A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सैनिक माझे नाव

उभा पाठीशी सदैव माझ्या तेजोमय इतिहास
उभे पाठीशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्वास
उभे पाठीशी भगतसिंगजी, उभे गुरू गोविंद
उभा पाठीशी सुभाष योद्धा, गर्जतसे जयहिंद

या देशाचा मी संरक्षक,
भारत माझे गाव, सैनिक माझे नाव

मी न मराठी राजस्थानी
धर्म जाती मज हिंदुस्थानी
मायभूमीचा मी अभिमानी
या अभिमानी धर्मव्रतांचा अवघ्या अंतर्भाव

जननी माझी भारतमाता
या भूमीतच पिके वीरता
जन्म-मृत्युची मला न चिंता
देह विनाशी हा तर केवळ आत्म्याचा पेहेराव

जितेन आणि जगेन लोकी
रण क्रीडांगण माझ्या लेखी
खड्ग पडो की मुकुट मस्तकी
देशकार्य ते देवकार्य, मज अढळ अंतरी भाव

उरि निर्भयता नयनी अग्‍नी
उन्‍नत मस्तक करी शतघ्‍नी
उभा इथे मी असा निशिदिनी
बघू कोणता शत्रू करतो कुठुनी धीट उठाव