माथ्यावर चंद्र की ग ढळला !
सखे बाई ग, येण्याचा वखत की ग टळला !
घाईघाईनं इकडे येत असेल मजकडे
कुणा ग सटवाईचा, सवतीचा निरोप कळला आधी
सखे बाई ग दिली थाप मजलागी,
येण्याचा वखत की ग टळला !
तळहात धरून भरविली साय
होई आता हाय हाय !
सभोवताली जाळ केली माझी राळ
सखे बाई ग जीव तळमळे,
येण्याचा वखत की ग टळला !
गीत | - | शाहीर सगनभाऊ |
संगीत | - | एस्. चव्हाण |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | लावणी |
'सगनभाऊ म्हणे होनाजीबाळा उत्तर द्यावे रोकडे' किंवा 'होनाजीगवळ्याचा झाला चुना' या उल्लेखांवरून त्यांच्यातील शाब्दिक झटापटीचे चित्र समोर येते. परंतु त्यामुळे होनाजीबाळाचे महत्त्व कमी होत नाही. ते आपल्या वैशिष्टाने चमकतच होते. उलट सगनच त्यांच्यापुढे फिका पडला, असे समीक्षक मानतात.
सगनभाऊचा खडकीचा पोवाडा प्रसिद्ध आहे. 'दळणासारखे किडे रगडले, रडती नरनारी । लेकराला माया विसरली कसा ईश्वर तारी ॥', असे त्यानंतरच्या बेबंदशाहीचे वर्णन सगनभाऊने केले आहे.
सगनभाऊच्या लावण्यात शृंगारापेक्षा, बाह्यवर्णानापेक्षा मनोभावनेला अधिक प्राधान्य आहे. 'असी किरे प्रीत वाढली' या लावणीत 'आली दुनिया उफराटी फार तुम्ही सावधगिरीने असा', हा व्यावाहारिक उपदेश करणारी नायिका दिसते. 'चंद्राचे चांदणे सीतल का उष्ण' या लावणीत नायक-नायिकेच्या सवाल-जबाबातून घडणारे शृंगार दर्शन मोठे मार्मिक आहे.
धर्माने मुसलमान असला तरी मराठी संस्कृतीशी सगनभाऊ पूर्णतया एकरूप झाला होता. त्याच्या कवनात रामायण, महाभारत यांचे दाखले येतात. मायावाद आणि ब्रह्मवादाचेही उल्लेख येतात. पांडुरंगाचा भक्ती परिमलही दरवळतो आणि मराठमोळ्या चालीरीतींचा अभिमान प्रकट होतो.
(संपादित)
विद्यासागर पाटंगणकर
'सगनभाऊच्या लावण्या व पोवाडे' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साकेत प्रकाशन, औरंगाबाद.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.