A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रणीं फडकती लाखो झेंडे

रणीं फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा

शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे- कणखर काठी झेंड्याची
तरवारीच्या धारेवरती पंचप्राणां नाचवितां
पाश पटापट तुटती, त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
लीलेनें खंजीर खुपसतां मोहक मायेच्या हृदयीं
रामदास-रस-भक्तीने ध्वज सगळा भगवा होई
अधर्म लाथेने तुडवी
धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा

कधी न केलें निजमुख काळे पाठ दावुनी शत्रूला
कृष्ण कारणीं क्षणही न रणीं धर्माचा हा ध्वज दिसलां
टोंच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणूं जटायू रावणमार्गी उलट रणांगणि हा ठेला
पर लक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचें संचरते जगती वारे
गगनमंदिरी धांव खरी
मलिन मृत्तिका- लव न धरी
नग राजांचा गर्व हरी
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा

मुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हॄदयाची
सुकली कुठली, दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी उसळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयाच्या छटा झळकता- निधड्या छातीची वाणी
धरूनि उराशी जोडे निजला जो रणांगणी राणोजी
मान इमानापायी ज्याची, चमके त्याची ही बाजी
हे सिंहासन निष्ठेचें
हे नंदनवन देवांचे
मूर्तिमंत हा हरि नाचे
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा

स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता
सौभाग्याची सीमा निजली, उजळायाला या जगता
रमा-माधवासवें पोंचल्या गगनांतरिं जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकतें ह्या भगव्या झेंड्यावरती
नसुनी असणे, मरूनी जगणे, राख होउनी पालविणें
जीवाभावाच्या जादुचे ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे
मोहाची क्षणि गांठ तुटे
धुकें फिटे, नव विश्व उठे
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा

या झेंड्याचे हे आवाहन 'महादेव हरहर' बोला
उठा मराठे अंधारावर घाव निशाणीचा घाला
उडी कडाडुनि पडतां झाडें कंपित हृदयांतरि होती
टक्कर देतां फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनि पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी टाकणें शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धांत
व्हा राष्ट्राचे राऊत
कर्तृत्वाचा द्या हात
तळपत दावी पथ तेजाचा अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा
गीत - वि. स. खांडेकर
संगीत -
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
काक - कावळा.
जटायु - पक्षिराज. रावण सीतेस पळवून नेत असता हा त्याच्याशी लढला. यानेच रामाला रावणाने सीता लंकेत नेली असे सांगितले.
तरुवर - तरू / झाड.
नग - डोंगर.
नुरणे - न उरणे.
निधड - पराक्रमी.
मृत्तिका - माती.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
लव - सूक्ष्म.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.