A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रायगडीं शिंग नभीं

रायगडीं शिंग नभीं उच्च स्वरें घोष करी
कलियुगांत अवतरलें रामराज्य भूमीवरीं !

तीर्थरूप माउलीला
वंदण्यास शिव झुकला
थरथरतां कर फिरला
रोमरोम तनीं फुलला
हर्षभरें नयनांतुनि ओसंडत अश्रूसरी

गंगा-सिंधु-यमुना
गोदा-कृष्णा-पवना
भरभरुनी कलशांना
घालण्यास शुभस्‍नाना
तटिनी भगिनी मिळुनी जमुनी पोंचल्यात येथवरीं

शोभतसे छत्र शीरीं
धारदार खड्ग करीं
भंवति उभे सहकारी
देई सभा ललकारी
विष्णुचा अंश तूंच, तूं अमुचा कैवारी

वेदमूर्ति गात गान
कर्ण नवा देत दान
वडिलांचा होत मान
तृप्त सकल थोर-सान
शुभदिनीं या शक नवीन प्रचलित हो राज्यभरी
तटिनी - नदी.
ललकार - चढा स्वर / गर्जना.
शक - वर्षगणना.
सान - लहान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.