A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रे हिंदयुवका ये पुढे

रे हिंदयुवका ! ये पुढे, चल ये पुढे, चल ये पुढे
नव हिंदवी सेनाशतें बघ चालली विजयाकडे

ये स्वर्ग हातीं आपुल्या पडला जरी रणिं देह ही
जिंकिता भोगावया ही सापडे तुजला मही
सांगते गीता तुझी तुज शस्त्र घे करि संगरा
अरिकंदना करि वंदुनी योगेश्वरा यदुनंदना
घनगर्जती तोफांतुनी चेतावणीचे चौघडे
धरी धीरता, वरिवीरता, रणचातुरी चल ये पुढे

जलि जिंकिलें, स्थलि जिंकिलें, युवका तुवां अपुल्याबलें
तव साहसातें भाळुनी गतभाग्य तुजसी लाभलें
चल टाक पाऊल तें पुढें, स्फुरुं दे तुझे बाहू जरा
जिंकु ये रणविक्रमें या विश्वव्यापक संगरा
मदधुंद साधनअंध या अधमाधमा गरिमा चढे
अरिसिद्धिही उधळावया चल ये पुढे, चल ये पुढे

अजुनी न सरली ही निशा काळोख भरला अंतरीं
तेजाळल्या नुकत्या कुठे क्षितिजी दिशांच्या झालरी
रणरंगणीं तरुणा उडी तूं घेतली जरि या पुढे
चाललो निःशंक आम्ही आपुल्या विजयाकडे
काळेपणाने पूर्ण हे पापात पिवळ्यांचे घडे
घे चाप हाती भारता चल ये पुढे, चल ये पुढे
गीत - राजा बढे
संगीत -
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
अधम - नीच, पापी.
अरि - शत्रु.
कंदन - युद्ध / कत्तल.
मही - पृथ्वी.
संगर - युद्ध.
सावरकर सदन
शिवाजी उद्यान
मुंबई २८

श्री. राजाभाऊ बढे यांसी,
महाशय,

आपण आपल्या 'क्रांतिमाला' या पुस्तकासाठी मला प्रस्तावना लिहिण्याची अथवा आर्शीवाद देण्याची विनंती केली. पण अलिकडे मी प्रस्तावना आदि लिहिण्याचें बंद केलें आहे. कारण एकतर प्रस्तावनेसाठीं इतकी विचारणा माझेकडे साहाजिकपणेंच येत असते कीं मला त्या सर्वांना प्रस्तावना देणें अगदीं अशक्य होऊन जातें.

दुसरें असें कीं आपण स्वतःच मराठी वाङमयांत इतके सुप्रतिष्ठित, नामवंत, प्रतिभासंपन्‍न कवी नि साहित्यिक आहांत की आपल्या काव्यास माझ्या प्रस्तावनेची आवश्यकता आहे, असें मला वाटत नाहीं.
कळावें, लोभ असावा हे विनंति.

आपला,
वि. दा. सावरकर
६ मे १९५३

(संपादित)

'क्रांतिमाला' या राजा बढे लिखित स्फूर्तीगीतांच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अखंड हिन्‍दुस्थान प्रकाशन, मुंबई

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.