दाटून आले घन आसवांचे
मिटलेल्या पापणीत !
तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा
नाचे प्रलय लयीत !
मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी
रडते स्वप्न व्यथीत !
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
कारागिरी असली तरी तिच्यासाठी योग्य मन:स्थिती असावीच लागते. एकदा याच कारणामुळे माझं गाणं अडून बसलं. संगीतकार अनिल-अरुण यांच्या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण ठरलं होतं. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. ध्वनिमुद्रणाची तारीख येऊन ठेपली तरी माझं गाणं तयार होईना. कारण माझे पती चंद्रकांत विटणकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. माझं चित्त थार्यावर नव्हतं. त्यांच्या काळजीनं ग्रासलेलं मन गाणं लिहायला तयार होईना. मी अरुणजींना फोन करून सांगितलं, "माझ्याकडून गाणं लिहून होणार नाही. नाइलाज आहे माझा. तुम्ही कृपा करून दुसर्या कवीकडून गाणं लिहून घ्या आणि ध्वनिमुद्रण पार पाडा."
अरुणजी शांतपणे म्हणाले, "वंदनाताई, मला गाणं तुमच्याकडूनच हवं आहे. तुमची मन:स्थिती मी समजू शकतो. पण प्रयत्न तर करा. मला खात्री आहे की तुम्ही गाणं लिहाल."
"अहो, कसं शक्य आहे? कसं लिहू गाणं? काही सुचत नाहीये."
ते उत्तरले, "असंच काहीतरी लिहा. 'कसं लिहू गाणं वगैरे.' "
मी सुन्नपणे विटणकरांच्या शेजारी येऊन बसले. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी होती. अजून ते गुंगीतच होते. काय होईल? ही चिंता मनात दाटलेली. सहज विचार आला, रसिक श्रोते गाणं ऐकतात. शब्दांच्या आणि स्वरांच्या सौंदर्यानं धुंद होतात. पण गाणं लिहितानाची कवीची मन:स्थिती त्यांना कळत असेल का? हा विचार मनात येताच काय झालं कुणास ठाऊक, वीज चमकावी तशा मला गाण्याच्या ओळी सुचल्या.
रसिका, मी कैसे गाऊ गीत?
दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापणीत !
ती ओळ सुचताच मन एका अनामिक भावनेने थरारून गेलं ! त्या मन:स्थितीतही भरभरून आनंद झाला. त्याच भारलेल्या तंद्रीत गाण्याची पुढची कडवी लिहून झाली. खरंच, अशावेळी वाटतं, हे सारं आपण नाही करीत. कुणीतरी आपल्याकडून करवून घेतं ! मी लगेच अरुणजींना फोन केला नि संपूर्ण गाणं फोनवरूनच वाचून दाखवलं.
खूष होऊन ते उद्गारले, "वा ! किती छान लिहिलंत हो गाणं ! शब्द इतके भावपूर्ण आहेत की ऐकताना मला नवीन जागा सुचल्या. थांबा. गाणं लिहून घेतो."
रुग्णालयाच्या फोनवरून एका कवीनं संगीतकाराला ऐकवलेलं, गाण्यांच्या इतिहासातलं हे बहुधा पहिलंच गाणं असेल ! अनुराधा पौड्वाल यांनी अत्यंत समरसतेनं गायलेलं हे गाणं खूप लोकप्रिय झालं. याचं श्रेय अरुण पौडवाल यांनाच आहे.
(संपादित)
वंदना विटणकर
'हे गीत जीवनाचे' या वंदना विटणकर लिखित गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.