भेटींत रुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरी
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितिदां आलो, गेलों, जमलों
रुसण्यावांचूनि परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी
कधीं तिनें मनोरम रुसणें
रुसण्यांत उगीच तें हंसणे
म्हणून तें मनोहर रुसणें
हंसणें-रुसणें-रुसणें-हंसणें
हंसण्यावरती रुसण्यासाठीं, जन्मजन्मीच्या गांठी
कधीं जवळ सुखानें बसलों
दुःखांत सुखाला हंसलों
कधीं गहिंवरलों, कधीं धुसफुसलों
सागरतीरीं आठवणींनीं वाळूंत मारल्या रेघा
जन्मासाठीं जन्म जन्मलों, जन्मांत जमली ना गट्टी
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व, वाणी जयराम |
नाटक | - | देव दीनाघरीं धांवला |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, युगुलगीत |
तिनिसांज | - | सांजवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हिसांजा, कातरवेळ हे सर्व शब्द 'संध्याकाळ' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सांजवणे, सांजावणे, सांजळणे म्हणजे संध्याकाळ होणे. |
या पदातील 'रुष्टता' हा शब्द नाटकाच्या संहितेनुसार आहे आणि योग्य आहे. कृष्ण-रुक्मिणीच्या प्रत्येक भेटीत होणार्या रुसव्या-फुगव्यांचा यास संदर्भ आहे.
फोन नं. ५७२३१
४२ 'दौलत'
विजयनगर कॉलनी,
पुणे ३०
दि. २६ । १० । ७०
प्रिय श्री. बाळ,
काल तुमचे नाटक बघून झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. नाटक फार आवडले. विशेष आनंद कोणत्या गोष्टीचा होतो, ते सांगतो. सार्या लोकांनी कौटुंबिक नाटकाचे 'कारखानदार' असा शिक्का तुमच्यावर मारला होता. चाहत्यांनी भूषण म्हणून आणि विरोधी टीकाकारांनी दूषण म्हणून. परंतु कौटुंबिक नाटकाच्या कक्षेबाहेर पडून एक पौराणिक नाट्यकृती तुम्ही लिहिलीत आणि रंगमंचावर तिचा यशस्वी प्रयोग करून दाखविलात ! मित्रांना आणि शत्रूंना तुम्ही हे खणखणीत उत्तरच दिलेत. दर्जेदार लेखन, सुंदर कल्पकता, यथोचित भव्य नेपथ्य, श्रुतिमनोहर पार्श्वसंगीत, वैभवशाली वेषभूषा, अशा सर्व दर्शनी तुमची ही नवी नाट्यकृती श्रेष्ठ दर्जाची म्हणावी लागेल. रसिक श्रोते तुमच्या या नव्या पराक्रमाचे खूप कौतुक करतील यात मला शंका वाटत नाही.
सध्या लोकप्रियतेच्या आघाडीवर असलेल्या नाटककारांत तुमचे कर्तृत्व विशेष म्हणावे लागेल. ते यासाठी की तुम्ही केवळ नाट्यलेखन करीत नाही. नाटककार, दिग्दर्शक, नट, आणि निर्माता या सार्या भूमिका तुम्ही पत्करल्या आहेत, आणि त्या सर्व उत्तम प्रकारे पार पाडण्याचा विक्रम तुम्ही केला आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा अपवाद सोडल्यास, असे सव्यसाचित्व करून दाखविणारे तुम्ही एकटेच ठराल ! तुमचे करावे तेवढे अभिनंदन आणि कौतुक थोडेच ठरेल !
तुमचे कर्तृत्व असेच वाढत जावो आणि तुम्हाला उदंड कीर्ति मिळो, असे मनःपूर्वक इच्छितो.
स्नेहांकित,
नारायण सीताराम फडके
(संपादित)
'देव दीनाघरीं धांवला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.