वांच्छिला प्रेम संग । परि होई मनोभंग ॥
विकच दल सुमनांग । भ्रमरीस सुख संग ।
विपरीत परि दैव तरि होई रसभंग ॥
गीत | - | शं. बा. शास्त्री |
संगीत | - | मास्टर दीनानाथ |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ मास्टर दीनानाथ ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | सन्यस्त खड्ग |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • गायनात आकारासाठी 'रंग', 'रंगा' असे म्हटले आहे. - डॉ. रवींद्र घांगुर्डे |
वांच्छा | - | इच्छा. |
विकच | - | विकसित / फुललेले. |
सुमन | - | फूल. |
'संन्यस्त खड्ग' नाटकामागे एक इतिहास होता. सावरकर हे एक फार मोठे क्रांतिकारक. कोल्हटकर आपल्या सातारच्या घरातून पळून गेले, ते या क्रांतिकारक गोटात सामील होण्याच्या उद्देशाने ! सावरकरांची आणि त्यांची मैत्री झाली, ती ह्या कारणामुळे ! पुढे पोटाचा धंदा म्हणून कोल्हटकर नाटक धंद्यात सामील झाले, तरी जुन्या निष्ठा सोडल्या नाहीत. सावरकरांचं 'संन्यस्त खड्ग' बलवंत कंपनीतर्फे रंगभूमीवर आणण्यामागे एक ध्येयवाद होता. नाटक अतिशय लोकप्रिय झालं. वैशिष्ट्य असे की, अहिंसेची चळवळ ज्या काळात ऐन भरात होती, त्या काळात हे नाटक गाजलं.
शास्त्री सांगतात- "एकदा भरगच्च भरलेल्या थिएटरसमोर हे नाटक झालं. त्यावेळी डॉ. ना. भा. खरे समोरच्या खुर्चीवर बसून हे नाटक पहात होते. सशस्त्र प्रतिकाराचं समर्थन करणारा संवाद, रंगभूमीवर सुरू असतांना ते एकदम उठून खुर्चीवर उभे राहिले, सगळ्या नाट्यगृहाला उद्देशून म्हणाले, "हेच, हेच कुणी तरी सांगायला हवं होतं !"
'संन्यस्त खड्ग' ह्या नाटकाकरता सावरकरांनी काही अत्यंत सुंदर पदे तयार केली होती. 'शत जन्म शोधिताना', 'सुकतातची जगी या' वगैरे ! पण काही पदें दीनानाथाने प्रसंगानुकूल तयार केलेल्या चालींना भारी जात. अशा पदांच्या ऐवजी, त्या त्या ठिकाणी शास्त्रींची पदं म्हणायची परवानगी सावरकरांनी दीनानाथाला दिली होती. 'मर्मबंधातली ठेव ही ' हे शास्त्रीचं अशापैकी एक पद खूप गाजलं. अजूनही गाजत आहे.
'संन्यस्त खड्गा'तलं शास्त्रीचं दुसरं गाणं असं होतं,
रती रंगी । रंगे ध्यान । रंगवी तरंग ।
वांच्छिला प्रेम संग । परि हो मनोभंग ॥
विकल दल सुमनांग । भ्रमरास सुखकंद ।
विपरीत परि दैव ! परि हो मनोभंग ॥
सावरकरांच्या गाण्यात, स्वरानुकूल फेरफार करायची परवानगी शास्त्रींना मिळाली होती. त्यापैकी एका गाण्यात, 'येचि आजि जाता जाता ।' ही सावरकरांची ओळ बदलून शास्त्रींनीं त्या जागी 'प्रिया घे निजांकी जातां ।' असा दीनानाथांच्या सोयीने बदल केला होता.
(संपादित)
शंकर बाळाजी शास्त्री यांच्या पत्नी प्रा. तारा शास्त्री यांनी लिहिलेल्या 'स्मृतिरंजन' लेखातून.
तरुण भारत, नागपूर; दीपावली विशेषांक १९७२.
सौजन्य- दै. तरुण भारत, सिद्धार्थ शंकर शास्त्री.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.