A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रात्रंदिन आह्मां युद्धाचा

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥

जिवाही अगोज पडती आघात ।
येऊनिया नित्य नित्य करि ॥२॥

तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळे ।
अवघीयांचे काळे केले तोंड ॥३॥
भावार्थ-

जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला अहोरात्र युद्ध करावं लागत आहे. हे युद्ध एकीकडे मनात सुरू आहे, तर दुसरी बाह्य जगात सुरू आहे. सतत होणार्‍या जीवघेण्या आघातांचं निवारण आम्ही करत आहोत. ते आघात परतवून लावत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात- हे देवा, केवळ तुझ्या नामाच्या बळावर मी सर्वांचं तोंड काळं केलं आहे, म्हणजे सर्व शत्रूंचा पराभव केला आहे.

तुकाराम महाराज युद्धाची भाषा करत आहेत. हे साधं भांडण नाही. युद्धात एक तर जय मिळतो वा मरण पत्करावं लागतं. तुकाराम महाराज असं कोणतं युद्ध लढत आहेत की जे त्यांना स्वतःशीही लढावं लागतं आहे आणि बाह्य शक्तींशीही? या बाह्य शक्ती कोणत्या आहेत? कशासाठी त्यांच्याशी युद्ध मांडलं आहे, हे समजलं तर तुकाराम महाराज समजले, असं म्हणता येईल.

जेव्हा एखादी व्यक्ती काही मूल्यांवर ठाम राहून जगायचा प्रयत्‍न करते त्यावेळी तिला प्रथम स्वतःशीच संघर्ष करावा लागतो. आपल्यावर जन्मापासून झालेले संस्कार, आपले हितसंबंध, नात्यागोत्यांची गुंतागुंत, कुटुंबातील जबाबदार्‍यांचे ओझे, ते न पेलल्यास कुटुंबावर होणारे परिणाम अशा सगळ्याच बाबी व्यक्तीच्या पायातील जोखड बनतात. आपल्यावर जन्मापासून झालेले संस्कार पुसून टाकून वेगळा विचार स्वीकारणं सोपं नसतं. व्यक्तिगत हितसंबंधांवर तिलांजली ठेवणं सोपं नसतं. प्रियजनांशी होणारे मतभेद सहन करणं सोपं नसतं. पण हे सर्व करावं तर लागतंच. नाहीतर रणांगणावर भीष्म, द्रोण आदी पाहून अर्जुनाची जशी स्थिती झाली तशी स्थिती होते.

जशी व्यक्ती तसाच समाजही रूढीप्रिय असतो. परंपरानिष्ठ असतो. मागून जे चालत आलं ते तसंच पुढे चालवायचं. त्यामागील कारणं, उद्देश, त्याचे फायदेतोटे, योग्यायोग्यता, कालसुसंगतता कसलाही विचार केला जात नाही. जो यासंबंधी प्रश्न उपस्थित करेल त्याला पाखंडी ठरवलं जातं. त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो. त्याचा छळ केला जातो. योग्य कारणासाठी रूढ विचार, कल्पनांना जो कळत-नकळत धक्का लावतो त्याला संघर्ष अटळ असतो. जगाच्या पाठीवर अशी असंख्य उदाहरणं आहेत. साँक्रेटीसला विषाचा प्याला प्यावा लागला. कोपर्निकसला जाळून मारलं गेलं. महात्मा जोतीराव फुल्यांवर मारेकरी घातले गेले. त्यांच्याच आईवडीलांनी त्यांना घराबाहेर काढलं. पण या सर्व महापुरुषांनी आपल्या स्वीकृत मूल्यांसाठी पडेल ती किंमत दिली. पण आपल्या मुल्यांवरची निष्ठा ढळू दिली नाही. आपलं स्वीकृत जीवितकार्य सोडलं नाही.

दुसरं समाजात जी प्रचलित व्यवस्था असते तिच्यात काही लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ती व्यवस्था बदलली वा नष्ट झाली तर त्यांचे हितसंबंध धोक्यात येतात. आपले हितसंबंध जपण्यासाठी अशा व्यक्ती कोणत्याही थराला जातात आणि मग संघर्ष अटळ होतो. अशा परस्पर हितसंबंध असलेल्या समाजात आपण कोणाच्या बाजूने उभं रहायचं याचा निर्णय आपल्याला करावा लागतो.

तुकाराम महाराजांनी 'बुडती हे जन न देखवे डोळा' म्हणून 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥' अशी निर्भिड भूमिका घेतली होती. आणि हजारो वर्षांच्या प्रचलित शोषक व्यवस्थेला, देवाधर्मासंबंधीच्या खुळ्या समजुतींना, आपणच लिहिलेल्या धर्मग्रंथांच्या आधारे स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ लेखणार्‍या लोकांच्या श्रेष्ठत्वालाच खुलं आव्हान दिलं होतं. मानवी एकतेचा, समतेचा पुकारा केला होता. त्यांचा अहंकार, ढोंगीपणा, दांभिकपणा यावर कठोर शब्दात कोरडे ओढले होते. तुकाराम महाराजांनी हजारो वर्षांच्या जुलुमी चातुर्वर्ण व्यवस्थेविरोधात लढा पुकारला आहे असं दिसून येतं. म्हणूनच या व्यवस्थेचे रक्षक, समर्थक आणि लाभधारकांनी त्यांचा सातत्याने, अनन्वित छळ केला. घरातली कर्ती व्यक्ती जेंव्हा असा संघर्ष करते तेंव्हा त्याची झळ त्यांच्या कुटुंबियांनाही सोसावीच लागते. आपल्यामुळे आपल्या प्रियजनांना सोसाव्या लागणार्‍या वेदना त्या व्यक्तीला अस्वस्थ करणार्‍याच असतात. तिच्या मनोबलावर हल्ला करणार्‍या असतात. तरीही आपण जे करतो आहोत ते योग्यच आहे, समाजहिताचंच आहे, आवश्यकच आहे असा ठाम विश्वास असल्याने तो संघर्ष मध्येच सोडूनही देता येत नाही. भारतीय संदर्भात तर बहुजन समाज हजारो वर्षे अडाणी, निरक्षर, विद्येपासून वंचित राहिल्याने या समाजाला स्वतःचं हित-अहितही कळत नाही. जो हिताचं सांगतो तोच त्याला आपला शत्रू वाटतो. जो त्याचं शोषण करतो तोच त्याला आपला तारणहार वाटतो. यामुळे जे जे कोणी परिवर्तनासाठी लढले त्यांना जिवंतपणी खूपच छळ सहन करावा लागतो, प्रसंगी प्राणाचंही मोल द्यावं लागतं असं इतिहासात वारंवार दिसून येतं. पण जर आपल्या मूल्यांवर अढळ विश्वास असेल, तर व्यक्ती सर्व संकटांवर मात करण्याची उमेद बाळगते. संघर्ष करते. प्रसंगी प्राणांचं बलिदानही करते. तर कधी संकटांवर मातही करते. आपल्या जीवनकार्यावरचा अटूट विश्वास व्यक्तीला तसं आत्मबळ, लढण्याचं सामर्थ्य देतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की मी फक्त तुझ्या नामाच्या बळावर सार्‍यांना पराभूत केलं आहे. तुकाराम महाराजांना त्यांचा विठ्ठल, पांडुरंग तसं लढण्याचं बळ देतो.
(संपादित)

उल्हास पाटील
सौजन्य- गाथा परिवार (gathaparivar.org)
(Referenced page was accessed on 04 Nov 2021)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.