A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऋतुराज आज वनि आला

ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज वनि आला !
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेउनी आला !

कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !
अलि - काळा भुंगा.
कुंज - वेलींचा मांडव.
नवथर - नवीन.
पुंज - समुदाय / झुबका / ढीग.
सुमन - फूल.
मराठी रंगभूमी समृद्ध आणि संपन्‍न करणार्‍या विविध प्रवाहांपैकी एक महत्त्वाचा प्रवाह आहे रूपांतरीत नाटकांचा. विविध भाषांमधील नाटके रूपांतरीत होऊन मराठी रंगभूमीवर अवतरली. अर्थात, अधिक संख्या आहे इंग्रजीमधून आलेल्या नाटकांची. प्रामुख्याने अशी नाटके गद्य रंगभूमीवर आलेली असली तरी संगीत नाटकांची संख्याही नगण्य नव्हे.

रूपांतरीत नाटकांचेही दोन वर्ग आढळतात. रूपांतर असल्याची जाणीव करून देणारी नाटके आणि अशी पुसट शंकाही न येऊ देणारी नाटके. गोविंद बल्लाळ देवलांचे 'संशयकल्लोळ' हे दुसर्‍या वर्गातील चिरपरिचित उदाहरण. हे नाटक रूपांतरीत आहे अशी शंकाही कुणाला येणार नाही, इतके ते आपले वाटते.

याच जातकुळीतले दुसरे एक नाटक म्हणजे प्रस्तुतचे विद्याधर गोखले लिखित 'मदनाची मंजिरी'. शेक्सपिअरच्या 'TWELFTH NIGHT' हलक्याफुलक्या नाटकाचे हे स्वैर रूपांतर आहे खरे. पण, मूळच्या रंजक कथाबीजाचे भारतीयीकरण अतिशय कौशल्याने केले गेले आहे. इतकेच नव्हे, तर पारंपरिक संगीत नाटकाच्या साच्यामध्ये नृत्य-संगीत-काव्य याद्वारे हे कथाबीज असे फुलवले गेले आहे की त्याच्या पाश्चात्य उगमाची शंकाही कुणाला येऊ नये.

हे नाटक आणखी एका दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. कै. प्रभाकर भालेकर यांच्यासारखा गुणी पण उपेक्षित कलावंत, या नाटकाने संगीत-दिग्दर्शक म्हणून मान्यता पावला. शिवाय, या नाटकाद्वारे अनेक नवीन कलावंत संगीत रंगभूमीवर स्थिरावले. सुमन माटे, मधुवंती दांडेकर, शरद जांभेकर, प्रकाश घांग्रेकर, चंदू डेब्रेकर ही यापैकी काही नावे. आजही अनेक कलाकार या नाटकाद्वारे पुढे येत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या कै. विद्याधर गोखले यांनी मनोभावे, विविध अंगांनी संगीत रंगभूमीची पूजा केली. आर्थिक नफा-तोटा हा एकमेव निकष त्यांनी कधीच मानला नाही. स्वतः झीज सोसून ते कार्य करत राहिले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर "रंगशारदा प्रतिष्ठान ' यथामती, यथाशक्ती हेच कार्य पुढे चालवत आहे.
(संपादित)

प्रा. सु. द. महाजन
'मदनाची मंजिरी' या नाटकाच्या पुस्तकाच्या तृतीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अरविंद रघुनाथ तेंडुलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.