A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रघुवरा बोलत कां नाहीं

काय ऐकतें? काय पाहतें? काय अवस्था ही?
रघुवरा, बोलत कां नाहीं?

जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें?
दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई?

ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं?
अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली?
धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं?

ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें?
गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्‍न दिशा दाही?

सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु?
श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधी पाहूं?
नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही

विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सखया !
पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
ऐकलेंत का? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही

रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी
परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही?

अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं?
काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं?
जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही?

हे लंकेशा, ज्या शस्त्रानें मारविलें नाथां
घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
रामामागें तरी जाउं दे अंतीं वैदेही