला झालंय तरी काय? बेटं वाहातच नाहीये, डोळ्यांतून खाली ओघळत नाहीये. पेंगुळल्यासारखं बसून राहिलंय डोळ्यातच. आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात चांदणी बनून चमकतंय.
एवढ्यात तिची सखी, शेजारीण असेल - जरा मोठी तिच्यापेक्षा - डोकावते तिच्या घरात. ही लगबगीनं डोळ्यातलं पाणी पुसायचा प्रयत्न करते. 'काहीतरी काम राहिलं करायचं' असा बहाणा करत उठते -
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची
पण तिच्या मैत्रिणीला कळतं काहीतरी गडबड आहे ते ! ती पोक्त्यापुरवत्या स्त्रीसारखा सल्ला देऊ जाते -
थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवूं शिवूं ऊन ग ये
अगं अशी उदास कशाला बसल्येयस? जा, जरा पाणी पुसून घे डोळ्यातलं. अशी सुटी फुलं नको माळू केसांत. नीट तयार हो बरं ! ऊन दूर निघून चाललंय बघ.. जरा तुझ्या पदराला धरून त्यातलं थोडं ऊन घरात घेऊन ये.. घरदार हसू दे !
हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा
मैत्रीण आपल्याला मनातल्या मनात हसतेय, असं वाटतं तिला. चेहरा कष्टी करून ती म्हणते, "हसत्येस तर हस बाई मला.. पण मला स्वत:ला काही हसणं सोसणार नाही आता. ती मघाची आसवं मनात खोल रुतली आहेत. त्यांना निपटून टाकून हसू कसं? आणि हसून तरी काय होणार आहे? तो चंद्र का दुप्पट तेजानं आपलं चांदणं सांडत माझ्याबरोबर हसू लागणार आहे?"
ग्रेसच्या, किंवा आरती प्रभूंच्या कवितांचा 'अर्थ' लावायला जाऊ नये, हे खरं - कारण त्यांच्या ओळी म्हणजे खरं तर एक अनुभूती असते. भाषेची, विचारांची, कधी फक्त शब्दांची. वाचणारा प्रत्येकजण एक -एक प्रतिमा बनवतो आपल्या मनात, आणि तोच त्या कवितेचा त्या व्यक्तीपुरता 'खरा' अर्थ असतो. इथे ही कविता गाणं होऊन आली. तिच्या सुरांनी अर्थछटेला जरा दिशा दिलीय, असं वाटता वाटता त्यातूनच एक 'गोष्ट' मला दिसली आणि आता मला हेच अर्थरूप 'खरं' वाटायला लागलं. मग ती जी अस्पष्टशी नायिका आहे गाण्याची, तिचं नक्की काय दु:ख आहे ते कळत नाही म्हणून मी अस्वस्थ ! मग मूळ कवितेचे शब्द शोधले, तेव्हा अजून तीन कडवी सापडली-
गाठीमध्ये ग जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली ग नावे?
आता अजून नव्या धाग्यांचे ताणेबाणे विणले गेले त्या आधीच्या गोष्टीत. 'गाठीमध्ये..' हे कडवं '..विसराळू मुलखाची' नंतर येतं, आणि पुढची दोन कडवी '..शिवू शिवू ऊन ग ये' नंतर.
आत्ता कळलं ! ही 'वेडी' नायिका पहिलटकरीण तर नसेल? तरीच गाण्याचा सूर असा हुरहुरीचा, तरीपण आतुर वाटणारा. तरीच तिला माहेरची आठवण येतायेता थबकते. शेजारीण अनुभवी. तिला हिचं भोळं मन आणि त्यातल्या शंका-कुशंका कळतातच अगदी. देवाला नमस्कार करून लावून घेतलेल्या अंगार्याची आठवण ती हिला करून देते. 'होईल ग सगळं व्यवस्थित' असा दिलासा देते. आणि अनिलांच्या 'आभाळ निळे नि ढग पांढरे..' या दशपदीत म्हटलंय-
"शेवंतीला कुणी उगीच सांगे, इतक्यात तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची करू नको घाई"
त्या चालीवर म्हणते, 'वेडीच आहेस. केतकीचं पातं उघडून गाभा ठीक आहे की नाही ते बघायला जात्येस ती !
मग ही नायिका जरा मोकळेपणानं सांगते आपली अवस्था. "अगं फुलात पराग भरू येताना.. भाळी कुंकू लावून घेताना, मन उगाच बावरतं. अंगभर श्रावणझिम्मड उडावी असं वाटतं.. नाहीतर त्या बावरलेपणातच नहात रहावं असं वाटतं. डोळ्यात या बाहुल्या पाहते नं आरशात, तेव्हा त्या कधी एकदा हसत्या-खेळत्या पावलांना साथ द्यायला घरात येतील, असं वाट राहातं. मन अस्सं हळवं झालंय.. हसणं सोसणारच नाही आता त्याला. खोल रुतलेली आसवंच त्या वेणा सहन करायला मदत करतील आता.. डोळ्यातल्या बाहुल्यांच्या. काजळमाखल्या दोन बालचंद्रांच्या !"
गायत्री नातू
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.