A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रवि गेला रे सोडुनी

निज नीज माझ्या बाळा
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा !

रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला.

अंधार वसे चोहिंकडे गगनांत,
गरिबांच्या जेविं मनात.

बघ थकुनि कसा निजला हा इहलोक
मम आशा जेविं अनेक.

खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायाते फिरती,
परि अंतीं निराश होती;

लवकरि हेही सोडितील सदनाला,
गणगोत जसें अपणांला.

जोंवरतीं या कुडींत राहिल प्राण,
तोंवरि तुज संगोपीन.

तद्‌नंतरची करूं नको तूं चिंता
नारायण तुजला त्राता.